14 December 2019

News Flash

BLOG : राज ठाकरे तुम्ही मराठी माणसाची फसवणूक करत नाही का ?

विरोधी पक्षात असताना तुम्हाला जनतेची साथ असते. त्यामुळे सत्तेची जमीन तिथेच तयार होते. पण मनसेच्या बाबतीत हे उलट आहे.

भाषण करणं ही एक कला आहे. प्रत्येकालाच ही कला जमत नाही. ऐकणाऱ्याला त्याच जागी खिळवून ठेवणे ज्याला जमते तोच उत्तम वक्ता असतो. सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोडल्यास असा वक्ता दुसऱ्या कुठल्याही पक्षात नाही. पूर्वी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणासाठी लोक खास वेळ काढून जायचे. आता राज ठाकरे यांच्या भाषणाबद्दल लोकांमध्ये अशी उत्सकुता दिसते. निवडणूक महापालिकेची असो वा लोकसभेची या पक्षाची नेहमीच हवा असते. एक नगरसेवक किंवा एक आमदार असला तरी एखाद्या कळीच्या मुद्यावर राज ठाकरे काय भूमिका घेणार याबद्दल जनतेच्या मनात कुतूहल असते. सलग पराभवानंतरही हा पक्ष अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहे त्याचे एकमेव कारण आहे राज ठाकरे. पण राज ठाकरेंना जाहीर सभांपलीकडे आपला करिष्मा दाखवता आलेला नाही.

मनसेची स्थापना होऊन १३ वर्ष झाली. पण आजही मनसेला लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार सापडू नये. हेच या पक्षाचे दुर्देव आहे. विषयाला धरुन मुद्देसूद विरोधकांची चिरफाड करण्यात कोणीही राज ठाकरेंचा हात धरु शकत नाही. गेली चार वर्ष राज ठाकरेंनी हा काम चोख बजावलं. वास्तविक विरोधी पक्षात असताना तुम्हाला जनतेची साथ असते. त्यामुळे सत्तेची जमीन तिथेच तयार होते. पण मनसेच्या बाबतीत हे उलट आहे. प्रखर विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावूनही मनसेकडे आज लोकसभा निवडणूक लढवण्याची ताकत नाही. ही अशी वेळ पक्षावर का आली ? याचा विचार राज ठाकरेंनी करणे गरजेचं आहे.

राज ठाकरे आता नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगळीला पराभूत करण्याचा अजेंडा घेऊन मैदानात उतरले आहेत. त्यांना या दोघांबद्दल इतका राग का आहे? ते ठाऊक नाही. मोदी-शाहंना पराभूत करण्याचा त्यांचा अजेंडा असला तरी वास्तव हे आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करण्याची वेळ आली आहे. मूळात या दोन्ही पक्षांचे विचार हे मनसेच्या वैचारीक भूमिकेच्या बिलकुल विरुद्ध आहेत. नोकरी-व्यवसायात भूमिपुत्राला पहिले प्राधान्य मिळाले पाहिजे. महाराष्ट्रात रहाणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे ही मनसेची भूमिका आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादीला मनसेचे हे विचार मान्य नाहीत. त्यांनी अनेकदा यावरुन राज ठाकरेंवर बोचरी टीका सुद्धा केली आहे. पण आज राज ठाकरे आपल्या मूळ वैचारीक विरोधकांनाच मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.

राज ठाकरेंनी कधी काळी कृपाशंकर सिंह, संजय निरुपम या काँग्रेसच्या उत्तर भारतीय चेहऱ्यांविरोधात मोहिम उघडली होती. त्यावेळी काँग्रेस या दोन्ही नेत्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी राहिली होती. आज राज ठाकरे त्याच काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. ही मराठी माणसाची फसवणूक नाही का ?

चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत अशी राज ठाकरे यांची इच्छा होती. त्यावेळी मोदींना मदत करण्यासाठी म्हणून त्यांनी मुंबईत भाजपाविरोधात उमेदवार उभे केले नव्हते. मग आता असे काय झाले ? की मोदी आणि शाह जोडगळी त्यांना इतकी खुपते आहे. मोदींच्या काळात देशाची प्रगती खुंटली असे राज ठाकरे आता म्हणतात. पण मनमोहन सिंग यांच्या काळात तरी देश कुठे खूप प्रगतीपथावर होता. त्यावेळी तर उलट धोरणलकवा होता. त्या तुलनेत परिस्थिती आता बरी आहे. पुढच्या पाच वर्षांनी राज ठाकरे तिसऱ्यालाच मतदान करा म्हणून सभा घेतील. त्यांना मानणाऱ्या माझ्यासारख्या मतदारांनी त्यांच्यामागे किती फरफटत जायचे ? याचा विचार राज ठाकरे करणार आहेत का ?

First Published on April 16, 2019 11:01 am

Web Title: mns chief raj thackeray marathi manoos
Just Now!
X