News Flash

जन्म मृत्यूच्या अद्वैताची दृष्टी : दिठी

रामजीला सुख आणि दुःख, जन्म आणि मृत्यू ह्यातील अद्वैताची होणारी जाणीव हे या सिनेमाचं कथासूत्र.

-सॅबी परेरा

ज्ञानेश्वरीतील अमृतानुभवातल्या ‘ज्ञान-अज्ञान भेद कथन’ या प्रकरणात ‘आता आमोद सुनासि आले। श्रुतीशी श्रवण निघाले’ अशी एक ओवी आहे. ही ओवी ज्ञाता (जाणणारा) आणि ज्ञेय (जे जाणायचे ते) यांच्यातील अद्वैत दर्शविते. सुगंध आणि नाक, श्रुती आणि कान, दृश्य आणि डोळे, चाफा आणि केशसंभार, जीभ आणि चव, चकोर आणि चंद्र, फुल आणि भ्रमर अशा विविध पातळीवरील, विविध गोष्टींतले अद्वैत ज्ञानेश्वर दाखवून देतात.

दि. बा. मोकाशी ह्यांनी लिहिलेल्या ‘आता आमोद सुनासि आले’ या कथेवर आधारित तीव्र दुःख आणि त्यातून बाहेर पडण्याचा माणसाचा प्रवास यावर भाष्य करणारा ‘दिठी’ हा सिनेमा नुकताच सोनी-लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्यांतून निघून गेलेल्या सुमित्रा भावे या मराठीतील महत्वाच्या दिग्दर्शिकेचा हा शेवटचा आणि त्यांच्या आधीच्या सिनेमांइतकाच अर्थगर्भ सुंदर सिनेमा.

मागील तीस वर्षे सलग वारी करणाऱ्या, विठ्ठलावर अतीव श्रद्धा असणाऱ्या रामजी (किशोर कदम) नावाच्या एका लोहाराची ही कथा आहे. रामजीचा हाताशी आलेला, आईविना वाढलेला, एकुलता एक तरुण मुलगा नदीच्या पुरात वाहून गेलेला आहे, अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचे शरीरही मिळालेले नाही. त्यामुळे रामजीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रामजीची सुनबाई अकाली प्रसृत होऊन तिला मुलगी झालेली आहे. गावकऱ्यांना त्यांच्या सुखदुःखात मसलत देणारा, सर्व प्रश्नाची उत्तरे विठ्ठलाच्या पायाशी आहेत अशी त्यांची समजूत काढणारा रामजी स्वतःच आता सुन्न झालाय, त्याचे शरीर, मन, बुद्धी सारं काही गोठलंय. तरीही नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तो आपल्या साथीदारांसह साप्ताहिक पोथी पठणासाठी आलाय. पोथीत तो आपल्या दुःखाचे उत्तर शोधतोय. पण त्याचं कशातही लक्ष नाहीये. याच वेळी गावातील शिवाची गाय गर्भारपणात अडलेली असल्याचं त्याला कळते. अडलेल्या जनावरांची सुटका करू शकणारा गावातील एकच माणूस म्हणजे रामजी लोहार. पण तो स्वतःच नियतीने केलेल्या आघाताने कोलमडून गेलाय. त्या गाईची सुटका करता करताच रामजीला सुख आणि दुःख, जन्म आणि मृत्यू ह्यातील अद्वैताची होणारी जाणीव हे या सिनेमाचं कथासूत्र.

रामजी सोबत नित्यनेमाने ज्ञानेश्वरीचे वाचन करणार्‍या इतर माळकर्‍यांनाही रामजीचे दुःख जाणवते पण ते दुःख हलके कसे करावे, हे त्यांना उमगत नाही. रामजी इतक्या जवळचा, पण त्याचं दुःख आपल्याला लागत नाही ह्याचं त्यांना सखेदाश्चर्य वाटते. आपण रामजीसाठी कळवळतो, पण आपलं आतलं सुशेगाद मन हलत नाही. आपलं सगळं ठीकठाक असल्याची भावना नि तिची ऊब कधी आटत नाही, आपण रामजीच्या दुःखाशी ते तादात्म्य पावू शकत नाहीत, त्याचाशी अद्वैत साधू शकत नाहीत ह्याचं त्यांना वैषम्य वाटत राहतं.

