सुनिता कुलकर्णी

सुखराणी अहिरवाल या मध्य प्रदेशातील एका स्त्रीचा नुकताच वयाच्या ४५ व्या वर्षी १६ व्या बाळंतपणादरम्यान मृत्यू झाला ही इंडियन एक्स्प्रेसच्या इरम सिद्दीकी यांनी दिलेली बातमी आपल्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे धिंडवडे काढणारी आहे. दामोह जिल्ह्यामधल्या बतियागंज तालुक्यातल्या पधजरी गावात राहणारी ही सुखराणी तिच्या घरापासून अवघ्या पाच किलोमीटरवर असलेल्या रुग्णालयात १६ व्या बाळंतपणादरम्यान झालेल्या अतिरक्तस्त्रावाने मरण पावली.

घराच्या अंगणात बसून रडणाऱ्या सुखराणीच्या दोन वर्षांच्या सगळ्यात धाकट्या, १५ व्या मुलाला म्हणजेच आपल्या भावाला शांत करत सुखराणीची २३ वर्षीय मुलगी सविता सांगते की मी माझ्या आईवडिलांना कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करून घेण्याविषयी खूप वेळा सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही. मी माझ्या दोन मुलांच्या जन्मानंतर सासरच्यांच्या न सांगताच जाऊन शस्त्रक्रिया कशी करून घेतली हे पण तिला सांगितलं. पण माझं कुणीच ऐकलं नाही. मी दोन वर्षापूर्वी माहेरी आले होते तेव्हा ती १५ व्या मुलासाठी गरोदर होती. तेव्हाच तिची प्रकृती ठीक नव्हती. सविताचा हा सगळ्यात धाकटा भाऊ आणि तिचा मुलगा हे दोघेही एकाच वयाचे म्हणजे दोन वर्षांचे आहेत.

कल्लोबाई विश्वकर्मा ही पधजरी गावातली आशा कार्यकर्ती. तिच्याकडे असलेल्या नोंदींनुसार सुखराणीने १९९७ मध्ये पहिल्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर तिला ओळीने चार मुली झाल्या. २००५ मधल्या सहाव्या गरोदरपणात तिला एक मुलगा आणि मुलगी असं जुळं झालं. २००९ ते २०२० या काळात तिला आणखी पाच मुलं झाली. शिवाय तिचे तीन वेळा गर्भपात झाले. ही १२ बाळंतपणं आणि तीन गर्भपात या सगळ्यामधली आठ मुलं जगली नाहीत.

कल्लो विश्वकर्मा सांगते, तिने सुखराणीला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांसाठीच्या वैद्यकीय शिबिरांना नेलं होतं. तिथे तिच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक त्या प्राथमिक चाचण्या झाल्या, पण नवऱ्याच्या दबावाखाली असलेली सुखराणी तिथून गपचूप निसटली. स्थानिक प्रशासनानेही अगदी १५ व्या बाळंतपणानंतरही कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण आपण आता चाळिशी ओलांडली असल्यामुळे रजोनिवृत्ती येईल आणि या उपायांची गरजच पडणार नाही असं तिचं म्हणणं होतं.

मार्च २०२० पासून रजोनिवृत्तीमुळे आपल्याला ऋतुस्त्राव होत नाही असं तिला वाटत होतं, पण रजोनिवृत्तीमुळे नाही तर गर्भधारणेमुळे तिला ऋतुस्त्राव होत नव्हता हे या वर्षीच्या जुलै महिन्यात निष्पन्न झालं. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ती रुग्णालयात तपासणीसाठी गेली तेव्हा ती सात महिन्यांची गरोदर होती.

सुखराणीचा नवरा दुल्लाह शेतमजुरी करतो. तिचं हे १६ वं बाळंतपण धोक्याचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्याने ४० हजार रुपयांचं कर्ज काढून डॉक्टरांनी सांगितलेल्या चाचण्या करून घेतल्या. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना पाच लाखांच्या वैद्यकीय विम्याचं कवच देणारं आयुषमान भारत कार्ड या कुटुंबाकडे नाही. त्यामुळे त्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. ‘सुखराणीने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घ्यावी यासाठी तू का प्रयत्न केले नाहीस ?,’ असं विचारल्यावर तो सांगतो, ‘तिच्याच मनात त्या शस्त्रक्रियेची भीती होती.’

आठव्या महिन्यात सुखराणीला लोहाचे दोन डोस देण्यात आले. पण तरीही तिचा अशक्तपणा वाढत गेला. ११ ऑक्टोबर रोजी आठव्या महिन्यात तिला कळा सुरू झाल्या. रुग्णालयात नेईपर्यंत तिने मृत बाळाला जन्म दिला आणि स्वतचेही प्राण गमावले. तिच्या मृत्यूमुळे कुटुंब नियोजन कार्यक्रमातील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत.