05 December 2020

News Flash

समाजमाध्यमं द्वेषाची केंद्र! -हॅरी- मेगन

ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन यांनी व्यक्त केली चिंता

संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

-जय पाटील

समाजमाध्यमं खरंतर लोकांना जवळ आणण्यासाठी, संवादासाठी निर्माण केली गेली. पण प्रत्यक्षात त्यांचा वापर वादविवाद आणि चिखलफेकीसाठीच अधिक केला जाऊ लागला आहे. समाजमाध्यमांमुळे समाजात जी तेढ निर्माण होत आहे, त्याविषयी ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन यांनी नुकत्याच झालेल्या एका चर्चेत चिंता व्यक्त केली.

‘समाजमाध्यमांमुळे द्वेषभावनेचा प्रसार वेगाने होऊ लागला आणि आज ही जागतिक समस्या झाली आहे. त्याचा परिणाम लोकांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. समाजमाध्यम हे बिनबुडाच्या बातम्या पसरवण्याचं साधन ठरू पाहात आहे,’ असं मत हॅरी यांनी नोंदवलं. समाजमाध्यमांतील नकारात्मकतेविरोधातील आपल्या मोहिमेबद्दल या दाम्पत्याने माहिती दिली. ‘टाइम हंड्रेड टॉक्स’ने या परिसंवादाचे आयोजन केले होते. समाजमाध्यमांच्या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ त्यात सहभागी झाले.

‘समाजमाध्यमांच्या गैरवापरामुळे केवळ मानसिक आणि भावनिक समस्याच निर्माण झालेल्या नाहीत, तर आपल्या माणूसपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होईल, अशी तिथली स्थिती आहे. आपल्या ऑनलाइन विश्वात जे घडतं त्याचे पडसाद आपल्या ऑफलाइन आयुष्यातही उमटतात,’ असं मत मेगन यांनी मांडलं. ‘मी काही वर्षांपूर्वीच समाजमाध्यमांवरची माझी सर्व व्यक्तिगत खाती बंद केली. माझ्याबद्दल ऑनलाइन काय लिहिलं, बोललं जातं हे मी पाहत देखील नाही. हा स्वतःला जपण्याचा मार्ग आहे,’ असंही मेगन यांनी सांगितलं.

ब्रिटिश राजघराण्यातील व्यक्तींवर तिथली जनता आणि विशेषतः माध्यमांचं अतिशय बारकाईने लक्ष असतं. त्यांच्या प्रत्येक हालचालीचं कठोर मूल्यमापन केलं जातं. राजघराणं ब्रिटिशांना अतिशय प्रिय आहे. पण त्यामुळेच या सदस्यांना कायम शिष्टाचारांच्या चौकटीतच राहावं लागतं. हॅरी आणि मेगनने याचा अनुभव चांगलाच घेतला आहे. समाजमाध्यमांवर सातत्याने होणारं मूल्यमापन किती त्रासदायक ठरू शकतं, त्याचे जागतिक मानसिक शांततेवर काय दुष्परिणाम होऊ शकतात, याविषयीची चिंता त्यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 9:19 pm

Web Title: lokprabha special social media centre of hatred bmh 90
Next Stories
1 कुठं कुठं जायाचं फिरायला…?
2 BLOG : भाजपामध्ये ‘डिसलाइक’ची दहशत?
3 BLOG : …म्हणून आल्फ्रेड नोबेल यांनाही म्हटलं गेलं होतं ‘मौत के सौदागर’
Just Now!
X