सुनीता कुलकर्णी

एखादं बाळ घरातल्यांबरोबरच गडबडगुंडा करत लपाछपी खेळत असतं आणि कुणीतरी पकडल्यावर ‘मी लपलोय ना’ असं अगदी निरागसपणे सांगतं. खरं आणि खोट्याची बेमिसाल सरमिसळ करत चाललेल्या त्याच्या ‘मेक बिलिव्ह’च्या खेळात त्याच्या घरातलेही आपली काळानुसार होत गेलेली ‘गेंड्याची कातडी’ वागवत जमेल तेवढ्या उत्कटतेने सामील होतात. अर्थात अशा गमती फक्त माणसांची बाळंच करत नाहीत तर प्राण्यांची बाळंही करतात, हे नुकतंच दाखवून दिलं आहे, थायलंडमधल्या एका हत्तीच्या पिल्लाने.

थायलंडमधल्या चियांग मई या डोंगराळ भागातल्या स्थानिक लोकांनी हत्तीच्या या लडिवाळ पिल्लाचा खट्याळपणाचा व्हिडिओ इंटरनेटवर टाकला आणि त्याने बघता बघता जगभरातल्या अनेकांचं हृदय जिंकून घेतलं.

झालं असं की या भागातलं कुणीतरी रात्रीच्या वेळी आपल्या गाडीने जात असताना त्यांना बाजूला असलेल्या उसाच्या शेताच्या बांधावर काहीतरी हालचाल जाणवली. काय आहे ते बघू या म्हणून त्यांनी बॅटरीचा झोत टाकला तर एक हत्तीचं एक पिल्लू आपल्याच नादात उस खात उभं होतं. अगदी माणसांची बाळं चवीने चॉकलेट खातात तसंच.

अंगावर बॅटरीच्या उजेडाचा झोत पडल्यावर त्या पिल्लाने काय करावं… कुणीतरी आपल्याला उस खाताना बघितलं आहे हे लक्षात आल्यावर काय करावं हे त्याला सुचेना. पटकन ते जागेवरून हललं आणि शेजारीच असलेल्या इलेक्ट्रिकच्या खांबाआड जाऊन दडलं. या खांबाच्या आडोशाला उभं राहिल्यावर आपण कुणाला दिसणार नाही हा विश्वास त्याच्या देहबोलीतून अगदी ठामपणे व्यक्त होत होता.

बॅटरीचा झोत टाकणाऱ्या त्या माणसाने या अवखळ पिल्लाचं छायाचित्र काढून फेसबुकवर टाकलं आणि त्याखाली ओळ लिहिली, ‘ए, आवाज करू नका रे, कुणीतरी बघेल. आवाज न करता उस खा बरं सगळ्यांनी’. नंतर ते छायाचित्र ट्वीटर, इन्स्टाग्राम, रेडिट या समाजमाध्यमांमध्ये चांगलंच व्हायरल झालं.

आपण लपलो म्हणजे आता आपण इतर कुणालाच दिसणार नाही असं मानून घेणाऱ्या या खट्याळ हत्तीबाळाला बघून बहुतेकांना आपापल्या घरातली अशी निरागस लबाडी करणारी सोनुली आठवली असतील. किंवा आपलं असं निरागसपण कधी गळून पडलं ते कळलंही नसल्याची खंत वाटली असेल.

दरम्यान थायलंडमध्ये जगाच्या तुलनेत हत्तींची संख्या भरपूर आहे. हत्तींना कायद्यानेच संरक्षण आहे. हत्तींना इजा करणाऱ्यांना भरपूर दंड लावला जातो. त्यासाठी तुरुंगवासाचीही शिक्षा आहे.