मनोज वैद्य

भारतीय लोकशाहीला जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असे म्हटले जाते. पण ती गुणात्मकदृष्ट्या की संख्यात्मक मोठी आहे हे माञ कोणीच सांगत नाही.आपल्याला प्रश्नसुध्दा पडत नाही, कारण जगात आपण मोठे आहोत हे ऐकले की आपल्याला कसं छान वाटतं !मग आपण ते तपासत नाही, कारण आपल्याला प्रश्न पडत नाहीत.त्यात आपल्या तमाम सामान्य भारतीयांचा दोष नाही.कारण आपल्या वैयक्तिक जीवन जगण्याचे एवढे प्रश्न उभे असतात,त्यातून यावर विचार करण्याचे त्राणच मेंदूत उरत नाही.

ही सामान्य भारतीयांची असहाय व दुर्बल मानसिकतेची जाणीव, देशांतील राजकारणी व नोकरशाही यांना नेमकेपणाने माहित आहे. त्यामुळेच एकीकडे भारतीय मतदाराला ” राजा ” संबोधित करायचे, पण प्रत्यक्षात त्याला नीतीमत्ता नसलेला, लाचार व विकाऊ करुन टाकला आहे. थोडक्यात भिकारी तरी बरा स्वाभिमान बाळगून असतो.

याकरिता आपण पूर्वापार ऐकत आलेल्या गोष्टीतून ही भूमिका समजून घेतली पाहिजे. ती गोष्ट थोडक्यात अशी आहे की, एक टोपीवाला विक्रेता एका गावातून दुसऱ्या गावात जात असतो. मध्यान्हाची वेळ असल्याने तो एका झाडाखाली बसून आपले जेवण उरकून विश्रांती घेत असतो , त्यावेळेस डोक्यावरची स्वतःची टोपी पुढे ओढून, गाढ झोपी जातो.

त्या झाडावरील माकडे शांतपणे यावर लक्ष ठेवून असतात.कुतूहल म्हणून त्यातील काही स्मार्ट माकडे खाली उतरतात.आणि टोपीवाल्याचे गाठोडे उघडतात, त्यांना त्यामध्ये अनेक टोप्या दिसतात.टोपीविक्रेत्याची डोक्यात घातलेली टोपीनुसार प्रत्येक माकड डोक्यात टोपी घालून झाडावर आनंदात जाऊन बसतो. काही वेळाने विक्रेता जागा होतो.बघतो तर काय गाठोडे रिकामे झालेले असते.हताशपणे कोणी चोरल्या असतील याचा अंदाज घेण्यासाठी परिसराचे अवलोकन करत असतो.

तेवढयात त्याला झाडावर काही हालचाल जाणवते.तो वर पाहतो तर काय? माकडाची एक मोठी टोळी ! प्रत्येक माकड टोपी घालून बसून विक्रेत्याला निरखत असतात.आता झाला प्रकार टोपीवाल्याच्या लक्षांत येतो.

तो वर पाहत आता काय करायचे या विचारात, डोक्यावरची टोपी काढून डोके खाजवतो. तर प्रत्येक माकड त्याचे अनुकरण करतो. तेसुध्दा टोपी काढून डोकं खाजवतात. विक्रेता पुन्हा टोपी घालतो, तर माकडेसुध्दा टोपी घालतात.विक्रेता पुन्हा टोपी काढतो, माकडेसुध्दा टोपी काढतात.त्यामुळे विक्रेता समजून जातो.माकडे त्याचे अनुकरण करतात.

टोपीवाला या माकडांच्या प्रतिसादाचा फायदा घेऊन, त्याचा माल परत घेण्यासाठी याचा वापर करण्याचे ठरवतो. तो उभा राहून गाठोड्याचे कापड पसरतो आणि स्वतःची टोपी त्या कापडावर टाकतो. लगेच सगळी माकडे त्याचे अनुकरण करतात.आपल्या टोप्या त्या कापडाच्या दिशेने भिरकावतात. विक्रेता गाठोडे बांधून काढता पाय घेतो.माकडे बघत राहतात, त्या विक्रेत्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे!

यामध्ये अनुकरणाला प्रतिसाद याचे सूञ आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. राजकारणी आपलं म्हणजेच मतदारांचं माकड कसा करतो हा एक समिक्षेचा विषय आहे. सध्याचा निवडणुकीचा काळ तर टोपीचा सुगीचा काळ आहे. त्यामुळे आपण कितीकाळ माकडे व्हायचे हे ठरवले पाहीजे.

देशात स्वातंत्र्यानंतर पहिली लोकसभा निवडणूक १९५२ ला झाल्या. त्या निवडणूकीत १७.३ कोटी मतदारांनी भाग घेतला. त्यावेळेस काँग्रेसनने एकूण ४८९ जागांपैकी ३६४ जागा पटकाविल्या तर इतर दोन पक्षांनी दोन आकडी जागा मिळवल्या.
सध्याच्या २०१४ च्या निवडणुकीच्यावेळी ८१.४५ कोटी मतदार पाञ होते. तर निवडणूकीत सहभागी पक्षांची संख्या ४१८ होती. त्यामुळे या आकडेवारीतून आपल्या लक्षात येईलच की हा लोकशाही नावाचा टोपीवाला व माकडांचा खेळ किती मोठा झाला आहे.

आपल्या खंडप्राय देशाच्या नागरिकांना भावनिकदृष्ट्या एकत्र बांधून स्वतःचे किंवा पक्षाचे कार्यक्रम राबवण्यासाठी त्यांना उद्युक्त करावे लागते. त्यासाठी प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचणे अशक्य असते. त्याकरिता पक्ष किंवा त्याचा नेता एखादी आकर्षक घोषणा किंवा त्याला अनुसरुन कार्यक्रम किंवा आंदोलन जाहीर करतो. साधारणतः जगातसुध्दा हेच धोरण थोड्याफार फरकाने राबविले जाते.

