News Flash

BLOG “भिक्षा मागणे उद्देश नाही, चांगले संस्कार करणे उद्देश आहे.”

एक चांगला समाज घडवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मी केवळ तेच केलं.

एक साधू महाराज आपल्या शिष्यांसोबत गावाच्या वेशीजवळील मारुतीच्या मंदिराशेजारी असलेल्या मठात रहात असतात.

दीपक दामले
मी यूट्युबवर एक छान गोष्ट ऐकली ती तुमच्याबरोबर शेअर करतो. एक साधू महाराज आपल्या शिष्यांसोबत गावाच्या वेशीजवळील मारुतीच्या मंदिराशेजारी असलेल्या मठात रहात असतात. सकाळी लवकर उठून प्रातःविधी उरकून मारुतीची उपासना करून गावात जाऊन भिक्षा मागायची, परत मठात येऊन आपली नित्याची कामे करायची अशी त्यांची दिनचर्या असते.

एक दिवस नेहमीप्रमाणे ते गावात भिक्षा मागायला जातात. ‘ॐ भवती भिक्षां देई’ असं म्हणत साधू महाराज आणि त्यांचे शिष्य भिक्षा मागत असतात. तांदूळ, भाकरी, भात, भाजी, पोळी इत्यादी भिक्षा त्यांना मिळतं जाते आणि ‘ॐ भवती भिक्षां देई’ असं म्हणत ते एका घरापासून दुसऱ्या घराकडे भिक्षा मागायला जात राहतात. कोणी भिक्षा देवो अथवा न देवो साधू महाराज ‘कल्याणमस्तु’ म्हणून प्रत्येकाला आशीर्वाद देतात.

भिक्षा मागतामागता साधू महाराज आणि त्यांचे शिष्य एका घरासमोर येऊन थांबतात. साधू महाराज ‘ॐ भवती भिक्षां देई’ म्हणतात आणि थांबून राहतात पण घरातून काहीच प्रतिसाद येत नाही. ते पुन्हा ‘ॐ भवती भिक्षां देई’ असं म्हणतात. थोड्या वेळाने घरातून एक छोटी मुलगी बाहेर येते आणि साधू महाराजांना म्हणते की, घरात कोणीच नाहीये. आई आणि बाबा शेतावर गेले आहेत. माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाहीये.

साधू महाराज तिला म्हणतात बघ तुझ्याकडे द्यायला काही आहे का? ती छोटी मुलगी विचार करते पण तिला काहीच सुचत नाही. तेव्हा ती नाही म्हणून मान हलवते. मग साधू महाराज तिला म्हणतात की, घराच्या अंगणातील माती भिक्षा म्हणून दिलीस तरीदेखील मी स्वीकारेन. मुलगी मूठभर माती उचलून आनंदाने साधू महाराजांना देते. साधू महाराज तिला आशीर्वाद देतात आणि शिष्यांसोबत निघून जातात.

गावात सगळीकडे जाऊन आल्यावर ते सगळे मठात येतात. परंतु त्यांच्या शिष्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता असते. साधू महाराजांनी ती कधीच हेरलेली असते. मठात परतल्यावर शिष्यांमध्ये कुजबुज सुरु होते. साधू महाराज शिष्यांना निसंकोचपणे त्यांची शंका विचारायला सांगतात.

त्या चिमुकलीने असमर्थता दर्शवली असताना तुम्ही भिक्षेत तिला मूठभर माती द्यायला लावलीत, केव्हाचा हा प्रश्न आमच्या डोक्यात घोळतोय.

ती मूठभर माती मठाबाहेरील अंगणात लावलेल्या फुलंझाडांना घालत साधू महाराज म्हणतात, “केवळ भिक्षा मागणे हा आपला उद्देश नाही, तर लोकांमध्ये दानाचे अथवा अर्पण करण्याचे संस्कार निर्माण करणे हा आपला उद्देश आहे. म्हणून मी तिच्याकडे मूठभर माती मागितली. तिने आनंदाने ती अर्पण केली. असं केल्याने तिला दानाचे महत्व कळले. आज या वयात तिला दानाचे महत्व कळल्याने मोठी झाल्यावरदेखील ती समाजातील गरजूंना मदत करेल. एक चांगला समाज घडवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मी केवळ तेच केलं.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 10:50 am

Web Title: marathi blog good society donation sadhu maharaj indian devotion dd 70
Next Stories
1 Blog: मनोरंजनाचं रिमोट कंट्रोलही कंपन्यांच्याच हाती !
2 जोजी आणि मकबूल
3 स्वतंत्र भारताच्या स्वप्नाळू आकांक्षा जगलेला “हिरो”
Just Now!
X