09 March 2021

News Flash

Blog: मनातल्या ‘कवितांचा कॅफे’!

काळानुरुप कविता चालावी आणि रसिकांपर्यंत ती सहजपणे पोहोचावी यासाठी आम्ही कविता कॅफे या यु ट्युब चॅलेलची निर्मिती केली असल्याचे संकेत म्हात्रे यांनी सांगितले.

शेखर जोशी

कविता मला स्फुरत असते, तिची पहिली ओळ सुचली की बोट धरून मी पुढे जात राहतो. त्याचवेळी ती ओळ मला कुठे नेणार आहे ते कळते, आधी कविता जन्मते आणि मग त्याचे गाणे होते’. कविवर्य पद्मभूषण दिवंगत मंगेश पाडगावकर यांनी प्रकट मुलाखतीमधून आपल्या काव्यरचनेचे मर्म असे वेळोवेळी उलगडले होते.

पाडगावकर म्हणतात ते खरेच आहे. कविता ही स्फुरावीच लागते. आपण प्रत्येकजण वेगवेगळे जीवनानुभव घेत असतो. त्यातून मनात नाना प्रकारच्या भावभावना उमटत असतात. त्यांना कथा, चित्र, कविता किंवा वेगळ्या शैलीत, स्वरुपात अभिव्यक्त केले जाते. ही अभिव्यक्तीही प्रत्येक व्यक्तिनुसार वेगवेगळी असते. प्रत्येक माणसाने आयुष्यात कधी ना कधी एकदा तरी कविता केलेली असते असे म्हणतात त्यात काही चुकीचे नाही.

सुचलेली, स्फुरलेली कविता आपल्यापुरती मर्यादित न ठेवता ती अनेकांपर्यंत पोहोचवली तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. कविता सादरीकरण हा प्रकार आपल्याला नवा नाही. पाडगावकर, विंदा करंदीकर, वसंत बापट यांनी कविता सादरीकरणाचा प्रयोग यशस्वी आणि लोकप्रिय केला. सुरेश भट यांनीही एकल कविता वाचनातून कविता, मराठी गझल तर पु.ल. देशपांडे, सुनिता देशपांडे यांनी बा. भ. बोरकर यांच्या कविता अभिवाचनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या. कवीवर्य शंकर वैद्यही कविता वाचनाचे कार्यक्रम करत असत. विसुभाऊ बापट हे ही ‘कुटुंब रंगलय काव्यात’या कार्यक्रमातून कविता सादर करत असतात. अलिकडच्या काही वर्षांत महेश केळुस्कर, अरुण म्हात्रे, अशोक बागवे, दिवंगत नलेश पाटील, अशोक नायगावकर, प्रसाद कुलकर्णी यांनीही कविता सादरीकरण लोकप्रिय केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित आणि नवोदित अशा कवींचे वेगवेगळे कविता सादरीकरण गेली अनेक वर्षे होत आहे.

कविता सादरीकरणाचा बाज, शैली, सादरीकरण बदलले गेले. सध्याच्या जमाना स्मार्ट भ्रमणध्वनी, इंटरनेट, यु ट्यूब आणि डिजिटलचा आहे. आजच्या काळाला अनुसरुन ‘कविता कॅफे’हे यु ट्युब चॅनेल सादर झाले आहे. कविता सादरीकरणाच्या या डिजिटल प्रयोगात तरुण कवी आपल्या कविता सादर करतात. कविता कॅफेचे काही भाग सादरही झाले आहेत. पहिल्या टप्प्यात पन्नास कवी आणि त्यांच्या कवितांचा समावेश करण्यात आला आहे. याची संकल्पना आणि दिग्दर्शन संकेत म्हात्रे यांचे असून निर्मिती प्रणव पाठक यांची आहे.

काळानुरुप कविता चालावी आणि रसिकांपर्यंत ती सहजपणे पोहोचावी यासाठी आम्ही कविता कॅफे या यु ट्युब चॅलेलची निर्मिती केली असल्याचे संकेत म्हात्रे यांनी सांगितले. आजच्या पिढीतील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवा पिढीमध्ये मराठी कवितांविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यापर्यंत चांगल्या मराठी कविता पोहोचाव्या हा मुख्य उद्देश यामागे असल्याचेही म्हात्रे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2018 4:33 pm

Web Title: kavita cafe youtube channel for new marathi poets
Next Stories
1 मराठी रंगभूमीने नाट्यरसिकांना लिहीलेले खुले पत्र
2 Statue of Unity: खरंच स्मारकं हवीत का?
3 BLOG: अंत्यविधीचे दिग्दर्शक!
Just Now!
X