मनोज वैद्य, राजकीय विश्लेषक 

राजस्थान विधानसभेच्या २०१८ मधील निवडणुकीचा प्रचार सुरु झाला.भाजपाला विजयासाठी प्रतिकूल वातावरण असल्याचे लक्षात आले. भाजपाचा जहाल हिंदुत्वाचा ” पोस्टर बॉय” अजय बिश्ट उर्फ योगी आदित्यनाथच्या सभा राजस्थानमधील शहरांमध्ये आयोजित केल्या गेल्या. हिंदू-मुसलमान ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा शेवटचा प्रयत्न होता. भाजपचे इथपर्यंत ठिक होते.

परंतु, राजस्थानच्या विधानसभेच्या निवडणुकींना एआयएमआयएमचा म्हणजेच ओवैसी यांचा एकही उमेदवार नव्हता. तरीही ओवैसी यांच्या सभा राजस्थानमधील काही मुस्लिमबहुल शहरात आयोजित करण्यात आल्या. या सभांमधून त्यांनी अलवर भागातील गोरक्षकांनी गोमांसच्या संशयावरुन केलेल्या हत्येच्या संदर्भात अत्यंत जहाल भाषण केले. त्यातील त्यांच्या भाषणाची भाषा आगखाऊ होती.ओवैसी यांचा आवेश असा होता की, हिंदुना या देशांत असुरक्षित वाटले पाहीजे.आणि मग या ओवैसीसारख्या प्रवृत्तींना ठेचलेच पाहीजे.अशी मानसिकता हिंदू मतदारांची झाली पाहीजे. अशा पध्दतीने या ओवैसी सभांची मांडणी केली गेली.
मग मुस्लिम दाढी आणि कवटी टोपीचा पेहराव असलेल्या ओवैसींच्या हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर,मग भगव्या कपड्यांत हिंदूचे प्रतिके घालून योगी आदित्यनाथ यांच्या सभा सुरु झाल्या. काय कथानक रचले गेले लक्षात घेतले गेले पाहीजे , सगळे कसे ठरवून केले गेले.

तर इथे मुद्दा असा आहे की, ओवैसी यांच्या सभेचा खर्च कोणी केला? असे भाजप प्रवक्तांनी विचारले नाही. त्यांचा खर्च कोणत्या पक्षांच्या खर्चात टाकावा असा प्रश्न उपस्थित केला गेला नाही. त्या सभा प्रायोजित नव्हत्या का? ओवैसी यांच्या वादग्रस्त मुलाखतींचा भाग प्रक्षेपित करण्यासाठी प्रसारमाध्यमांमधील कोट्यवधी रुपयांचे प्राईम टाईमचे स्लॉट कोणता पक्ष विकत घेतो? यासारख्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

राज ठाकरे यांच्या मनसेची समाज माध्यमावरुन कितीही खिल्ली उडवली,त्यांचा पक्ष भाड्याने दिला आहे, असे प्रश्न विचारले तरी, एक गोष्ट तुम्ही कोणीच नाकारु शकत नाही.ते म्हणजे त्यांचे दमदार वक्तृत्व,त्यांच्या सभांना होणारी प्रचंड गर्दी व सभेतील पहील्या रांगेपासून ते शेवटच्या रांगेतील माणसाशी झालेला थेट “कनेक्ट” लक्षात घेतला पाहीजे.

राज ठाकरे यांचे आमदार – नगरसेवक किती आहेत, पक्षाचे संघटन कुठे आहे असे प्रश्न उपस्थित करुन विरोधक त्यांना नामोहर करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राज ठाकरे सध्या सभांमधून ,अगदी सामान्य माणसाला विशेषतः तरुणांना समजेल अशा पध्दतीने,मोदी यांचे त्यांच्याच भाषणांतील विसंगती दाखवित आहेत.त्यासाठी त्यांनी पडद्यावर भाषणाचे सादरीकरण करण्याची पध्दत लोकांना खुपच भावते आहे.त्यामुळे राज ठाकरे पध्दतशीरपणे मोदींचे ” वस्ञहरण ” करत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

राज ठाकरे यांची गुढीपाडव्याची सभा अत्यंत यशस्वी ठरली.त्यातून त्यांनी जाहीर केले की, मी महाराष्ट्रात अजूनही काही दहा-अकरा सभा घेणार आहे. त्या सभांचा एकच अजेंडा असेल, मोदी-शहा यांच्या पराभवासाठी प्रयत्न करणे. मग त्याचा फायदा कोणत्याही पक्षाला होऊ द्या.अशी स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका घेण्यासाठी फारच राजकीय धैर्य लागते.अशी सडेतोड भूमिका संपूर्ण हिंदुस्थानात फक्त एकच शिवसेनाप्रमुखच घेऊ शकले असते,असे शिवसैनिकही खासगीत मान्य करतात.
भाजपाला महाराष्ट्रातून काहीही करुन चांगला स्कोर करायचा आहे.त्यांनी फक्त शिवसेनेला गळाला लावायचे आहे, एवढेच गृहीत धरले होते.पण मराठीचा मुद्दा हाती घेतल्याने, देशभरात होणारी टीका टाळण्यासाठी काँग्रेस व राष्टूवादी मनसेला जवळ करणार नाही.मनसेचे राज ठाकरे हे एकाकी बाजूला राहतील असे भाजपने गृहीत धरले होते.

