जय पाटील

तुम्ही सर्वांनी बोकडदाढीविषयी ऐकलं असेल. पण माकडदाढीविषयी ऐकलं आहे का? नसेल तर इन्स्टाग्रामवर मंकी टेल बियर्ड असा सर्च देऊन पाहा. दाढीचा एक एकदम हटके प्रकार पहायला मिळेल.

नवं वर्ष सुरू झालं आहे आणि जुनाट फॅशन मागे टाकून जरा काहीतरी फ्रेश, आगळंवेगळं सर्वांनाच हवं आहे. ज्यांना गर्दीत आकर्षणकेंद्र ठरायला आवडतं, आपल्या लुक्समध्ये भन्नाट प्रयोग करण्याचं साहस ज्यांच्यात आहे त्यांच्यासाठी मंकी टेल बियर्डचा कोरा करकरीत पर्याय उपलब्ध झाला आहे. २०२१ला पार्श्वभूमी आहे ती करोना आणि लांबलचक टाळेबंदीची. ऑफिस, सण-समारंभ सारं घरीच आणि बाहेर पडल्यास संसर्गाचा धोका असल्यामुळे गेल्या ९-१० महिन्यांत अनेकजण सलॉनची पायरीच चढले नाहीत. केस आणि दाढीच्या वाढलेल्या जंगलाचे फोटो, त्यासंदर्भातली चॅलेन्जेस यांनी मधला काही काळ गाजवला. आता ऑफिस सुरू होताना पुन्हा गुळगुळीत दाढी करण्यापूर्वी मंकी टेल बियर्डचा ट्रेण्ड अनेकांनी फॉलो केला आहे.

एका बाजूने फ्रेन्च बियर्डमध्ये ज्याप्रमाणे दाढी आणि मिशी जोडलेली असते त्याप्रमाणे आकार देऊन दुसऱ्या बाजूने दाढीचं टोक माकडाच्या शेपटीप्रमाणे लांबलचक ठेवून केली जाणारी ही रचना लोकप्रिय होत आहे. ट्रेण्ड फॉलो करणाऱ्यांना आपल्या या प्रयोगाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. कोणी ही माकडदाढी विविध रंगांत रंगवली आहे, तर कोणी माकडाप्रमाणेच हावभावही केले आहेत. कोणी वाढलेली झुपकेदार दाढी, कोरलेली माकडदाढी आणि त्यानंतर ती सुद्धा काढून टाकून गुळगुळीत झालेला चेहरा अशा विविध टप्प्यांतील छायाचित्रांचे कोलाजही अपलोड केले आहेत.

दाढी-मिशीसाठी प्रसाधने निर्माण करणाºया कंपन्यांनी देखील ही नामी संधी साधली आहे. माकडदाढीच्या माध्यमातून बियर्ड ऑइल, जेल, शॅम्पू, बियर्ड कंडिशनरसारख्या उत्पादनांची जाहिरात करण्यात येत आहे. पुरुषांच्या फॅशनची धाव कुंपणापर्यंतच असणार असं ज्यांना वाटतं त्यांना आव्हान देणारा ट्रेण्ड वर्षाच्या सुरुवातीलाच सेट झाला आहे.