News Flash

Jaanu Movie Review : १७ वर्षांच्या विरहानंतरच्या एका रात्रीची कथा

हा '96' या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे

– जुई कुलकर्णी

तरल, सालस, नितळ, निवळशंख प्रेम अस्तित्वात असतं यावरचा विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर जानू ही तेलुगू फिल्म पहायला हवी. हा ’96’ या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे.

साधारणतः कुमारवयीन प्रेमाला विरहाचा शाप असतो. निदान पूर्वीच्या काळी तरी तो असायचाच. संपर्काची मोबाईलसारखी माध्यमं नव्हती, सोशल मीडिया नव्हता. त्याकाळी माणसं वर्षानुवर्षे वेगवेगळ्या कारणांनी तुटायची. कुमारवयीन प्रेम निदान पंधरा सोळा वर्षापूर्वी निरागस असे. काहीजणांना तर साधं व्यक्त होण्याचाही फार प्रश्न येत असे. (आता शाळेतच पॉर्न पाहणाऱ्या पिढीला हे समजणंही अवघडच आहे. )

कुमारवयीन प्रेम स्वप्नासारखं सुंदर, गोंडस असे. त्याला अनेकदा लग्न नामक व्यवहाराचं नख लागत नसे, त्यामुळे त्या प्रेमाचं सौंदर्य अबाधित राहत असे. अशा प्रेमात ना अतिसहवासाने कंटाळा वा कटुता येई, ना परिस्थितीचे चटके बसत, ना व्यवहार, तडजोड करायला लागे, ना इतर नात्यांचा गुंता मधे येई.

रामचंद्रन(शर्वानंद) आणि जान्हवी(समंथा) भेटले सतरा वर्षांनी स्कूल री-युनियनला. जानू दुसऱ्या दिवशी सकाळीच सिंगापूरला परत जाणार आहे. या दोघांच्या हातात केवळ रात्रीचे हे काही तास आहेत आणि त्यांना मधली सतरा वर्षं पार करायची आहेत. या एका रात्रीचा चित्रपट आहे हा आणि सतरा वर्षांच्या विरहाचा! अतिशय सुंदर, नजाकतीनं तयार केलेला आणि विलक्षण तरल चित्रपट.

आता या वयातही (जग फिरलेला ) पण इतका लाजरा, सोवळा, सभ्य, गोड पुरूष असू शकतो का यावर विश्वास बसत नाही पण तरी ठेवायचाच. समंथा रूथ प्रभू फार फार गोड आहे. विशेषतः तिच्या डोळ्यांत प्रेम गमावल्याची दुखरी भावना सतत आहे. शर्वानंद समोर ती जरा सरसच वाटते.

जीएंनी जिव्हाळघरटी हा शब्द तयार केलाय. या नाजूक, दुर्दैवी, कमनशिबी, अपूर्ण प्रेमाचा हा चित्रपट पाहताना मला हाच शब्द आठवला. रामचंद्र आणि जान्हवीचं इंटरअॅक्शनही तसंच आहे. अगदी साध्या साध्या सीन्समधे ते दिसतं.

स्त्री पुरूषांमधे शारिरी नात्यापलीकडे काही असू शकत नाही असं वाटणाऱ्या किंवा माणसांमध्ये प्रेम अस्तित्वातच नसतं यावर विश्वास असणाऱ्यांसाठी, इतकं कोरडे पडलेल्यांसाठी अर्थातच ही फिल्म नाही. त्यांनी ही फिल्म बघून वेळ आणि डेटा वाया घालवू नये. उथळ, चमचमीत मनोरंजन हवं असलेल्यांना पण इथं काहीच मिळणार नाही. बाकीच्यांसाठी जानू इज मस्ट वॉच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 4:38 pm

Web Title: movie review of jaanu movie avb 95
Next Stories
1 BLOG : जबाबदार कोण?….
2 BLOG : ज्याचे श्रेय त्याला मिळायलाच हवे…!
3 Birthday Special Blog : या धोनीचं करायचं काय ??
Just Now!
X