– विक्रम वागरे, करंजफेन (राधानगरी)

राधानगरी तालुक्याचा पश्चिम भाग म्हणजे पावसाचं आगार.. सह्याद्री ओलांडून आलेला पाऊस इथे मनसोक्त बरसतो. म्हणूनच जवळजवळ ४० TMC पाणी साठवणारी लहानमोठी धरणे राधानगरी तालुक्यात आहेत. राधानगरीतली ही धरणे सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याची तहान भागवतात… पण आज तहान भागवणारं इथलं पाणी कोल्हापूर शहर, पूर्वेकडचे तालुके आणि पर्यायाने सांगलीसाठी जीवघेणे ठरतेय..

याच पश्चिम भागात माझं करंजफेन गाव आहे. गेले १५ दिवस सातत्याने संततधार झेलतो आहे हा विभाग.. नेहमी असा पाऊस अंगावर घेणाऱ्या या भागाचीही सहनशक्ती संपलीय. घरांची कौले आणि सिमेंटचे पत्रे आतून थेंबाथेंबाने पाझरू लागलेत. मी दररोज तीन वेळा काठीला फडके बांधून घरावरचे पत्रे आतल्या बाजूने पुसतो आहे. कित्येक घरांत जमिनीतून झरे बाहेर पडलेत. ते पाणी उंबऱ्यातून बाहेर काढताना लोकांची दमछाक होते आहे. कच्च्या घरांच्या भिंती शरणागती पत्करू लागल्या आहेत. माणसं आणि गोठ्यातली जनावरे थिजून गेली आहेत. पण सुदैव असं की सह्याद्रीच्या डोंगररांगा या विभागात पसरल्या आहेत, आणि याच डोंगरांच्या उतारावर बहुतेक गावे वसली आहेत. त्यामुळे नदी गावाजवळ असूनही पाणी पसरत असल्याने राधानगरीच्या पश्चिम भागातील फारशी गावे फार बाधित झालेली नाहीत.

नदीकाठाच्या वस्त्या मात्र हा प्रलय झेलताहेत… माझ्या शाळेचं गाव गुडाळवाडीही असंच नदीच्या काठावर आहे.. परवाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच.. परवा राधानगरीचे सातही स्वयंचलित दरवाजे चालू असूनही धरणाला पाण्याचा दाब सोसेना म्हणून पाच तारखेच्या रात्री तीन मुख्य दरवाजे उघडले गेले आणि मध्यरात्री या वस्तीत पाणी शिरलं. इतकं की त्या गावातल्या सर्वात वयोवृद्ध माणसाने असा महापूर पहिल्यांदा पाहिलाय. मध्यरात्री लोकांना शेजारच्या गावात आसरा शोधावा लागला. ते पाणी काल सकाळी ओसरलं… कालचा अख्खा दिवस त्या लोकांचा घरातली घाण, चिखल साफ करण्यात, पाणी बाहेर काढण्यात आणि साप मारण्यात गेला.

काहींच्या घरांना तडे गेलेत, काहींच्या भिंती कोसळल्यात, काही कोसळण्याच्या मार्गावर आहेत.. पण पाणी ओसरल्याने थोडा दिलासा मिळाला होता. मात्र रात्रीपासून पुन्हा मुसळधार सुरू झालाय.. पाणी पुन्हा घुसण्यासाठी टपून बसलंय… गावातली पुरुष मंडळी बायकापोरांची जिथे शक्य असेल तिथे व्यवस्था लावून घरांच्या अंगणात हताशपणे पाण्याच्या वरखाली होणाऱ्या पातळीकडे डोळे लावून बसलेत…

शासकीय यंत्रणेचे पार कंबरडे मोडलेय.. माझी बायको महसूलमध्ये कर्मचारी असूनही गेले पाच दिवस कार्यालयात जाऊ शकलेली नाही. असे अनेक कर्मचारी घरी राहिलेत आणि जे कार्यालयात आहेत ते सोमवारपासून तिथेच अडकून आहेत. तरीही आपत्कालीन यंत्रणेसाठी अशा तुटपुंज्या स्टाफसोबत महसूल विभाग झुंजतो आहे. पाटबंधारे विभागाचे कर्मचारी २४ तास धरण क्षेत्रात पडणारा पाऊस आणि करावा लागणारा विसर्ग याचं गणित मांडताहेत.. महावितरणचे कर्मचारी जीव धोक्यात घालून तुटलेल्या तारा जोडताहेत आणि कललेले खांब उभे करताहेत… दूरध्वनी यंत्रणा आणि टीव्ही केबल व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेय.. शाळांना आठवडाभर सुट्ट्याच आहेत. वर्तमानपत्रे येत नाहीयेत. दूध संकलन बंद झाल्याने सगळं दूध घरीच राहतेय. त्यामुळे या जोडधंद्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना आता आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागणार आहे. आणि हे सारं चित्र आहे राधानगरीच्या अशा भागातलं की जिथे पावसाचा कहर चालू असला तरी किमान पाय टेकायला खाली जमीन आहे.

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याचा पूर्व भाग ज्या अभूतपूर्व संकटाला झेलतो आहे, त्याची पुरेशी कल्पना १०-१५ मैलांवर असणाऱ्या आम्हालाही नाही. हा पूर किती भीषण होता हे कळायला आणखी १५ दिवस जातील.. पण त्याच्या परिणामांची झलक आजच पाहायला मिळाली. ३५ खेड्यांच्या माझ्या शेजारच्या कसबा तारळे गावातील आठवडा बाजारात आज फक्त दोन भाजीची दुकाने होती. एकाकडे दोडके होते, आणि दुसऱ्याकडे हिरवे टोमॅटो…किराणा मालाच्या दुकानातही काही वस्तूंचा तुटवडा निर्माण झालाय. आणि जे मिळत आहे त्याच्या किंमती आतापासूनच थोड्या वाढीव झाल्यात. हा महापूर आणखी काय काय घेऊन येणार आहे कुणास ठाऊक…

कोल्हापूरकरांना प्रश्नांशी झुंजणे नवे नाही. अनेक नागरी प्रश्नांना आम्ही खमकेपणाने सामोरे गेलो आहोत. या प्रसंगीही प्रत्येकजण दुसऱ्याला शक्य तितकी मदत करतो आहे. माणुसकीचा झरा या महापुराला समर्थपणे तोंड देत अखंड वाहू लागला आहे. पण हे आपत्ती खरंच महाभीषण आहे. कोल्हापूरची माणसं या अस्मानी संकटाने भेदरली आहेत, पण खचली नसावीत असा आशावाद व्यक्त करा. आणि पाऊस थांबून या जलप्रकोपातून कोल्हापूरची सुटका व्हावी यासाठी शक्य असल्यास निसर्गाकडे प्रार्थना करा, इतकंच…