– शेखर जोशी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांना वादाची फोडणी मिळाल्याशिवाय ती पार पडू शकत नाही, असे चित्र गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळाले असले, तरीही वादाची पंरपरा जुनीच आणि नित्याचीच झाली आहे.

ठाणे येथे झालेले संमेलन ‘दादोजी कोंडदेव’ नावाने असलेल्या प्रेक्षागृहात झाले, म्हणून आणि स्मरणिकेतील नथुराम गोडसे यांच्या उल्लेखामुळे गाजले. महाबळेश्वर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाला निवडून आलेल्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागल्याने ते उपस्थित राहिले नव्हते. डॉ. आनंद यादव लिखित ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीवरून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

सांगलीत २००८ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनात अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे त्यावेळचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी, यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश न आणता केवळ कुंकू लावलेला तांब्याचा लोटा आणला, असे विधान करून एकच खळबळ उडवून दिली होती. याच संमेलनात मावळते अध्यक्ष प्रा. अरुण साधू हे संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांच्याकडे सूत्रे प्रदान करण्यासाठी उपस्थित राहिले नाहीत. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ राजकीय नेत्यांची मक्तेदारी ठरत असून त्यामुळे महामंडळाच्या बैठकीत ठरल्यानुसार कार्यक्रम झाले नाहीत, असा आक्षेप साधू यांनी नोंदविला होता.
१९९९ मध्ये दादर येथे झालेल्या साहित्य संमेलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांची बैल म्हणून संभावना केल्याचा मुद्दा गाजला होता.

१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीचे पडसाद त्या वेळी झालेल्या साहित्य संमेलनात उमटले होते. ते संमेलन दुर्गाबाई भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. यशवंतराव चव्हाण हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. संमेलनाच्या व्यासपीठावरूनच राजकारण्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येऊ नये, अशी ठाम भूमिका मांडली. १९७७ मध्ये पुण्यात पु. भा. भावे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन झाले होते. हे संमेलन उधळण्याचा प्रयत्न झाला होता.

१९८० मध्ये मराठावाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले होते. नामांतराच्या मागणीसाठी संमेलनस्थळी मोर्चा आणण्यात आला होता. त्या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. गं. बा. सरदार हे त्या मोर्चाला सामोरे गेले होते.

2013 मध्ये चिपळूण येथे झालेल्या साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणुकीतील एक उमेदवार ह. मो. मराठे यांनी मतदारांना पाठविलेल्या पत्रातील विशिष्ट मजकुरावरून वादाला सुरुवात झाली होती. चिपळूण साहित्य संमेलनातही भगवान परशुराम यांची प्रतिमा व्यासपीठावर लावण्यावरुन वाद निर्माण झाला होता. परशुराम यांची प्रतिमा लावण्यास संभाजी ब्रिगेडने विरोध करुन साहित्य संमेलन उधळण्याची धमकी दिली होती. आता यवतमाळ संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने वादाला सुरुवात झाली आहे.