निनाद सिद्धये

२००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निर्मिती झाली तेव्हापासूनच्या १३ वर्षांत या पक्षाचा प्रवास कमालीचा रोचक झाला आहे. राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेलं एक फायर ब्रँड व्यक्तिमत्व. बाळासाहेबांच्या राजकीय आणि खासगी स्वभावाची फोटो कॉपी असणाऱ्या राज यांनी प्रारंभी पासूनच कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष बांधायला, वाढवायला घेतला. पक्ष स्थापनेनंतरच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत अप्रत्यक्षपणे राज यांच्या मनसेमुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सगळे उमेदवार मुंबई महानगर प्रदेशात निवडून आले होते. राज यांच्या प्रत्येक उमेदवाराने सेना-भाजपची किमान लाखभर मतं खात काँग्रेस-राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे मदतच केली होती. आता तब्बल १३ वर्षांनंतर पुन्हा मनसेने लोकसभा निवडणूक लढवावी, असा जावई शोध काही राजभक्तांनी लावला आहे. त्याच्या मागे त्यांनी मागच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांची आकडेवारी वानगी दाखल दिली असली तरी दशकभरात पुला खालून बरंच पाणी वाहून गेल्याचे हे राजभाट सोयीस्कररित्या विसरले आहेत.

Nashik, Chhagan Bhujbal, dada bhuse,
नाशिकच्या जागेवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये वर्चस्वाची लढाई
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Ajit Pawar and Sharad Pawar
लोकजागर- विभाजितांची ‘हतबलता’!
amar kale wardha marathi news, ramdas tadas marathi news
वर्ध्यात राष्ट्रवादीच्याच दोघांमध्ये लढत ?
वीस वर्षे ‘ज्या’ व्यक्तीविरोधात संघर्ष केला तिलाच राष्ट्रवादीने आयात केलं, साहजिकच विलास लांडे नाराज होतील – अमोल कोल्हे

अनेक वर्षांपूर्वी निवडणुकींच्या मोसमात महाराष्ट्र टाइम्समध्ये काम करतानाचा किस्सा. एक वरिष्ठ राजकीय पत्रकार छगन भुजबळांची सभा कव्हर करून आले होते. सभेला असलेली तुडुंब गर्दी पाहून ही सीट राष्ट्रवादीच्याच खिशात जाणार, असा कयास या वरिष्ठ पत्रकाराने सभास्थानाहून निघताना भुजबळांकडे बोलून दाखवला. पण भुजबळांच्या चेहऱ्यावर उत्साह नव्हता. “केवळ गर्दीवर जाऊ नका; तिचं रुपांतर मतात व्हावं लागतं,” असं भुजबळ त्यांना म्हणाले होते. राज यांच्याबाबत हे उदाहरण तंतोतंत लागू पडतं.

राजकारणात निव्वळ सभा गाजवत मतं मिळवण्याचे दिवस आता इतिहास जमा झाले आहेत. क्रिकेट मॅचप्रमाणे या सभा सगळ्या वाहिन्यांवरून लाइव्ह दिसत असतात. राज ठाकरेंच्या अशा अनेक सभांचे यूट्यूब व्हिडियो अगदी तिकीट लावून नाक्यानाक्यांवर लावले, तरी पब्लिक त्याला तुफान गर्दी करेल. पण मनावर राज्य करणाऱ्यांना हेच राज्य विधान भवनातून चालवायचं असेल, तर “मतांवर” राज्य करणं अधिक आवश्यक असतं, हे राज यांच्या भाटांनी त्यांना समजावून सांगायला हवं. आज परिस्थिती अशी आहे की, राज ठाकरे यांच्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई सोडले, तर नेता औषधालाही नाही. एकेकाळी शिरीष पारकरांसारख्या जाणत्या सहकाऱ्यांसोबत असणाऱ्या राज यांनी कार्यकर्ते सोडाच, पण नेत्यांची फळी बांधण्यासाठी काही विशेष उल्लेखनीय केलेले दिसत नाही. मुंबई, थोडे फार नाशिक सोडले, तर त्यांच्या पक्षाची अवस्था राज्यात फारच दयनीय अशी आहे. महापालिका निवडणुकीत ज्यांचा एकही उमेदवार निवडून येत नाही, त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची स्वप्ने पाहणे, म्हणजे पोपटवाडी इलेव्हनने क्रिकेट वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न पाहण्यापैकी आहे.