महाराष्ट्रात शरद पवार यांना दुर्लक्षित करुन, भाजपने फार मोठी चूक केली आहे. पण ती चूक मोदींच्या लक्षात आली आहे.कारण मोदींच्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या सभांची संख्या आणि त्यांचे शरद पवार यांच्यावर असलेला टिकेचा रोख लक्षात घेतला पाहीजे. राज ठाकरे यांच्याशी विधानसभेच्या जागावाटपात योग्य ते नियोजन करण्यांत आले आहे, त्यासाठी राज ठाकरे यांच्या सुपुत्राच्या लग्नात काँग्रेसच्या अहमद पटेल यांची उपस्थिती बरेच काही सांगून जाते. संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवार यांनी जी रणनीती आखली आहे.त्यामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेचे पुनर्जीवन करण्याची योजन आखण्यात आली.

राज ठाकरे यांच्यासाठी राजकारणात आलेला एकाकीपणा संपणे फारच गरजेचे होते. महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाशी ते आघाडी व युती करु शकत नव्हते. सध्याचा राजकीय आघाडीच्या काळात ही कोंडी संपवणे फारच गरजेचे होते. येणाऱ्या विधानसभेत त्यांना आपले अस्तित्व शेवटची संधी आहे. अन्यथा त्यांचे राजकारणच संपुष्टात येणार होते. त्यासाठी त्यांनी जी काही पावले मधल्या काळात उचलली,ती योग्यच आहेत.

आज त्यांच्यातील नेतृत्वाला पुन्हा नव्याने झळाळी मिळाली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्यांच्या सभांची चर्चा सुरु झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश निर्माण झाला आहे. त्यांना एक दिशा मिळाली आहे. त्यांना राज ठाकरे यांच्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रचारमंचावर मानाचे स्थान मिळाले आहे.त्याचा फायदा येणाऱ्या काळात मनसेला नक्कीच होईल.

शिवसेनेवर राज ठाकरे या भाषणात काहीच भाष्य करत नाहीत. पण ते जे काही मोदीविरोधी भूमिका मांडत आहेत, ती प्रत्येक शिवसैनिकांच्या मनातील अस्वस्थता आहे. त्यामुळे शिवसेना नेते सध्या अडचणीत आले आहेत. राज ठाकरे यांची तोफ भाजपावर जरी भडीमार करत आहे, तरी त्याचे परिणाम शिवसेनेवर सुध्दा होत आहेत.पण शिवसेनेला यात तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी अवस्था झाली आहे असे जाणवते.कारण जे काम शिवसेनेला करायचे होते ते राज ठाकरे करत आहेत.
राज ठाकरे पहील्या टप्प्यात भाजपाचे उमेदवार असतील तेथेच सभा घेतील असे दिसते. मोदी यांच्या भाषणातून मतदारांवर गारुड केले जाते. त्यांना संमोहीत करण्याचा प्रयत्न करणे, मग त्या मतदाराचे मत भाजपाकडे नेणे, मतदाराच्या मेंदूवर मोदींच्या भाषणाची झिंग असते. भाजपासाठी मोदींचे भाषण म्हणजे विजयासाठी मास्टर स्ट्रोकच असतो. मोदींची सभा एवढेच भांडवल महाराष्ट्र भाजपाकडे आहे.

पण मोदींच्या भाषणाची झिंग आता उतरवू शकेल असा उतारा आघाडीला मिळाला आहे. मोदींच्या सभेनंतर राज ठाकरे यांचे भाषण त्या मतदारसंघात मतदारांच्या मेंदूत वादळ निर्माण करत आहे.मोदींच्या नेतृत्वाच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतात.जेव्हा असे प्रश्न किंवा मनात संभ्रमावस्था निर्माण होते.असा मतदार सत्ताधारी पक्षांसाठी धोक्याची घंटा ठरु शकतो.

भाजपाचे नेते यामुळे भयंकर अस्वस्थ झाले आहेत.ज्या धड्याचा अभ्यासच केला नव्हता, त्यावरच प्रश्न नेमका आला की, परिक्षार्थी गोंधळतो तसेच काहीसे भाजपाचे झाले आहे. त्यात विनोद तावडे यांचा खडसे-सोमय्या करण्याचा डाव सुरु आहे.त्यामुळे विनोद तावडे यांच्या राज ठाकरे सभासंदर्भात जे वक्तव्य येत आहेत, त्यातून राज ठाकरे यांचे महत्व अधिक वाढत आहे.

भाजपाला या चक्रव्यूहातून बाहेर निघणे कठीणच आहे.महाराष्ट्राकडून भाजपाला फार अपेक्षा असताना, राज ठाकरे यांचा परिणाम नक्कीच भाजपच्या जागांवर पडू शकतो. सध्यातरी यावर आकांडतांडव करणे एवढेच फडणवीस यांच्या हाती आहे. पण त्यामुळे अजून राजकीय वातावरण दूषित होईल.त्याचे नुकसान भाजपला आणखीन भोगावे लागेल अशी शक्यता आहे.

सध्यातरी राज ठाकरे यांचे वादळ थांबविणे कोणाला शक्यच नाही. पण ज्यावेळी थांबेल त्यानंतरच नुकसानीचा अंदाज घ्यायचा.एवढेच भाजप नेत्यांच्या हाती आहे. त्यात शिवसैनिकांच्या मनातील ज्वालामुखी अद्याप बाहेर यायचा आहे.त्याचा अंदाज तर काहीच सांगता येत नाही.एकूणच भाजपला कोणत्या परिस्धितीला तोंड द्यावे लागेल याचा काहीही अंदाज नाही.भाजपला काही ” अच्छे दिन ” दिसणार नाहीत असे वाटते.