– चेतन दीक्षित

आदरणीय तात्याराव,

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

तात्या खरंतर पत्र लिहायला बरीच दशके उशीर झालाय. आम्ही हे आधीच लिहायला हवं होतं. कदाचित इतकी दशके शब्दांनी जुळवाजुळव करायला घेतली असावीत. असो..

तात्या इतिहासामध्ये त्यालाच न्याय मिळतो ज्याला शब्दांची जोड असते. शब्दांची जोड असूनही नुसते चालत नाही, तर त्या शब्दांना व्यक्त होण्यासाठी तेवढी संधीसुद्धा मिळावी लागते. आपण इतिहासात इतकी थोर व्यक्तिमत्वे पाहतो, ज्यांना केवळ ‘ती’ संधी मिळाली नाही म्हणून त्यांची बाजू तेवढ्या प्रभावीपणे आपल्यासमोर आली नाही. आम्ही तर इतक्या थोरांना आमच्या पाठीवर वाहून नेलंय, ज्यांची इतिहासात नोंदसुद्धा नसेल.

तात्या, त्या अभागी लोकांमध्ये आमचंसुद्धा एक नाव आहे.

आम्ही आज आमच्यापरीने आमची बाजू मांडायचा प्रयत्न करणार आहोत, कारण इतके दशके “तो” आरोप आम्ही मूकपणे सहन करतो आहोत. लोकांना आमची गाज ऐकू येते पण आमचा आवाज कधीच ऐकू येत नाही. आज आम्ही आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत, यथाशक्ती.. खरंतर एका शब्दप्रभूपर्यंत माझे शब्द कितपत प्रभावी पोहोचतील ही शंका मनात सारखी डोकावत राहील.. पण आपल्याला आमचा हा आवाज ऐकावाच लागेल, जिथे कुठे असाल तिथून.. विनंतीवजा आदेश समजा हवं तर..

तात्या, जेंव्हा जेंव्हा तुमच्या कर्तृत्वाचा, तुमच्या साहित्याचा विषय निघतो, तेंव्हा हमखास तुमच्या “सागरा प्राण तळमळला” ह्या कवितेची चर्चा होतेच. जेंव्हा जेंव्हा आमच्या कानी ही कविता पडते, हृदयनाथांनी सुरबद्ध केलेलं ते गाणं ऐकू येतं, एक वेदना खोलवर चमकत जाते. आम्ही अगदी तळापासून अस्वस्थ होऊन जातो ओ. तात्या हे, खरंच, सहन होण्यापलीकडचंय..

ज्या भारतमातेच्या चरणावर आम्ही रात्रंदिवस अभिषेक करत असतो, त्याच भारतमातेच्या थोर सुपुत्रावर आम्ही अन्याय कसा करू शकतो? तात्या, आम्हाला थोडीजरी जरी कल्पना असली असती, कि तुमच्या वाट्याला मरणालासुद्धा लाजवणारे प्रसंग कोसळणार आहेत, तात्या त्या विधात्याची शप्पथ घेऊन सांगतो, तुमचे जहाज आम्ही पुढे जाऊच दिले नसते. भारतमातेचा निरोप घेताना तुमची होणारी घालमेल आमच्या प्रत्येक लाटेने पाहिलीये, तात्या. आपले जहाज सुटताना उगाच लाटांनी उंची गाठली नव्हती.

तात्या शिकाऱ्याच्या पिंजर्यात हरीण अडकले नव्हते. तो पिंजरा हा वाघासाठी होता आणि वाघ अडकला होता. हरीण एवढं सहन नाही ओ करू शकत. तात्या, मार्सेलिस ची ती जगप्रसिद्ध उडी जेंव्हा आपण मारली होती तेंव्हा आपण माझ्या कुशीत शिरला होतात.. तुम्हाला कडकडून मिठी मारू वाटत होतं, आमच्या सहस्त्र भुजांनी.. पण काय करणार? समुद्र म्हणून ‘ती’ आमची मर्यादा आडवी आली. कितीजरी वाटलं तरी तशी मिठी मारण्याची परवानगी आम्हाला नाही. पण जेंव्हा जेंव्हा आम्ही ‘ती’ मर्यादा ओलांडतो, तेंव्हा विध्वंसच होतो ना. तेंव्हा आम्ही आमची मर्यादा ओलांडणं योग्य दिसलं नसतं. म्हणून, आम्ही आम्हाला आवरलं.