भारतात तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वदेशी, मिठाचे आंदोलन,चले जाव अशा कित्येक घोषणा दिल्या गेल्या. तरीसुध्दा ब्रिटीश या देशांवर दिडशे वर्षे राज्य करीत होते. दुसरे महायुद्ध नसते झाले तर इतिहास आणखी काही वेगळा असता.
तर स्वातंञ्यानंतर सुरुवातीला काँग्रेसला समोर आव्हानच नव्हते. तसेच गांधी – नेहरु व पटेल यांचा तो मंतरलेला काळ होता.त्यामुळे मतदारांना फारसा पर्याय नव्हता.परंतु त्यानंतर लालबहाद्दूर शास्ञी यांनी नेहरु यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर, पाकिस्तानशी १९६५ च्या लढाईच्यावेळी दिल्लीच्या रामलीला मैदानावर देशवासियांना प्रेरणा देणारी “जय जवान जय किसान ” ही घोषणा दिली.

त्यानंतर इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी ‘गरीबी हटाव देश बचाव’ ही ख-या अर्थाने घोषणाचे युग सुरु केले. ते माञ आजपर्यत सुरु आहे. पूर्वी टोपीवाला एकच असायचा आणि खरच झोपायचा पण हल्ली माञ अनेक ढोंगी टोपीवाले आहेत, आणि माकडेसुध्दा फारच वाढली आहेत. सगळीच माकडे एकाचवेळी टोपी खाली टाकत नाहीत. काळानुरुप बदल होत चालले आहेत. खेळ बदलला नाही पण रंगतदार होत चालला आहे.

इंदिरा गांधीच्या हत्येनंतर अचानकपणे १९८४ च्या सुमारास राजीव गांधी यांचा भारतीय राजकारणात उदय झाला. त्यांनी मतदारांची वयोमर्यादा अठरा वर्षे केली. त्यांच्या काळांत संगणक क्रांती, दूरसंचार क्रांती इ.तंञज्ञानयुगाची मुहूर्तमेढ रोवली. ते नेहमी म्हणायचे आपला देश पारतंत्र्यात असल्यामुळे जगातील औद्योगिक क्रांतीपासून वंचित राहीलो.पण तंञज्ञानक्रांती माञ आपण करायची. त्यांनी २१व्या शतकाकडे चला…ही दिलेली घोषणा देशांतील नवतरुण व नवमध्यमवर्गावर गारुड करुन गेले.

त्यानंतर १९९० च्या सुमारास पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी मंडल आयोग लागू केला. त्यावर भाजपने कुरघोडी करण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरण करणारे, राममंदिर आंदोलनाचे म्हणजेच बाबरी मस्जीद विध्वंस करण्याचे आंदोलन सुरु केले.ज्याला हिंदू धार्मिकतेचे प्रतिक म्हणून ‘ कमंडल ‘ असे म्हटले गेले. त्यामुळे मंडल विरुध्द कमंडल असे जात विरुध्द धर्म अशा स्वरुपात राजकारण फिरु लागले.

मधल्या काळात १९९१ च्या सुमारास नरसिंह राव यांच्या काळात आर्थिक सुधारणाचे पर्व सुरु होते. परंतु त्याकडे मतदारांनी व माध्यमांनी सपशेल दुर्लक्ष केले. वास्तविक पाहता या काळात देशांत खूप चांगले सुधारणावादी कार्यक्रम झाले. परंतू आपल्या देशांला चटपटीत घोषणा मुलामा लागतो हे या निमित्ताने सिध्द झाले.

यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांचे आघाडी सरकार सुमारे १९९९चे पूर्ण कालावधीचे सरकार आले. त्यांनी ” शायनिंग इंडिया” व “फिल गुड” हे फार मोठे खर्चिक प्रचार अभियान चालविले. परंतु त्यावेळेस सोनिया गांधी यांनी ज्यांना धड हिंदीसुध्दा बोलता येत नव्हते, त्यांनी अमोघ वक्तृत्व असलेल्या अटलजींच्या प्रचारमोहीमेला धूळ चारली.
त्यानंतर मनमोहन सिंह यांचे २००४ ते २०१४ चे सरकार चालले. परंतु या सरकारने कोणत्याही घोषणा न दिल्याने, परंतु विरोधकांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाने ग्रासले होते. तरीसुध्दा त्याकाळात आर्थिक आघाडीवर देश प्रगतीपथावर होता. परंतु दिमाखदार घोषणा न केल्याने या सरकारची चांगली बाजू दुर्लक्षित झाली.

आणि मग आले अच्छे दिनचे स्वप्न दाखविणारे प्रचारकी सरकार. परंतु आता या तंत्रज्ञान युगातील टोपीवाला आता मोबाईलधारी झाला आहे.तसेच माकडेसुध्दा तंत्रस्नेही झाली आहेत. त्याचा आढावा उत्तरार्धात नविन गोष्टीसहीत घेऊया.
इतके माञ खरे आहे, भारतीय मतदार घोषणाची टोपी घालून घेतो.त्याला वाटते की आपण जिंकलोच परंतु टोपीवाला म्हणजेच राजकारणी त्याला फसवून स्वतःचा माल ताब्यात घेतोच.

(पूर्वार्ध)

वाचा: टोपीवाला,माकडे आणि भारतीय मतदार या ब्लॉगचा उत्तरार्ध

manojvvaidya@gmail.com