निवडणुका लढवण्यासाठी मुद्दे असावे लागतात. एकेकाळी मोदी प्रेमाचे भरते येऊन अहमदाबादवारी करणाऱ्या राज ठाकरेंकडे आज कोणते राजकीय मुद्दे आहेत? सध्याच्या सरकारविरोधात सांस्कृतिक दहशतवाद, पुरस्कारवापसी, मॉब लिचिंग, नोटबंदी, जीएसटीमुळे छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान हे मुद्दे मांडण्याआधी अभ्यासावे लागतील. पण साधा प्रभादेवी फूट ओव्हरब्रीज कोसळल्यानंतर किंवा अंधेरीतील पुलाचा भाग कोसळल्यानंतर जो नेता तिथे जाऊन साधी पाहणीही करत नाही, त्याला मुंबईकर मराठी माणसाने आपले का म्हणावे?
आज कोट्यवधी मुंबईकर जीवमुठीत धरून लोकलने प्रवास करतात. जवळपास ९९ टक्के मराठी कामगार असलेल्या बेस्टमध्ये आठवडाभर संप करून मागण्या मान्य करून घ्याव्या लागतात, हे विषय राज ठाकरे यांना आपले का वाटू नयेत? त्यावर त्यांनी आंदोलन का उभारू नये? एकेकाळची त्यांची गाजलेली ब्ल्यू प्रिंट नेमकी कुठे गेली?

मुंबईकरांशी तुटत चाललेली नाळ जोडण्यासाठी राज काहीच प्रयत्न करताना दिसत नाहीत. एकेकाळी उत्तर भारतीयांना फटकावून झाले, टोलविरोधातले दुकान लावून झाले, आता मुद्दा काय, असा प्रश्न पडल्यानंतर मग मोदी-शहा जोडीवर कुंचलेबाजी करण्याची स्ट्रॅटेजी राज राबवताना दिसतात. मात्र आपण काय करू, यांच्यापेक्षा वेगळे का ठरू, आपल्याला लोकांनी मते का द्यावीत, यावर ते कधीच बोलताना दिसत नाहीत. खरे तर आजही राज यांची पत्रकार परिषद असेल, तर सगळे मराठी पत्रकार उरलेली कामे सोडून कृष्णकुंजवर धावतात. मराठी वाहिन्यांवर ते लाइव्ह झळकतात.पण हे फक्त टीआरपीपुरते असते, हे न कळण्याइतके राज निश्चितच दूधखुळे नाहीत.एकेकाळी १३ आमदारांसह राज्यात एक नवी ताकद उभी करू पाहणाऱ्या राज यांच्याकडे आजही मराठी जनता आशा लावून पाहते आहे. मात्र याचा अर्थ त्यांच्या कार्टून्सना अथवा त्यांच्या अफलातून नकलांना दाद म्हणून हीच जनता त्यांच्या पारड्यात सत्तेचे कुंचले टाकेल, असे म्हणावे का? सध्या तरी तसे म्हणता येत नाही.केवळ पक्षाच्या झेंड्यात निळा आणि हिरवा रंग घालून भागण्यातले नाही, हे कळावे लागते.

पक्षस्थापनेनंतर मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजातले तरुण व मराठी मुसलमान मुले राज यांच्याकडे आकृष्ट झाली होती. त्या लाटेवर राज यांना कधीच स्वार होता आले नाही. मात्र आजही वेळ गेलेली नाही. पक्षाला मजबूत करण्यासाठी राज्यभरात नेत्यांची फळी उभारणे, आजच्या भाषेत सांगायचे तर नेटवर्किंगवर भर देणे आणि मतदारांना आकृष्ट करणे, हीच त्यांच्या दृष्टीने मोठी प्राथमिकता असायला हवी. “पहले अपने गिरेबान में झांक कर देखो,” असा सल्ला मराठी माणूस निश्चितच राज ठाकरेंना देऊ इच्छितो.

 

(लेखक माध्यम सल्लागार आहेत)