News Flash

‘‘नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी झालेला धरणीकंप’’

शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करत असणाऱ्या जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांसाठी धडकी भरवणारी होती

– चंद्रकांत पांडे

चार मे 2020 ला महाराष्ट्र राज्य वित्त विभागाने GR काढून त्यातील मुद्दा क्र.14 च्या अनुषंगाने हे स्पष्ट केले की, वित्तीय वर्षात शासन शासकीय नोकर भरती करणार नाही व हा निर्णय Covid-19 च्या प्रादुर्भावाने राज्याच्या तिजोरीवर पडलेला ताण लक्षात घेता घेण्यात आला आहे. ही गोष्ट महाराष्ट्रात शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करत असणाऱ्या जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांसाठी धडकी भरवणारी होती, तसेच यातही स्पष्टता नव्हती की ज्या पदांसाठी आधी शासनाकडून किंवा MPSC कडून जाहिरात प्रसिध्द केली आहे त्याचे काय ? ती तरी Exam होणार का नाही ?परंतु यावर आतापर्यंत शासन किंवा MPSC यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही, त्यामुळे आता पुढे काय ? हा यक्ष प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहे.

खरे पाहिले तर शासनाने शासकीय नोकरभरती केली पाहिजे हे काय compulsion (अनिवार्य) नाही किंवा ही भरती केव्हा घ्यावी हा त्यांचा स्वेच्छाधिकार आहे किंवा ते घेऊपण शकत नाहीत, मग एवढी अनिश्चितता असेल तर शासकीय नोकरीच्या तयारीला जवळपास 10 लाख विद्यार्थी आपल्या आयुष्यातील एवढे महत्वाचे उमेदीचे दिवस का घालवतात ? हा प्रश्न वरून जेवढा वस्तुनिष्ठ दिसतो, तेवढाच खोलात गेल्यावर तो जटील आहे.

हे शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणारे हे जवळपास 10 लाख विद्यार्थी कोण ? का म्हणून हे आपल्या आयुष्यातील 5-5
वर्षे शासकीय नोकरीसाठीच्या परीक्षेचा अभ्यास करण्यात वाया घालवतात ? शासकीय नोकरीच का ?शासकीय नोकरीत असे काय अडलेय किंवा एवढी काय आवड किंवा craze शासकीय नोकरीची वगैरे, परंतु याचा तपशील लक्षात घेता एवढे सांगतो की, काही सोडून बाकी सर्वकाही आवड, craze वगैरेमुळे शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करीत नाहीत तर त्यामागील कारणे वेगळी आहेत. जसे की, शासकीय नोकरीतील job security, मिळणारा फिक्स पगार, समाजात मिळणारी प्रतिष्ठा, चांगली जीवनशैली वगैरे. पण मनात प्रश्न येतो की, या गोष्टी तर दुसरीकडे म्हणजेच खासगी व्यवसाय व नोकरी यातपण मिळू शकतात मग हा अट्टहास का ? या प्रश्नाचे उत्तर आपणास स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांविषयीच्या माहितीवरून मिळू शकेल.

(अ) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये बहुतांश लोक हे पारंपारिक शिक्षण घेतलेले आहेत. उदा. Arts, B.A., B.Ed., D.Ed. etc. काही व्यावसायिक शिक्षण घेतलेलेही आहेत (Engineering / Pharmacy etc.) पण ते स्वखुशीपेक्षा job available न असल्यामुळे आलेले आहेत. तसेच B.Ed., D.Ed. करून नोकरीसाठी संस्थाचालकास द्यावा लागणारा भरमसाठ पैसा लक्षात घेता या क्षेत्रातील खूप लोक स्पर्धा परीक्षेकडे वळलेले आहेत.

