– सुनीता कुलकर्णी

आपल्याकडे कुठल्याही ‘साहेबां’पेक्षा त्यांच्या गोतावळ्याचाच तोरा मोठा असतो. ‘साहेबां’ची बायको, त्यांची मुलं, त्यांचे नातेवाईक, त्यांची मित्रमंडळी, त्यांचे चाकर, त्यांचे पडचाकर हे सगळेचजण सार्वजनिक ठिकाणी जमिनीपासून चार फूट वरच चालत असातात. वेळ आली आणि कुणी ‘अरे’ केलं तर फक्त ‘कारे’ न म्हणता ‘आम्ही कोण ते माहित नाही? का दाखवतोच आता’ असा त्यांचा थाट असतो.  हे झालं ‘साहेबां’बाबत. त्यात एखादी महिला ‘साहेब’ असली की मग तर काय विचारायलाच नको. आरक्षणातून महिलांना सरपंचपदं मिळायला लागली तेव्हा ‘सरपंच पती’ ही अलिखित पदंच गावोगावी तयार झाली होती. अनेक ठिकाणी पदांवरच्या महिलांचे पती ते बायकोचं पद ते आपलंच असंच वागताना दिसतात. कारण तिची ओळख आपली बायको अशीच आहे ही त्यांची ठाम समजूत असते.

अमेरिका या सगळ्या बाबतीत कशी वेगळी आहे असं उदाहरण नुकतंच घडलं आहे. कमला हॅरिस या नुकत्याच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणजे त्या अमेरिकेच्या ‘सेकंड लेडी’ आहेत. त्यामुळे त्यांच्या पतीची डग्लस एमहॉफ यांची ओळख ‘सेकंड जेंटलमन’ अशी झाली आहे. म्हणजे फक्त बोलण्यात वगैरे नाही तर अधिकृतपणे. व्हाइट हाऊसमधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या ट्वीटर अकाऊंटची यादी जाहीर करताना राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लोकांना काही अकाऊंट फॉलो करण्याचं ट्वीटरवरून आवाहन केलं आहे. त्यात डग्लस एमहॉफ यांची ओळख ‘सेकंड जेंटलमन’ अशी दिली आहे. डग्लस यांच्या या नव्या आयडेंटिटीला लोकांनी भरघोस प्रतिसाद दिला असून त्यांना एका दिवसात ट्वीटरवर चार लाख नवे फॉलोअर्स मिळाले आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या पहिल्या उपराष्ट्राध्यक्ष होऊन कमला हॅरिस यांनी जसा इतिहास घडवला आहे, तसाच पहिले ‘सेकंड जेंटलमन’ होऊन डग्लस यांनीही इतिहास घडवला आहे असं म्हणायला हरकत नाही. अमेरिकेच्या इतिहासात ते उपराष्ट्राध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला असल्याने ते आपोआपच इतक्या उच्चपदस्थ महिलेचे पती असणारे पहिलेच ‘सद्गृहस्थ’ आहेत.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी डग्लस यांना दिलेली ‘सेकंड जेंटलमेन’ ही उपाधी लोकांना फारच आवडली आणि त्यामुळे ट्वीटरवर ती दिवसभर ट्रेण्डिंग होती. ‘जमाना बदल रहा है’ असं म्हणत अनेकांनी ताबडतोब या ‘सेकंड जेंटलमन’ला फॉलो करायला सुरूवात केली. अमेरिकेत पहिल्यांदाच असं झालं आहे की नव्या अध्यक्षाला नवं कोरं ट्वीटर अकाऊंट उघडून देण्यात आलं आहे. त्यामुळे अर्थातच जो बायडेन यांना शून्य फॉलोअर्सपासून सुरूवात करावी लागते आहे. त्याउलट २०१७ मध्ये ओबामा यांच्याकडून ट्रम्प यांनी सत्ता घेतली तेव्हा पोटूस (प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स) अकाऊंटचे १३ दशलक्ष फॉलोअर्स होते.