सुनीता कुलकर्णी

काश्मीरमध्ये बर्फ पडायला सुरूवात झाल्याच्या बातम्या आल्या की माध्यमांमध्ये त्या संबंधीची छायाचित्रं बघूनच आपल्याला हुडहुडी भरते. बाहेर बर्फ भुरभुरत असताना गरम कपडे घालून, शेकोटीजवळ बसून चहाचे घोट घ्यायचे ही आपली बर्फवृष्टीबद्दलची रम्य कल्पना असते. पण प्रत्यक्षात ते तितकं रम्य नसतं.

बर्फ पडल्यामुळे प्रचंड थंडी पडते. स्थानिक लोकांना तिच्याशी दोन हात कसे करायचे ते माहीत असतं. पण घराबाहेर पडायचं तर सगळा परिसर बर्फमय होऊन गेलेला असतो. रस्ते बर्फाखाली गाडले गेलेले असतात. वाहन चालवणं दुरापास्त होऊन बसतं. अशा वेळी यंत्राचा वापर करून बर्फ ओढून वाहनांसाठी रस्ता नीट केल्याची दृश्य आपण इंग्रजी सिनेमात पाहिलेली असतात. हेच अगदी आपल्या काश्मीरात देखील घडतं. बर्फाच्या अतिवृष्टीमुळे श्रीनगर- जम्मू महामार्ग बर्फाखाली जातो. गेल्या आठवड्यात तर बर्फाच्या अतिवृष्टीमुळे पर्यटकांसाठीची विमानसेवा स्थगित करण्यात आली होती. उत्तर काश्मीरमध्ये १२ तर दक्षिण काश्मीरमध्ये पाच इंचाचा बर्फाचा थर सगळीकडे पसरला होता. स्थानिक लोकांसाठी हे सगळं कटकटीचं आणि सवयीचं असलं तरी खास बर्फ पाहण्यासाठी तिथे गेलेल्या पर्यटकांना मात्र या सगळ्याचीच गंमत वाटते.

आपल्याकडे जसा पावसाळा नेमेचि येतो तसा काश्मीरमध्ये बर्फही नेमेचि पडतो. याहीवर्षी पडला. सालाबादप्रमाणे रस्ते बर्फाखाली गेले. नेहमीप्रमाणे त्याच्या बातम्या झाल्या. पण त्या सगळ्यामध्ये एक बातमी घोड्यावरून दौडत आली.
ती बातमी होती काश्मीरच्या श्रीनगरमध्ये अॅमेझॉनच्या पार्सलची डिलिव्हरी देणाऱ्याची माणसाची. बर्फवृष्टीमुळे रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाल्यामुळे या डिलिव्हरी बॉयनं चक्क घोडदौड करत आपल्या पार्सलची डिलिव्हरी केली.

छायाचित्र पत्रकार उमर गनी यांनी या आगळ्यावेगळ्या डिलिव्हरीचा व्हिडिओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून प्रसारित केल्यानंतर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करताना अॅमेझॉनचे सीईओ जेझ बेझो यांना टॅग केलं. इर्तुर्गुल (Ertugrul) या तुर्की मालिकेपासून अॅमेझॉनने प्रेरणा घेतली आहे का असंही अनेकांनी विचारलं आहे. अॅमेझॉन इर्तुर्गुल स्टाइल असंही कौतुक अनेकांनी केलं आहे. हा व्हिडिओ बघून काहींनी अॅमेझॉनकडे करोना लसीच्या वितरणाचं काम द्या असंही कौतुक केलं आहे.

अॅमेझॉन इंडियानेही या व्हिडिओला दुजोरा दिला आहे.
अडचणीवर मात करत आपलं काम चोखपणे आणि अभिनव पद्धतीने करणाऱ्या या जिद्दी माणसाच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायलाच हवी.
समाप्त