लाखोच्या संख्येने लोक मुंबईत रोजगारासाठी येतात. त्यातले असंख्य लोक हे परराज्यातील आहेत. या मायानगरी मुंबईत हाताला काम मिळतं. त्यामुळे पोटापाण्याची सोय होते. मग, एकटा आलेला कामगार काही काळानंतर आपलं कुटुंबही मुंबईत वसवतो. पण, गेल्या काही दिवसांत परिस्थिती बदलली. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने देशात लॉकडाउन जाहीर झाले. रेल्वे बंद केल्या गेल्ंया. बस, खासगी वाहतूक सेवा बंद करण्यात आली. राज्यांच्या-जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या गेल्या आणि हे मजूर मुंबईतच अडकून पडले. २१ दिवसांच्या लॉकडाउननंतर यातून सुटका होईल, अशी आशा असणाऱ्या मजुरांची खदखद आता बाहेर पडू लागली आहे.

त्यामागची कारणे शोधण्याचा हा प्रयत्न

१. मूळ गावी जाऊ द्या…
गेल्या २१ दिवसांपासून अनेक जण जिथेच्या तिथे अडकून पडले आहेत. कोणालाच आपल्या गावी जाता येत नाही. त्यात लाखो मजुरांचाही समावेश आहे. या कठीण काळात आपल्याला मूळ गावी जाता यावं, अशी त्यांची मागणी होती. लॉकडाउन जाहीर होण्याच्या आधीही अशीच गर्दी स्टेशन्सवर जमली होती. तेव्हा कोणतीही ट्रेन न पकडू शकलेले आणि त्यानंतर ट्रेन रद्द झाल्याने अडकून पडलेले मजूर आता आपल्याला गावी जाता येईल या आशेत होते. मात्र, १४ एप्रिलला संपणारा लॉकडाउन वाढून तो ३ मे पर्यंत करण्यात आला. त्यामुळे आता गावी जाणं शक्य नाही, या रागाने हे मजूर रस्त्यावर उतरले होते. मुंब्र्यात, वांद्र्यात जे मजूर रस्त्यावर उतरले होते त्यांची प्रामुख्याने एकच मागणी होती. मूळ गावी जाऊ द्या.

२. काम नाही त्यामुळे खाण्याचे वांदे
रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे या करोना व्हायरसमुळे वांदे झाले आहेत. लॉकडाउनमध्ये कोणताच व्यवसाय सुरू नाही. त्यामुळे हाताला कोणतेही काम नाही. काम नाही म्हणून पैसाही नाही. त्यामुळे या मजुरांच्या खाण्या-पिण्याची समस्या निर्माण झाली. राज्य सरकार या मजुरांची सोय करण्याचा प्रयत्न करतेय. पण, कुठेतरी मजुरांमधील राग आता अनावर होऊ लागला आहे.

३. राहायची व्यवस्था नाही
अनेक मजूर झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आहेत. काही मजूर भाड्याच्या घरात राहतात. त्यांना रोजच्या खाण्याची भ्रांत निर्माण झाल्याने या घराचे भाडे तरी कसे देणार अशीही समस्या अनेक मजुरांसमोर उपस्थित झाली आहे. या परिस्थिती आपल्या गावी जाण्याची सोय तरी असावी, अशी या मजुरांची मागणी असल्याचे दिसते.

४. २१ दिवसांनी गावी जाता येईल, अशी होती आशा 
२१ दिवसांपूर्वी ट्रेन सुरू होत्या. वाहतूक व्यवस्था सुरू होती. त्यामुळे आपल्याला आज ना उद्या गावी जाता येईल, अशी या मजुरांना आशा होती. पण करोनाची परिस्थिती बिघडत गेली आणि त्यांना ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी राहावं लागलं. आता १४ तारखेला काहीतरी शिथीलता येईल आणि आपल्याला गावी जाता येईल, अशी या मजुरांना अपेक्षा होती. मात्र, करोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून केंद्र सरकारनं लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवला. त्यामुळे मजुरांचा अपेक्षाभंग झाला. आता आणखी १९ दिवस आपल्याला गावी जाता येणार नाही, या रागातून हे मजूर रस्त्यावर उतरल्याचे तेथील लोकांचे म्हणणे आहे.