09 August 2020

News Flash

BLOG : माधुरी दीक्षित, करिना कपूर, इशा कोप्पीकर आणि राजकारण

केवळ ग्लॅमर म्हणून ही जबाबदारी दिली जात नाही, नक्कीच कर्तृत्व सिध्द करण्याची ही संधी असते.

माधुरी, करिना आणि इशा

दिलीप ठाकूर

अभिनयाचे क्षेत्र असो वा राजकारणाचे, योग्य टायमिंग खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्याला जमली तो जिंकला…. पण या दोन क्षेत्राचेही घट्ट नाते आहे आणि ते नेमके निवडणूक जवळ आली रे आली की उफाळून वर येते. आज काय या स्टारने अमक्या पक्षात प्रवेश केला, उद्या काय अमक्या स्टारला अमूकतमूक पक्षाची उमेदवारी मिळणार….महत्वाचे म्हणजे ही दोन्ही क्षेत्रेही समाजातील इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच अनेक गोष्टींनी सामावलीत.

येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत पहिली खमंग आणि खुमासदार फिल्मी ब्रेकिंग न्यूज ठरली, माधुरी दीक्षित पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपची उमेदवार असेल. त्यावर काही चॅनेल्सवर चक्क तासभर चर्चा रंगली. त्यात एक मुद्दा आणि गुद्दा नेहमीचाच (आणि जुनाच) फिल्म स्टार्सनी राजकारणात यावे का? ( अथवा का यावे?) लगेचच यापूर्वी जे स्टार आमदार/खासदार झाले यांचे प्रगती पुस्तक तपासले गेले. तोही एक फ्लॅशबॅकच! तर दक्षिणेकडील राज्यात फिल्म स्टार्स मुख्यमंत्री बनतात, तर मग देशभरातील तारे तारका राजकारणात आले तर गैर काय असा महत्त्वाचा मुद्दाही समोर आलाच. इतकं करुनही माधुरीकडून तरी राजकीय वातावरणात ‘धक धक’ वाढावी असे कोणत्याही पक्षात पाऊल पडले नाही. पण निवडणुकीची चाहूल वाढली. काय सांगावे, त्यासाठीचीही ती एक चाल असावी. मिडियाला लागणारे ग्लॅमर आणि सनसनाटी असे दोन्ही त्यात आहे. भोपाळमधून करिना कपूर उमेदवार असावी ही स्थानिक भाजप नगरसेवकाची मागणी गाजताना, करिनाचे या क्षेत्रात येणे जणू नक्की आहे अशा पध्दतीने पसरली. बेबोचे पणजोबा पृथ्वीराज कपूर फार वर्षापूर्वी राज्यसभेचे खासदार होते, तर सासरे मन्सूर अली खान पतौडी यांनी १९७१ साली भोपाळमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती, ते पडले तो भाग वेगळा. पण यामुळे क्षणभर वाटलं की, बेबो कदाचित राजकारणात येईलही. पण ‘असे काहीही नाही ‘ असा तिचा खुलासा येईपर्यंत ही ‘स्टोरी ‘ सर्वाधिक वाचक वा दर्शक मिळवणारी ठरली. याचाच अर्थ, स्टार राजकारणात येतात याकडे समाजाचे नक्कीच लक्ष आहे.