महापुरुषांना मर्यादा हेच आव्हान असते. ते मर्यादा झुगारतात. देशाचं भवितव्य ठरवतात. त्यांच्या दिशा कधीच अंधाराने झाकोळल्या जात नाहीत. उलट इतरांच्या आयुष्यात प्रकाशाचे दार उघडून देतात. आमच्यापेक्षा मोठे होतात. तात्या.. तात्या… तुम्ही तर सर्वकाही भारतमातेसाठीच केलंत, जी विद्या भारतमातेच्या उपयोगासाठी नाही तिला तुम्ही व्यर्थ भार मानलंत.. तुमच्यासारख्या श्रेष्ठ विभूतींची तगमग आम्ही आमच्या सहस्त्र लाटांच्या रूपाने ब्रिग्टनच्या किनारी पहिलीये.. तो किनारा धन्य झाला ओ तुमच्या स्पर्शाने..

तात्या… आम्ही भुलवलं नाही ओ तुम्हाला अजिबात.. प्रभू श्रीराम सुद्धा आमच्या किनारी आले होते. ते सुद्धा खूप अगतिक झाले होते, सीतेसाठी. पण तिथेसुद्धा केवळ त्यांची सेना होती, म्हणून सेतू बांधला गेला. आम्ही काय करू शकलो? बर्याचदा आम्हाला आमचे आस्तित्व हीच आमची खूप मोठी समस्या वाटते. आपल्या बाबतीत नेहमीच प्राक्तनाची योजना प्रतिकूल असायची. प्रभू श्रीराम त्यांच्या सीतेसाठी अस्वस्थ होते, आपण आपल्या मातेसाठी अस्वस्थ होता.. आणि तुमची अस्वस्थता असहायपणे पाहण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नव्हतो.. वाहकाशिवाय वहनाच्या माध्यमाला काहीच किंमत नसते तात्या..

तात्या तुम्ही मला नदीच्या विरहाची शपथ घातलीत आणि खूप मोठी अडचण केलीत. नदी माझ्यात मिसळते आणि तिचे आस्तित्व हरवून बसते ओ.. तसं पाहिलंत तर तोही विरहच नाही का? अनादीअनंत काळ, तो विरह आम्ही सहन करतो आहोत, तात्या.. अशी ती आवेगाने धावत धावत येते आणि एकदम गायब होऊन जाते ओ आमच्यात, क्षणार्धात.. खूप काही बोलायचं असतं, जाणून घ्यायचं असतं, काहीच बोलता येत नाही, जाणून घेता येत नाही.. नाहीशीच होऊन जाते आमच्यात.. आणि अशी मिसळून जाते कि शोधून शोधून आम्ही थकून जातो आणि मग वरच्या चंद्राला जाब विचारू पाहतो.. लोकांना फक्त लाटाच दिसतात.. फक्त लाटाच..

जग कदाचित ह्याला अद्वैताची परीसीमा म्हणत असेल, पण खरंतर ती विरहाचीच परीसीमा नाही का? आम्हाला त्या नदीचा नदी म्हणून सहवास कधीच मिळत नाही. तात्या, त्यात, तुमच्या विरहाच्या शपथेने नेहमी निघणारी “ती” खपली परत एकदा निघते आणि ती जुनी जखम नव्याने भळभळू लागते, ओ.. तीच भळभळणारी जखम साक्षीला ठेवून, आम्ही, हे पत्र लिहतोय.

तात्या ब्रिग्टनच्या किनाऱ्यावर तुम्ही अस्वस्थ मनाने बसला होता. तुमची नजर आमच्यावर आग ओकत होती. अस्वस्थ येरझाऱ्या घालत होता.. तेंव्हा आमच्या अस्वस्थतेला सुद्धा उधाण आलं होतं ओ.. आमच्या लाटांवरचा फेस पाहून आम्ही हसतोय, असा आपला गैरसमज झाला तात्या. ती आमची अस्वस्थता होती तात्या.. अस्वस्थता.. एकदा का कुठल्यातरी थोरत्वाचा शिक्का बसला, कि गैरसमजाची असंख्य परिमाणे अस्तित्वाला घट्ट चिकटली जातात. आपल्या अस्वस्थतेवर आम्ही हसत होतो हा एक मोठ्ठा गैरसमज आमच्या अस्तित्वाला घट्ट चिकटून बसलाय.

