-सॅबी परेरा

NH 10 या नवदीप सिंगच्या सिनेमातील एक पात्र म्हणते कि शहरातील चकचकीत इमारती आणि मॉलचा एरिया संपून गावं लागली कि त्यापुढे भारताचं संविधान लागू होत नाही. गावचा कायदा, तिथल्या प्रथा परंपरा वेगळ्याच असतात. असाच भारताच्या संविधाना पासून स्वतःला आयसोलेट केलेल्या भारतातील हजारो गावांसारख्याच, दक्षिण भारतातील एका गावात १९९७ च्या सुमारास घडलेल्या सत्य घटनेवर आधारित “कर्णन” हा तामिळ सिनेमा आहे. (अमेझॉन प्राईम वर उपलब्ध आहे)

जातिव्यवस्थेने लादलेल्या अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या ‘अँग्री यंग मॅन’ची, या सामाजिक व्यवस्थेविरुद्धची लढाई म्हणजे कर्णन हा सिनेमा.

आपला स्वतःचा, आपल्या गावाचा, जातीचा उत्कर्ष व्हावा अशी इच्छा असणारा आणि त्यासाठी प्रयत्न करणारा एक वर्ग आणि त्या प्रयत्नांना विरोध करणारा दुसरा वर्ग ह्यांच्यातील हा संघर्ष आहे. स्वाभिमान अन स्वत्व गमावलेलं, सदैव अनामिक भीतीच्या छायेत राहणारं एक निसर्गसंपन्न गाव आहे. इतरांसारख्या आपल्यालाही मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात, आपल्या गावासाठी एक बस स्टॉप असावा, आपल्या पोराबाळांना शिक्षण घेता यावं, तरुण मुलींना निर्धोक पणे वावरता यावं, जमलंच तर एखाद्याला सरकारी नोकरी मिळावी इतक्याच त्यांच्या माफक अपेक्षा आहेत. पण या किमान अपेक्षापासून देखील आहेरे वर्गाकडून नाहीरे वर्गाला वंचित ठेवलं जातं. बळी तो कान पिळी या न्यायाने शासन व्यवस्था देखील अत्याचारी लोकांना साथ देते आणि प्रसंगी स्वतःही त्या अत्याचारात सामील होते. प्रशासनचं प्रतिक म्हणून कथेत येणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा अहंकार दुखावलाय आणि त्याला त्याचा बदला घ्यायचा आहे. त्या पोलीस अधिकाऱ्याचा हा अहंकार कशामुळे दुखावलाय? तर गावकऱ्यांनी त्याला बसायला खुर्ची न दिल्यामुळे, त्याच्यासमोर डोक्यावरील फेटे न उतरवल्यामुळे, त्याच्या नजरेला नजर भिडवून बोलल्यामुळे आणि गावकऱ्यांची नावे पुराणकथांतील शूरवीरांप्रमाणे असल्यामुळे!

व्यवस्थे विरोधात शोषितांनी शोषकांविरुद्ध केलेला विद्रोह दाखविण्यासाठी फॅन्ड्री सिनेमाच्या क्लोजिंग शॉटला नागराज मंजुळेने जब्याला एक दगड मारताना दाखविले आहे. तद्वतच कर्णन मधील शोषित घटक आपल्याला बस स्टॉप नाकारणाऱ्या, प्रवेश नाकारणाऱ्या बसवर दगड फेकून मारतो आणि तिथूनच या सिनेमातील संघर्षाला धार येते.

बसची तोडफोड, पोलीस स्टेशनची तोडफोड, पोलिसांना केलेली मारहाण अशा बऱ्याच प्रसंगात कर्णन आणि त्याचे गावकरी कायदा हातात घेतात पण शांततेने राहणाऱ्या, आपल्या हक्काची सनदशीर मागणी करणाऱ्या पापभीरू समाज घटकाला त्यांचा जीव आणि स्वाभिमान जपण्यासाठी कायदा मोडण्या व्यतिरिक्त व्यवस्थेने दुसरा काही पर्यायच सोडला नसेल तर ते तरी काय करतील? कायदा मोडणे हे त्यांचं स्वाभाविक वर्तन नसून त्यांची अगतिकता आहे हे ठसविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.