(ब) तसेच या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण व निमशहरी भागातील आहेत. मोठी महानगरे भागातील खूप कमी विद्यार्थी दिसतात, कारण तेथे असणाऱ्या रोजगाराच्या संधी तसेच येथे आपणास प्रादेशिक असमतोलही दिसतो. जसे जो भाग उद्योग व शेतीत प्रगत आहे, तेथील कमी विद्यार्थी व जो भाग दुष्काळी व औद्योगिक मागास त्या भागातील जास्त विद्यार्थी कारण तेच रोजगाराच्या संधी.

(क) आर्थिक परिस्थितीनुसार विचार केला तर जादातर विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी/ कामगार किंवा कनिष्ठ श्रेणीतील कर्मचारी आहेत, म्हणजेच आपल्या भाषेत Economically Valuable Group.

(ड) तसेच या विद्यार्थ्यांत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे शासनाची घोषणाबाजी व त्यामुळे या क्षेत्रात आलेले खूप जण आहेत.
उदा .महाराष्ट्रात मागील 5-6 वर्षापासून 72000 जागेची मेगाभरती होणार असे दिलेले आश्वासन/ घोषणा व शासनाच्या या घोषणेचे भांडवल करून private classes वाल्यांनी केलेले marketing व विद्यार्थी व पालक यांना दाखवलेली स्वप्ने यातून खूप मोठा वर्ग स्पर्धापरीक्षेकडे वळाला किंवा आपण असे म्हणू शकतो हे विद्यार्थी मागील 3-4 वर्षे या परीक्षांसाठी अभ्यास करत आहेत. पण आता शासकीय नोकर भरती बंद होणार ही घोषणा झाली, यामुळे याचा दुरगामी परिणाम होणार हे निश्चित.

अचानक झालेल्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचले आहे, कारण जर आपण Covid-19 च्या प्रादुर्भावामुळे व त्यातून उद्भवलेल्या वित्तीय अडचणीमुळे शासकीय नोकरभरती कपात करतोय तर हा वित्तीय फटका सर्वच ठिकाणी म्हणजे खासगी क्षेत्रात सुध्दा आहे. तेथेही नोकर कपात चालू आहे, मग अशात पारंपारिक शिक्षण घेतलेल्या / कोणताही अनुभव नसलेल्या किंवा corporate भाषेत outdated knowledge असणाऱ्यांना लगेच नोकरी कशी मिळेल ?

नोकरी (शासकीय / खासगी) सोडून स्वतःचा व्यवसाय करावा म्हणजे तर त्यासाठी लागणारा आर्थिक, मानसिक, कौटुंबिक पाठिंबा यांच्याकडे नाही. यामुळे विद्यार्थ्यांची अवस्था‘ इकडे आड तिकडे विहिर’ अशी झाली आहे व मोठ्या संख्येने असणारा हा वर्ग आता दिशाहीन झाला आहे, कारण जर शासन मागील 5 वर्षापासून स्वप्ने दाखवत आहे (मेगाभरती) व अचानक नोकरभरती नाही ही गोष्ट हिरमुड करणारी आहे.

या घोषणेमुळे या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील फक्त 1 वर्षे वाया जाणार असे नाही, कारण जरी नोकरभरती चालू राहिली तरी सर्वांना नोकरी मिळणार असे थोडेच आहे. म्हणजे हा प्रश्न मुळात बेरोजगारीचा आहे, मग या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा आहे.आपण म्हटल्याप्रमाणे जादातर विद्यार्थी ग्रामीण / निम शहरी भागातील आहेत, त्यांना तेथे रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. त्यांना आधुनिक शेती करण्यासाठी आकर्षित करावे पण त्यासाठी शेतीच्या शाश्वततेची हमी किंवा विश्वास निर्माण करावा लागेल, तसेच स्वरोजगारासाठी आर्थिक व मानसिक पाठिंबा द्यावा लागेल पण आपणास माहिती आहे की यासाठी तर शासन तर भरपूर योजना राबवत आहे मग नवीन काय ? नवीन हेच की , या योजनेचा लाभ प्रत्यक्षात लाभार्थीला व्हावा कारण आपल्याकडे योजना फक्त कागदावर यशस्वी होतात प्रत्यक्षात नव्हे, असो परंतु हे सर्व उपाय करण्यासाठी खूप वेळ लागेल. या गोष्टी काही तत्काळ होणार नाहीत म्हणून या गोष्टी होईपर्यंत शासनाने काही तात्कालीक गोष्टी कराव्यात जसेः-