अटकेपार झेंडा जिचा फडकावला गेलाय तिला आम्ही अबला म्हणून का हिणवू तात्या? उलट आम्ही स्वतःला सामर्थ्यहीन समजू लागलो आहोत. आम्हीच ब्रिटिशांना ह्या पवित्र-भूमीपर्यंत पोहोचवलं होतं, सारी कल्पना असूनसुद्धा.. ना आम्ही त्यांना तिथेच बुडवू शकलो ना त्यांची वाट अडवू शकलो. ती अपराधित्वाची भावना अजून सुद्धा आमच्या मनात घर करून आहे.

तात्या, कालकेयांना मारण्यासाठी अगस्ती-ऋषींनी आमचे पूर्णपणे प्राशन केले होते, तेंव्हासुध्दा एवढी घुसमट झाली नव्हती, एवढी घुसमट आपण जेंव्हा आमच्या किनारी येऊन आर्जवे करत होता, तेंव्हा आमच्या असहाय्यतेने आम्ही अनुभवत होतो.. अगस्ती-ऋषी जर तिथे आले असते तर, तुम्ही कशाला, सगळ्यात आधी आम्हीच स्वतः त्यांना विनंती केली असती कि “माझे पुन्हा प्राशन करा, जोपर्यंत तात्यांची आणि तात्यांच्या भारतमातेची भेट होत नाही”.

तात्या निसर्ग कधीच कोणाला स्वामी मानत नाही. वा गुलाम मानत नाही. तो फक्त वेळेची वाट पाहत असतो. निसर्गाकडून कधीच लगेच प्रतिक्रिया मिळत नाही. आम्ही विधात्याच्या आज्ञेला बांधील असतो. लगेच प्रतिक्रिया देता येत नाही. घडा भरला वा नाही हेही ठरवायचे आमच्या हातात नसते.. झाडे, पर्वत, दर्या, भूमी, आम्ही काही काही करू शकत नाही.. असहायपणे आजूबाजूला पहात राहणे, हेच आमच्याकडून अपेक्षित. त्याच्यात ढवळाढवळ करण्याचा ना आम्हाला अधिकार ना आमचे ते सामर्थ्य.

आमच्या सामर्थ्याला ह्या अश्या किनाऱ्यांनी फार मोठी पाचर मारून ठेवलीये ओ..

हे तळमळणे केवळ आमचेच नाही तर ज्या ज्या किनाऱ्यांना आपला स्पर्श झालाय त्या सर्व किनाऱ्यांचेसुद्धा आहे. अंदमानाच्या जखमेचा तर अंदाज सुद्धा कोणी लावू शकणार नाही. अंदमानाला जर जिव्हा असल्या असत्या तर त्या मणीशंकराच्या कानातून रक्ताच्या धारा लागल्या असत्या. अर्थात भिंतीवरची अक्षरे पुसता येतात, पण काळाच्या भाळावर लिहिलेली अक्षरे कशी पुसणार?

तात्या “सागरा प्राण तळमळला” ही कविता अशीच काळाच्या भाळावर लिहिलेली गेलेली कविता आहे.. जोपर्यंत ह्या विश्वामध्ये देशभक्ती जिवंत आहे, तोपर्यंत आपली कविता धगधगता आत्मदाह व्यक्त करीत राहील, ह्यात शंका नाहीच. पण आमच्या मनावरचे घाव मात्र तसेच वाढत राहतील.

तात्या पण एक सांगू कधी कधी असं वाटतं कि, ह्या कवितेच्या निमित्ताने आमचेही नाव आपल्यासोबत अनंत काळापर्यंत जोडले गेलेय हे काय कमी आहे?

असा विचार करून आमचं तळमळणं जरा कमी होतं.

तात्या काय बोलू अजून? आमच्याकडे पाण्याचा एवढा प्रचंड साठा असून मनुष्याला ते पाजता येत नाही. आपल्याकडे शब्दांचा एवढा प्रचंड साठा होता. आपण मराठी भाषा समृद्ध केलीत. तेवढी शब्दांची समृद्धता आमच्याकडे नाही.. आम्ही थांबतो..

तात्या… पण ऐकताय ना? काही उपमर्द झाला असल्यास, माफ कराल ना?

सदैव आपलाच,
तळमळलेला समुद्र