– योगेश मेहेंदळे

चार साधक ठरवतात की आपण दोन आठवडे मौन पाळायचं आणि फक्त ध्यान करायचं…
पहिला दिवस संपतो, रात्र होते. मेणबत्ती लावलेली असते ती वाऱ्यामुळे विझते.
पहिला साधक: अरे… मेणबत्ती विझली की!
दुसरा साधक: आपण मौन पाळायचं ठरवलेलं, तू बोललास का?
तिसरा साधक: तुम्ही दोघांनी शांततेचा भंग का केलात?
चौथा साधक: बघा, मी एकटाच असा निघालो की जो बोलला नाही…
चौघाही साधकांनी पहिल्याच दिवशी मौन सोडलं आणि शांततेचा भंग केला.

या चार साधकांच्या उतावीळपणामध्ये आणि नाट्यगृहामध्ये मोबाईल सायलेंटवर न ठेवणाऱ्या प्रेक्षकांमध्ये कसलाही फरक नाहीये. किमान त्या चार साधकांचा जगाशी संबंध नव्हता, जर काही नुकसान झालं असेल तर ते त्यांच्या साधनेचं झालेलं आहे. नाट्यगृहात मोबाईल सायलेंटवर न ठेवणारे प्रेक्षक मात्र शेकडो जणांचा रसभंग करतात, ज्याच्याविरोधात सुमित राघवन व सुबोध भावेसारख्या कलाकारांनी आवाज उठवलाय. यासाठी त्यांचं केवळ अभिनंदन करून उपयोगाचं नाही तर त्यांचा आवाज नाट्यगृहात जाणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या कानापर्यंत पोचवायला हवा.

एका अत्यंत उपयुक्त गोष्टीचं आपण मातेरं कसं करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोबाईल आहे. संपूर्ण जगाशी संपर्कात ठेवणाऱ्या आणि इंटरनेटवरचं अद्ययावत ज्ञान हाताच्या मुठीत आणणाऱ्या मोबाईलच्या मुठीत आपण कसे अडकलो गेलो हेच अनेकांना कळत नाही. या मोबाईलच्या व्यसनाचं पर्यवसान काही काळ जर त्यापासून लांब रहावं लागलं तर आपण जणू काही निरुपयोगीच झालो की काय असं वाटायला लावणाऱ्या न्यूनगंडात झालेलं बघायला मिळतं. अनेकजण तर मोबाईल वाजो न वाजो उगाच सारखं बघत राहतात, कुणाचा कॉल तर येऊन नाही ना गेला? व्हॉट्स अॅप मेसेज तर बघायचा नाही ना राहिला? कालांतरानं, हे मोबाईल वेड इतरांसाठी त्रासदायक तर नाही होत ना? याचा विचार करायची एखाद्याची क्षमतादेखील गमावून बसते.

नाट्यगृहामध्ये मोबाईल सायलेंटवर न ठेवणे हा उच्छादाचा एकमेव प्रकार नाहीये, तर विविध गंडांनी ग्रस्त असलेल्या व्यक्ती समाजाला अनेक मार्गांनी त्रास देत असतात. कायद्यानं बंदी असलेले कर्णकर्कश्श प्रेशर हॉर्न असलेल्या बाईक्स व कार्स, बंदी असलेले अत्यंत प्रखर पांढऱ्या रंगाचे व समोरच्या चालकाला क्षणभरासाठी आंधळं करणारे हेडलाईट्स, कुठल्या ना कुठल्या निमित्तानं रात्री-अपरात्री लागणारे कान बधीर करणारे डीजे, कार बसमधून लहानमोठा कचरा तर सोडाच… चक्क रिकाम्या पाण्याच्या, शीतपेयांच्या बाटल्या फेकणारे महाभाग, सहलींच्या ठिकाणांचं डंपिंग ग्राउंड करणारी आणि कुणाला दुखापत वगैरे होईल याचा विचार न करता बीअरच्या बाटल्या फोडणारी धेंडं… ही यादी संपता संपता संपणार नाही. स्वत:पलीकडे काहीही न दिसणाऱ्या नार्सिसिस्ट लोकांचा हा उच्छाद हे जग जेवढं कुरूप करतो तेवढं कदाचित दुसरं कुणीही करत नसेल. परंतु दुर्देवाची बाब ही आहे की अशा निर्बुद्धांची संख्या प्रचंड आहे. जर प्रत्येकानं थोडा विचार केला, स्वत:वरून लक्ष हटवून बाहेर बघितलं व दुसऱ्यांचा विचार केला तर काही चांगलं घडू शकतं. जर अशा मोबाईलग्रस्तांना वेळीच आवरलं नाही तर कदाचित नाटक सुरू असताना स्टेजवर जाऊन सेल्फीही काढायला काहीजण कमी करणार नाहीत. वर At Shivaji Mandir with @Subodh Bhave अशी पोस्टही फेसबुकवर टाकतील. त्यामुळे नाटक किंवा सिनेमा बघायला आलायत, तर तीन तास फक्त तेवढंच करा बाकी सगळ्या गोष्टी बाहेर ठेवा असं सांगायची वेळ आली आहे.

चारही साधकांचं मौन पहिल्याच दिवशी सुटलं कारण त्यांचं लक्ष ध्यानावर नव्हतं, तर मौन सोडण्यासाठी लागणाऱ्या कारणांवर होतं. ज्यादिवशी प्रेक्षकांचं लक्ष खऱ्या अर्थी मोबाईलवरून उडून नाटकावर जाईल, ज्यादिवशी तीन तासांसाठी ते जगाशी संपर्क ठेवणाऱ्या मोबाईलमध्ये न गुंतता नाटकाचा किंवा सिनेमाचा आस्वाद घेतील; त्या दिवसापासून मोबाईल सायलेंटवर ठेवा असं आवाहन करण्याची गरज सुबोध भावे वा सुमीत राघवन यांना लागणार नाही.