(अ) अल्प प्रमाणात का असेना शासकीय नोकरभरती करावी त्यामुळे हा मोठा वर्ग व्यस्त राहील, दिशाहीन होणार नाही किंवा मानसिक खच्चीकरण, व्यसनाधीनता याकडे वळणार नाही व शासनाला concrete solution काढण्यासाठी वेळ मिळेल तसेच या कालावधीत Covid-19 चा प्रादुर्भाव कमी होऊन आर्थिक गाडी रूळावर आली तर उत्तमच ……

(ब) शासनाने / MPSC चे विद्यार्थ्यांना परीक्षा नोकर भरती याविषयी सविस्तर स्पष्टीकरण द्यावे म्हणजे विद्यार्थ्यांमधील शंका दूर होतील.

(क) शासनाने यापुढे मोठ-मोठ्या नोकरभरतीच्या घोषणा (Popular tic announcement) टाळाव्यात, कारण याचे भांडवल करून private
classes वाले नफा कमावतात.

(ड) महाराष्ट्र शासनाची शासकीय नोकरभरती अनिश्चित स्वरूपाची आहे, उदा. 2012 साली 2000 PSI पदासाठी भरती झाली व त्यानंतर 3 वर्षे झाली नाही यामुळे सर्वांना समान संधी मिळत नाही (प्रत्येकवर्षी). त्यामुळे शासनाने कर्मचाऱ्यांची गरज व राज्यात होणाऱ्या निवृत्ती यांचा विचार करून दरवर्षी ठराविक म्हणजेच जवळपास सारख्या जागेसाठी भरती करावी (जसे UPSC दरवर्षी जवळपास 1000 जागेसाठी भरती करते.)

(इ) नोकरभरती करताना ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यांचे निकाल, मुलाखत व नियुक्ती यात खूप मोठा (जवळपास दीड वर्ष) वेळ जातो, तो कमी करावा.

(ई) आपल्याकडे वेगवेगळया पदासाठी वेगवेगळया परीक्षा होतात, जवळपास सर्वच विद्यार्थी सर्व पदांसाठी अर्ज करतात.
त्यामुळे एकच विद्यार्थी अनेक पदासाठी पात्र होतो व ती जागा त्यावर्षी रिकामीच राहते, म्हणून सर्वपरीक्षा पदांचा गट बनवून एकच परीक्षा व्हावी व उमेदवाराचा पसंती क्रम व गुणवत्ता यानुसार याची निवड व्हावी त्यामुळे एक उमेदवार एकच पदावर नियुक्त होईल.

वर आपण पाहिलेल्या तात्कालीक उपाययोजनांची सध्या गरज आहे व त्याकरत असताना जो वेळ मिळेल त्यातून आपण वर विचार केलेले Concrete Solution शोधू शकतो व या गोष्टींचा व्यवस्थित विचार होणे गरजेचे आहे, कारण भारत हा जगातील सर्वात जास्त तरूण असणारा देश आहे, ती आपली संपत्ती आहे व त्याचा योग्य वापर होईल .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2020 4:18 pm

Web Title: maharshtra students jobs government dissension corona virus nck 90
टॅग : Coronavirus,Job
Next Stories
1 BLOG : माधुरी! हिंदी सिनेसृष्टीला पडलेलं सुंदर स्वप्न
2 BLOG : प्रिय मंटो पत्रास कारण की…
3 BLOG: नशे में कौन नही है, मुझे बताओ जरा!
Just Now!
X