15 August 2020

News Flash

मराठी अभिनेत्रींमध्येही धिटाई आली तर आहे…

काही वर्षांपूर्वी मराठी अभिनेत्री धीट दृश्ये देताना बराच विचार करत

दिलीप ठाकूर

हा योगायोग म्हणायचा की आणखीन काय याचे ऑपरेशन करण्यापेक्षा आपण काय काय झालं ते पाहू..

‘सिटी ऑफ ड्रीम्स ‘या बेव सीरिजसाठी प्रिया बापटने गीतिका त्यागीसोबत ‘थीमनुसार’ (अर्थातच) चुंबन दृश्य दिल्याची चर्चा कुठे रंगतेय आणि ओसरतेय. तोच मराठी अभिनेत्रींच्या आणखीन काही ‘साहस गोष्टी’ घडू लागल्या. अमृता खानविलकर मालदीवला सुट्टी एन्जॉय करायला गेली ती थेट निळ्याशार समुद्रकिनारी पोहोचली. आता समुद्रात डुंबायचे म्हणजे स्वीम सूट हवाच, तिचे तेथील फोटो लक्षवेधक ठरु लागले. त्यात ती कमालीची फ्रेश असल्याने कोणी म्हटलं की, इंग्रजी न्यूज पेपरच्या मनोरंजक पुरवणीच्या पेज थ्रीला साजेसे असे हे तिचे रुपडे आहे. तेवढ्यात अमृता खानविलकरचे मालदीवचेच आणखीन काही फोटो आले. ती तिथे पाण्यातच बराच काळ मुक्कामाला आहे की काय असा गंमतीशीर प्रश्नही पडला. आताचे तिचे ‘ओले ओले’ फोटो पाहून कोणी म्हटलं गॉसिप्स मॅगझिनच्या मुखपृष्ठावर अथवा सेन्ट्रल स्प्रेडला साजेशी झक्कास पोझ आहे. एका फोटोतील तिचा ‘सौंदर्य तडका’ म्हणजे ती पाश्च्यात्य विदेशी चित्रपटाची हॉट अॅक्ट्रेस ठरावी. आपल्या मराठी अभिनेत्रींचे कौतुक आपण करायचं नाही तर कोण करणार? अशातच नेहा पेंडसेने रेड स्वीमिंग कॉशच्युममधील हॉट फोटो सोशल मिडियात पोस्ट केले आणि या सगळ्यात एक प्रकारचे जणू सातत्य जाणवू लागले. काही दिवसांपूर्वीच सोनाली कुलकर्णीचाही असाच एक स्वीमिंग पूलावरचा बेदिंग सूटातील फोटो सोशल मिडियात लक्ष वेधून घेत होता. काही परंपरावादी मात्र ‘ही आपली संस्कृती नाही’, ‘हे असे मराठी अभिनेत्रींना शोभत नाही’ असे फेसबुकवर म्हणालेच. जेव्हा असे काही ‘बोल्ड आणि ब्युटीफूल’ घडते तेव्हा उलटसुलट प्रतिक्रिया उमटणारच आणि सोशल मिडियाच्या काळात तर त्या हातोहात व्यक्त होतात. या सांस्कृतिक घडामोडीतच प्रणाली भालेरावने बिकिनी रुपात पडद्यावर आत्मविश्वासाने आकर्षक दर्शन घडवलेल्या ‘टकाटक ‘ या चित्रपटाला उत्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त पसरले. तात्पर्य, मराठी अभिनेत्रींचे बिकिनी रुप अथवा बेदिंग सूटातील पडद्यावरचे अथवा फोटोतील दर्शन/प्रदर्शन आजच्या ग्लोबल युगातील युवकांना खटकत नाही, अथवा सांस्कृतिक धक्का वगैरे बसत नाही. काही वर्षांपूर्वी ‘हिप्प हिप्प हुर्ये’साठी स्मिता गोंदकरने आणि मग ‘अशाच एका बेटावर’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटासाठी सई ताम्हणकरने रेड बिकिनीत दर्शन घडवले तेव्हा इतके सहजपणे स्वागत वा कौतुक झाले नव्हते. सईचे हे दोन्ही चित्रपट अनुक्रमे ‘गुमनाम’ आणि ‘नो एण्ट्री’ या हिंदी चित्रपटाचे रिमेक आहेत. त्यामुळे मूळ चित्रपटात जे आहे तेच रिमेकमध्ये असावे अशा अलिखित नियमानुसार ते मराठीत आले. त्यामुळे सईची धाडसी अभिनेत्री वगैरे इमेज झाली. खरं तर ती अष्टपैलू मेहनती अभिनेत्री आहे, पण एकदा का अशी ‘बिनधास्त आणि बेधडक’ इमेज झाली की पटकन कोणी सिरियसली घेत नाही. याउलट प्रणाली भालेराव म्हणाली, तिचा रुपेरी धिटपणा पाहून अनेकांनी तिची सई ताम्हकरशी तुलना केली.