दवाखान्यापर्यंत वाहतुकीची व्यवस्था न झाल्याने रस्त्याच्या मधोमध मरण पावलेली कर्णनची दुर्दैवी बहीण आणि इतरही अशाच अभागी बालकांचे मुखवटे घातलेले आत्मे गावकऱ्यांकडे आणि विशेषतः कर्णनकडे आशेने पाहत असल्याचं प्रतीकात्मक दृश्य सिनेमात अधूनमधून येत राहतं. रस्त्याच्या मधोमध फिट येऊन पडलेल्या मुलीवर दुर्लक्ष करीत निघून जाणारी वाहने आणि हे दृश्य टॉप अँगलने टिपणारा देवरूपी निष्क्रिय कॅमेरा, शीर नसलेला देव, घोडेस्वाराविना दिसणारा उमदा घोडा, पुढील पाय बांधलेले असल्याने खुरडत चालणारं गाढव, घारीने उचलून नेलेलं कोंबडीचं पिल्लू, घरातील पाळीव डुकरं, भटकी कुत्री, उरल्या सुरल्या अन्नावर आशाळभूत नजर ठेऊन असलेल्या मांजरी, झाडा-पानांवरील किडे, गळ टाकून मासे पकडण्याचा प्रसंग अशी या सिनेमाचा भौगोलिक आणि सामाजिक संदर्भ स्पष्ट करणारी विविध प्रतीकं या सिनेमात फ्रेमोफ्रेमी विखुरलेली दिसतात. (त्यामुळे समीक्षकांना आपल्या प्रतिभेचे पिसारे फुलविण्यासाठी फुल्ल स्कोप आहे)

अल्पसंख्याकांच्या गावाला बस स्टॉप मिळू नये म्हणून बहुसंख्याकांनी केलेला विरोध आणि तरीही अल्पसंख्याकांनी आपल्या हिकमतीवर बस स्टॉप मिळविल्या नंतर, त्या स्टॉपवर बस थांबू नये म्हणून बहुसंख्याकांनी केलेले विविध उपदव्याप ह्याचा अनुभव मी स्वतः १९८९ ते १९९२ या काळात मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माझ्या गावात घेतलेला असल्याने हा सिनेमा मला जास्त रिलेट करता आला असावा, अधिक भावला असावा असे मला वाटते.

आपला हा कर्णन देखील महाभारतातील कर्णासारखाच आहे. दोघांनाही वर्ग संघर्ष सोसावा लागला आहे, आपली ओळख बनविण्यासाठी झगडावं लागलं आहे, आपल्या कलेत सर्वश्रेष्ठ असूनही पराभव पत्करावा लागलेला आहे. आणि केवळ ज्या एका व्यक्तीने त्याला आपलंसं केलं, प्रेम दिलं त्या दुर्योधनाला ना महाभारतातला कर्ण वाचवू शकला ना आपल्या सिनेमातला कर्णन.

सिनेमाचा सुरुवातीचा भाग तसा बऱ्यापैकी संथ आहे. पण कर्णनने गाढवाचे पाय मोकळे केल्यावर मात्र गाढव, कर्णन आणि सिनेमा तिघेही सुसाट सुटतात.

मुख्य भूमिका निभावणारा धनुष, सर्वच सहकलाकार, सिनेमातील गाणी, पार्श्वसंगीत आणि सर्वच तांत्रिक बाबीत सिनेमा उत्तम झालाय. सिनेमातल्या दृष्य चौकटी, पाश्वसंगीत सगळंच इतकं सुंदर आहे की हा सिनेमा थिएटर मधे मोठ्या पडद्यावर पाहता येत नसल्याची रुखरुख लागून राहते.

जातीभेद आणि त्याआधारे उच्च वर्णीयांकडून निम्न वर्णियांवर होणारे अन्याय, अत्त्याचार हे तुम्हा-आम्हा शहरी मध्यम वर्गीयांसाठी वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनल वर चघळायचे विषय असले तरी मारी सेल्वराज हा या सिनेमाचा दिग्दर्शक आपल्याला अडीच तासापुरता त्या शोषितांच्या, वंचितांच्या, सोबत बसवून त्यांच्या हाल-अपेष्टांत, त्याच्या घुसमटीत सामील व्हायला लावतो हे या सिनेमाचे खरे यश म्हणता येईल.

सॅबी परेरा