रामजीचा मुलगा गेला तरीही तो त्याच्या विठ्ठलावर चिडलेला नाहीये. पण त्याला प्रश्न मात्र जरूर पडलेत. आपण तीस वर्षे नेमाने वारी केली त्या वारीचं पुण्य कुठे गेलं? ऐन तारुण्यात मुलगा मरून जावा त्याच्या म्हाताऱ्या वडिलांनी, असहाय बायकोने आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाने दुःखाच्या अंधारात खितपत पडावं हे कसलं नशीब, हे कसलं प्राक्तन? आपला जीव देवात आहे की आपल्या मुलात आहे की आपण तिसरेच कुणी आहोत? जर आपला जीव देवात असेल तर मुलगा गेल्याने आपण असे निश्चेष्ट, निर्जीव का झालोय? अशा प्रश्नाच्या गर्तेत भिरभिरत असताना त्याला ‘रामजी बाबा, धाव’ अशी हाक ऐकू येते. ही हाक नक्की कुणाची आहे? अडलेल्या गाईची सुटका करण्यासाठी बोलावणाऱ्या शिवाच्या बायकोची?, अडलेल्या गोमातेची?, बाहेरच्या जगात यायला उत्सुक असलेल्या वासराची? पुरात वाहून गेलेल्या आपल्या प्रिय मुलाची? की, सुख-दुःखाच्या, जन्म-मरणाच्या अद्वैताची प्रचिती देण्यासाठी तो खुद्द विठ्ठलच रामजीला बोलावतोय?

सिनेमाचा विषय पाहता तो शब्दबंबाळ होण्याचा धोका होता पण हा धोका सफाईदार पणे टाळून सतत पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीचा वातावरण निर्मितीसाठी सुरेख वापर करून, मोजक्या आणि नेटक्या दृश्यांमधून रामजीची मनःस्थिती आणि एकंदर कथा उलगडण्यात दिग्दर्शिका यशस्वी झालेल्या आहेत. गाणी, पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी आणि इतर तांत्रिक बाबीही उत्तम आहेत.

मोहन आगाशे, उत्तरा बावकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, अमृता सुभाष, कैलास वाघमारे अशा सगळ्याच तगड्या कलाकारांनीं अक्षरशः आपापल्या भूमिका जगलेल्या असल्या तरी किशोर कदमचा या सिनेमातील अभिनय हा त्याच्या आजवरच्या सिनेमातील भूमिकांचा कळस म्हणायला हरकत नाही.

सिनेमाच्या उत्तरार्धात मुलाच्या दु:खानं व्याकुळ झालेल्या, मुक्या झालेल्या रामजीचा सीन आहे. रामजी दगडासारखा झालेला आहे आणि पोथी पठणासाठी जुन्या घराच्या माळ्यावर एका खांबाला टेकून कसलीही हालचाल न करता बसलेला आहे. या सीनमध्ये रामजीच्या तनामनाची बधिरता, सुन्नपणा कुठलीही हालचाल न करता किशोर कदमने ज्या प्रभावीपणे दाखविली आहे की त्यासाठी त्याची जितकी स्तुती करू तितकी कमी आहे.

‘एक तरी ओवी अनुभवावी’ या संत नामदेव महाराजांच्या वचनाला साद देऊन ज्ञानेश्वरीतील ‘आता आमोद सुनासि आले। श्रुतीशी श्रवण निघाले’ ही ओवी अनुभवायची असेल तर सुमित्रा भावे दिग्दर्शित ‘दिठी’ सिनेमा पहायलाच हवा.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2021 3:20 pm

Web Title: kishor kadam amrutha subhash starer dithee marathi movie review by sabby parera kpw 89
Next Stories
1 दबलेल्या श्वासांना दृश्यरूप देणारा सिनेमा : कर्णन
2 Roman Lipit Lihinarya मराठी बहाद्दरांविषयी…
3 Blog: सुपरहिरोंची घराणेशाही
Just Now!
X