असो. सिनेमाचे जग म्हणजे ग्लॅमर आणि गॉसिप्स यांचा जणू खुराकच (फिल्म फेस्टिव्हल वगैरे वेगळी संस्कृती, त्याच्या गोष्टीच वेगळ्या) आणि हा ब्लॉग तुम्ही वाचत असतानाच आणखीन एक दोन मराठी अभिनेत्रींचा असाच एकादा शरीरयष्टी सौंदर्याचा तडका दाखवणारे काही तरी सोशल मिडियात पोस्ट होईल. ही शक्यता की अपेक्षा हा प्रश्न नाही.

काही वर्षांपूर्वी मराठी अभिनेत्री धीट दृश्ये देताना बराच विचार करत असे म्हणतात. समाजात वावरताना उगाचच कुठे शेरेबाजी होईल, मिडियात टीका होईल याची भीती होती. मग ही धाडसी क्रांती आली कुठून? वेब सीरिजला सेन्सॉर नाही म्हणून आली का? की आपण धाडसी दृश्य दिले नाही अथवा त्याचा अभिनय केला नाही तर दुसरं कोणी ते करेल, आपली संधी जाईल या भीती अथवा स्पर्धेतून आलेय? बरं, सामाजिक कौटुंबिक चित्रपटात भूमिका साकारताना पदर संस्कृती नक्कीच सांभाळू तसेच एकाद्या स्री स्वाभिमान व्यक्तिरेखा नक्कीच प्रभावीपणे साकारु, त्या गरजांनुसार काम होतच असते. पण हिंदी चित्रपटसृष्टीचा गॉसिप्स व ग्लॅमरचा कलर आपल्या मराठीतही असावा/ठसावा यासाठीचे कळत नकळतपणे होणारे बदल म्हणजे हे आहे. आजच्या मराठी अभिनेत्री विदेशातील बीचेसवर फिरतात, एन्जॉय करतात, जगभरातील चित्रपट पाहतात, सोशल मिडियात अॅक्टीव्ह असतात, फिटनेस आणि लूकबाबत आग्रही (की कॉन्शियस?) असतात, नवीन फॅशनच्या वस्त्रांत ग्लॅमरस लूकमध्ये सहज वावरतात या सगळ्याचा परिपाक अथवा केमिस्ट्री म्हणजे हे पुढचे पाऊल आहे. ते पडावे असे कोणी म्हटलं नाही. ते बदलत्या काळाबरोबर पडलयं. हा नव्या युगाचा नवा फंडा आहे. एकाद्या चित्रपटात सोशिक व्यक्तिरेखा साकारायची वेळ आल्यास त्या भूमिकेत त्या शिरणार याची खात्री असू देत. त्या फक्त बोल्ड लूकमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवणार नाहीत. त्या उच्चशिक्षित आहेत, अनेकींचे वाचन चांगले आहे, ग्लॅमरच्या आतील एक समंजस व्यक्ती म्हणून त्यांना भान आहे. हां, कदाचित एखादीचा हॉट लूक अशोभनीय अथवा वाह्यात/गलिच्छ असू/दिसू शकतो. पण आजच्या पिढीतील अभिनेत्री आपला फोटो सोशल मिडियात पोस्ट करताना अथवा कॅमेरासमोर धाडसी दृश्ये देतांना नक्कीच चांगल्याचाच विचार करतील. आता मुद्दा टीकाकारांचा. अशा दृश्ये अथवा फोटोवर दृष्टिक्षेप टाकताना ही मराठी संस्कृती, सभ्यता, मूल्ये नाहीत अशी टीका होणे ही गोष्ट स्वाभाविक आहे. पण त्याच वेळेस या सगळ्यातील कारणेही विचारात घ्यावीत. आज सोशल मिडियाच्या माध्यमातून जगभर एस्पोजर मिळतोय आणि एक बोल्ड दृश्य आणि स्वीम सूटमधील फोटो म्हणजे तात्कालिक गोष्ट असते. तेवढी मोकळीक द्यायला हवी. खरं तर या मराठी अभिनेत्रींचे ग्लॅमर दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, कंगना रानावत, अनुष्का शर्मा, करिना कपूर यांच्या क्लासचे आहे की नाही याचा उहापोह करत बसण्याची गरज नाही. मराठी अभिनेत्रींनी ग्लोबल युग आणि सोशल मिडिया यांचा ताळमेळ साधलाय असेच म्हणायला हवे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2019 11:41 am

Web Title: marathi actresses in bold costumes and glamorous look ssv 92
Next Stories
1 BLOG : मोदी सरकारच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी असे ‘अच्छे दिन’
2 BLOG : महेंद्रसिंह धोनी – टीम इंडियाचं अवघड जागेचं दुखणं !
3 जीव गुदमरतोय गडांचा
Just Now!
X