– जय पाटील
व्हाइट हाउसमध्ये होऊ घातलेल्या अनेक बदलांबरोबरच चर्चा होती ती या वास्तूतील पाळीव प्राण्यांच्या पुनरागमनाची. इथे येणाऱ्या नव्या राष्ट्राध्यक्षांबरोबर नेहमीच त्यांचे लाडके पाळीव प्राणीही असतात. याला अपवाद होता तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीचा. गेल्या १०० वर्षांत पहिल्यांदाच ट्रम्प यांच्या कार्यकाळात व्हाइट हाउसमध्ये एकही पाळीव प्राणी नव्हता. त्यामुळे जो बायडेन यांच्याबरोबर इथे आलेल्या मेजर आणि चॅम्प या त्यांच्या दोन श्वानांच्या आगमनाविषयी प्रचंड उत्सुकता होती. त्यांच्या स्वागतासाठी तिथे नुकताच एक खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या माध्यमातूम दोन लाख डॉलर्सचा निधी उभारण्यात आला. हा निधी श्वानांच्या निवाऱ्यांसाठी देणगी स्वरूपात देण्यात येणार आहे.

मेजर हा बायडेन कुटुंबाने २०१८ साली दत्तक घेतलेला कुत्रा असून तो व्हाइट हाउसमध्ये राहणारा पहिलाच रेस्क्यू डॉग ठरला आहे. त्याच्याबरोबर इथे येणारा चॅम्प २००८ पासून बायडेन कुटुंबियांबरोबर आहे. ‘इन्डॉग्युरेशन’ म्हणून संबोधण्यात आलेल्या त्यांच्या ऑनलाइन स्वागतसमारंभाला पाळीव प्राण्यांवर विशेष प्रेम करणाऱ्या अमेरिकनांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘रेस्क्यू डॉग्जना अखेर प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळाला. आपले चार पायांचे मित्र व्हाइट हाऊसमध्ये परतले आहेत. गेली चार वर्षे पाळीव प्राण्यांशिवाय असलेल्या या जागेला नेमक्या याच क्षणाची प्रतीक्षा होती,’ अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटल्या. ‘ही माझी अमेरिका आहे, जिथे एक शेल्टर डॉगचा फर्स्ट डॉग म्हणून सन्मान केला जातो आणि ज्याच्या व्हाइट हाउसमधील स्वागतासाठी ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केला जातो,’ असंही एका ट्विटराइटने म्हटलं आहे.

बायडेन यांच्या मुलीला काही कुत्र्यांची पिल्लं आढळली होती, ज्यांच्या काही काळ श्वाननिवाऱ्यात ठेवण्याची गरज होती. जो आणि जिल बायडेन यांना या पिल्लांपैकी मेजर नावाच्या पिल्लाविषयी खास जिव्हाळा वाटू लागला आणि त्यांनी त्याला दत्तक घेतले. तेव्हापासून मेजर हा बायडेन कुटुंबियांबरोबर आहे.