– मयुर रघुनाथ खोपेकर

महाराजांच्या आज्ञापत्रात लिहुन ठेवले आहे, कि ‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग!’ खूप वर्ष झाली या आज्ञापत्राला. आम्ही विसरलो देखील ते आज्ञापत्र. राजांनी किल्ल्यांना दुर्ग म्हणून संबोधले. नावातच दुर्गमता आहे पण आज आमचे सरकार ती मिटवायला निघाले आहे. हे देखील विसरले कि किल्ल्यानीच खंबीरपणे राज्यांच्या सीमेचे रक्षण केले, म्हणून आम्हाला स्वराज्य मिळाले. सरकार विसरले तुमच्याच तटा-बुरुजांवर पडलेल्या परकीय तोफगोळ्यांना.

ज्याप्रमाणे कधीकधी लंगडा बैल हा ओझं वाटतो त्याचप्रमाणे आज किल्ले देखील सरकारला ओझं वाटू लागले आहे. किल्ल्यांची जागा आता हेरीटेज हाॅटेल घेणार आहे म्हणे. सरकारच पण बरोबरच आहे, किल्ले पडीक झाले. त्यांचा काय उपयोग? किल्ल्यांच्या उरलेल्या आणि ढासाळलेल्या चिरांना बघायला येणाऱ्या लोकांकडून काय फायदा सरकारला? त्यापेक्षा एखाद हाॅटेल काढून पैसे तरी मिळतील. तसेही आजकाल बरीच लोक किल्ल्यात दारु पितात, सिगारेट ओढतात, तेच आता हॉटेल द्वारे अधिकृत करुन आमचे सरकार दुप्पट पैसे कमावणार असे दिसतेय. आतापासूनच किल्ले सिगारेटच्या धुरात अडकले आहात आणि हॉटेल झाल्यावर मग तर विचारच नको. किल्ल्यांच्या कुशीतील टाक्यांमध्ये सुशिक्षित लोक पाय टाकून बसतात काय, पोहतात काय? हीच कृत्ये आता अधिकृत करणार आहेत आपलं सरकार “हेरिटेज हॉटेल” या उपक्रमाअंतर्गत.

शेवटी आमची माणसाची जात ही स्वत:चा फायदाच बघणार की.. पर्यावरण, इतिहास यांच्या नुकसानीचा आम्हाला काडीमात्र फरक पडत नाही. किल्ल्याचे शौर्य, बलिदान आमचं सरकार खरंच विसरले आहे. शिवकाळात किल्ल्यांत मावळ्यांची गर्जना आणि आई भवानी चा जयघोष ऐकावयास मिळत होता पण हॉटेल झाल्यावर त्यांचं किल्ल्यांत आता डीजे आणि पार्टीची गाणी ऐकायला मिळणार कि काय? जर असे झाले तर या पेक्षा मोठे दुर्दैव काय अजून.

कित्त्येक किल्ल्यांवर आपल्या महाराष्ट्राचा आणि स्वराज्याचा इतिहास सुवर्ण शब्दात लिहिला गेला आहे आणि आता हि किल्ल्यांची झालेली पडझड पाहून कोण म्हणेल कि येथे माझा राजा राहत होता. तो एक काळ होता ज्यावेळी किल्ले हे महाराष्ट्राचे खरे वैभव मानत, महाराष्ट्राला लाभलेला सह्याद्री याच वैभवाचे प्रतिक देखील आहे. स्वराज्य मिळवण्यात किल्ल्यांची महत्वाची भूमिका होती हे सत्य आम्ही केव्हाच पुसून टाकले आहे.

पण खरं सांगू का, आम्हाला किल्ल्यांचं हेच रूप बघायला आवडत जे सरकारसाठी आज पडीक आहे. आम्हाला हेरिटेज हॉटेलपेक्षा ह्या किल्ल्यांच्या चिरांमध्येच जास्त ओढ आहे. त्यांच्या कडा बुरुजांमध्ये जे शौर्य आहे ते हॉटेल मध्ये नसणार. महाराज आम्हाला माफ करा आम्ही नाही जपू शकलो आपला इतिहास, तुम्ही बांधलेल्या किल्ल्यांच्या ढासळता चिरा- बुरुज. किल्ल्यांचा जीव त्या हॉटेल बांधणीच्या पायात अडकून बसेल. पण तसं जर झालं तर त्या करोडोंच्या हेरिटेज हॉटेलकडे आमची पाऊले कधीच वळणार नाहीत. त्यामुळे…

आम्ही तुमच्या या निर्णयाचा विरोध करत आहोत.

(मयुर खोपेकर हे एक ट्रेकर असून ते ‘बा रायगड’ या दुर्ग संवर्धन गटाचे सदस्य आहेत)