सोशल मिडियात उलटसुलट पोस्ट येतात. मौसमी चटर्जीने भाजपमध्ये प्रवेश केला, तर ‘खल्लास गर्ल’ इशा कोप्पीकरने भाजपमध्ये प्रवेश करताच तिला वाहतूक विभाग संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात आले. निशा परुळेकरने गतवर्षी भाजपच्या तिकिटावर कांदिवलीत पालिका निवडणूक लढवली, पण प्रचाराला फारसा वेळ न मिळाल्याने पराभव झाला असे ती तेव्हा मला म्हणाली. तिला भाजपच्या चित्रपट संघटनेत उपाध्यक्ष केले. एक लक्षात घ्या, केवळ ग्लॅमर म्हणून ही जबाबदारी दिली जात नाही, नक्कीच कर्तृत्व सिध्द करण्याची ही संधी असते. अगोदरचे बरेच निष्ठावान कार्यकर्ते डावलून ही निवड होते हे राजकारण काही वेगळे असावे. जस जशी निवडणूक जवळ येईल, तशा अशा नेमणुका, स्टारचा राजकीय प्रवेश आणि उमेदवारीच्या बातम्या यांचे पेव फुटणार हे उघड आहे. आणि आता त्यात कसलाही कल्चरल शॉक राहिलेला नाही अथवा एखाद्या पक्षाची विचारसरणी पटली म्हणून एखाद्या स्टारने एकदम भावूक होऊन राजकारणात प्रवेश केला असे नसते. अर्थात, या सगळ्यामागची खेळी नेमकी काय आहे वा असते हे त्या स्टारला आणि पक्षप्रवेश देणारा यांनाच माहित. कार्यकर्त्यांनाही अनेकदा तरी हा ‘जोर का धक्का धीरे से लगे’ हेच असते. राज्यसभेतील नियुक्त कलाकार खासदार यात पुन्हा वेगळे. तेथे विविध क्षेत्रातील मान्यवराना प्रतिनिधित्व मिळावे अशी भूमिका आणि भावना आहे. पृथ्वीराज कपूर, नर्गिसजी यांच्यापासून ती सुरु झाली. त्याच परंपरेत कदाचित माधुरी दीक्षितची वर्णी लागू शकते. त्यामुळे तिचे मुंबईत डान्स अकॅडमी स्थापन करण्याची इच्छाही पूर्ण होऊ शकेल. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर राज्यसभेतील कलाकार खासदार अधिक जागरुक असतात. त्यांची उपस्थिती (खरं तर अनुपस्थिती) जास्त गाजते पण खासदार निधीचा वापर ते सामाजिक सेवेसाठी करतात. याउलट लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास कलाकाराचे नाव आले की भुवया उंचावतात. आपल्या मित्राला मदत असे म्हणतच अमिताभ बच्चनने १९८४ साली अलाहाबाद मतदारसंघांतून समाजवादी पक्षाचे मुरब्बी राजकीय नेते हेमवतीनंदन बहुगुणा यांना भारी वोटोसे पराभूत केले ही ‘तारांकित निवडणूक ‘ प्रचंड गाजली. राजीव गांधी यांच्या मैत्रीखातर बीग बीने इंदिरा काँग्रेसची उमेदवारी स्वीकारली होती. तेव्हा त्याच्या विरोधात प्रचारात म्हटले गेले, हमारे अंगने मे तुम्हारा क्या काम है….

चित्रपट कलाकारांना निवडणूक उमेदवारी आणि मग ते योग्य आहे काय, त्यांची हार वा जीत हे एव्हाना छान रुळलयं. तेही इतके की, काही महत्वाची पदे, मानाचे पुरस्कार, यासाठी एखाद्या ( अनेकदा तरी सत्ताधारीच, त्याचेच विचार जवळचे वाटतात हा चित्रपटासारखाच योगायोग) राजकीय पक्षात गेलेले बरेच असते हे एव्हाना सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात छान रुळलयं. आपण आता निवडणूक अधिकाधिक जवळ येताना आणखीन कोणता लहान मोठ्या कलाकाराला राजकारण जवळचे वाटते तेवढेच पाह्यचे. मग तो गोविंदा असेल तरी आश्चर्याचा धक्का नव्हता, पण राजकारणापासून दूर वा फटकून कोण बरे राहिलं असे नावही पटकन सांगता येत नाही अशी आणि इतकी ही कलाकार आणि राजकारण यांची युती झालीय. कोणी उघडपणे राजकारणात येतेय , तर अनेकांचा ‘छुपा पाठिंबा ‘ असतो इतकेच. तरीही जे अभिनय एके अभिनय करतात तेही आपल्या ‘भूमिके’ शी प्रामाणिक आहेत, आणि राजकारणातही अभिनयाचा कस लागतो असे मानत ‘फॉर अ चेंज ‘ एक पुढचे पाऊल टाकत राजकारणात जातात त्यांनाही शुभेच्छा. आणि ज्यांच्या संभाव्य उमेदवारीच्या ब्रेकिंग न्यूज गाजतात, त्यांनी आपल्याला ‘न्यूज व्हॅल्यू ‘ आहे असे समजावे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2019 12:27 pm

Web Title: madhuri dixit kareena kapoor isha koppikar and politics
Next Stories
1 मोदीजी, भाजपामध्येही आहे घराणेशाही ही घ्या यादी आणि आकडेवारी
2 Blog: जातीच्या भूगर्भातील सत्तेचे झरे
3 BLOG: प्रियंका गांधी काँग्रेससाठी तारक की मारक?
Just Now!
X