23 January 2021

News Flash

BLOG: Definitely Not म्हणणारा धोनी IPL 2021चं आव्हान पेलू शकेल?

धोनीपुढे पुढच्या हंगामात दुहेरी आव्हान असणार आहे...

महेंद्रसिंग धोनी (फोटो- IPL.com)

विराज भागवत

IPLमध्ये शनिवारचा (१ नोव्हें) दिवस खूपच नाट्यमय ठरला. एकाच दिवशी तब्बल तीन संघ स्पर्धेतून बाहेर झाले. आधी चेन्नईची स्कूटर आपल्या साईड कारमध्ये बसवून किंग्ज इलेव्हन पंजाबला स्पर्धेबाहेर घेऊन गेली. तर नंतर राजस्थानने कोलकातापुढे गुडघे टेकले. शनिवारच्या दिवसात खरं पाहता कोलकाता आणि चेन्नई विजयी झाले. पण चर्चा मात्र कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीनीच दिसली. IPL 2020मधील धोनीची शेवटची नाणेफेक त्याच्या आणि चेन्नईच्या चाहत्यांना नवी उमेद देऊन गेली. नाणेफेकीच्या वेळी धोनीला विचारण्यात आलं होतं की चेन्नईच्या जर्सीमध्ये या तुझा शेवटचा सामना असेल का? त्यावर क्षणाचाही विलंब न लावता धोनीने लगेच उत्तर दिलं, “Definitely Not (नक्कीच नाही)!”

धोनीच्या या दोन शब्दांनी संपूर्ण दिवसभर सोशल मिडियावर फक्त आणि फक्त त्याचीच चर्चा रंगली. चेन्नईच्या चाहत्यांपासून ते टीम इंडियाच्या चाहत्यांपर्यंत सर्वत्र केवळ धोनीचाच जयजयकार दिसून आला. धोनीच्या या रूबाबदार उत्तरामुळे त्याचा ‘कॅप्टन कूल’ अंदाज पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळाला. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेशास परवानगी नसली तरी सोशल मीडियाच्या स्टेडियममध्ये धोनी-धोनीचा गजर चालला असल्याचं खरंखुरं ‘फिलिंग’ अनेकांना आलं. धोनीने आपल्या स्टंपिंगच्या वेगाप्रमाणेच क्षणार्धात ते उत्तर दिलं खरं.. पण त्या दोन शब्दांमागे असलेली जबाबदारी धोनी पेलू शकेल का?

CSKचं गणित कुठे चुकलं?

२०२० हे वर्ष संपूर्ण जगासाठी आणि मानवजातीसाठी एक वाईट स्वप्न असल्यासारखं ठरलं. IPL मध्येही असाच एक विचित्र प्रकार घडला. गेल्या १२ वर्षात प्रत्येकी वेळी बाद फेरी गाठणारा आणि ३ विजेतेपदं पटकावणारा धोनीचा चेन्नई संघ चक्क पहिल्याच फेरीत आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वप्रथम प्ले-ऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडला. प्रत्येक संघ हा ‘होमवर्क’ करून आपले खेळाडू निवडतो. त्यानुसार यंदाच्या हंगामासाठी CSKने आपल्या संघात अनुभवी फिरकीपटू पियुष चावलाला संधी दिली. वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड, सॅम करनला ही संघात समाविष्ट केलं. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर फिरकीपटूंना मदत मिळण्याच्या दृष्टीने पियुष चावलाला ६ कोटी ७५ लाखांना विकत घेण्यात आलं. पण करोनाने चेन्नईच्या साऱ्या योजनांवर पाणी फेरलं. करोनामुळे संपूर्ण IPL हे युएईच्या तीन मैदानांवर खेळवण्यात आलं. त्यामुळे चेन्नईचा पहिला डाव फिसकटला. फिरकी गोलंदाजीला फारशी मदत न मिळणाऱ्या खेळपट्ट्यांवर पियुष चावलाने केवळ ७ सामने खेळले आणि ६ बळी घेतले. २०१८ आणि २०१९ या हंगामात चावलाचे अनुक्रमे १० आणि १४ बळी होते.

दुसरी आणि महत्त्वाची बाब, धोनीच्या चेन्नईतून Mr. Dependable सुरेश रैनाने आयत्या वेळी माघार घेतली. कौटुंबिक जबाबदारीचे कारण देऊन रैना मायदेशी परतला. याचा मोठा फटका चेन्नईच्या प्लेइंग ११च्या संतुलनाला बसला. रैना हा भारतीय फलंदाज संघाबाहेर असल्याने धोनीला वरच्या फळीत शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस या दोन्ही खेळाडूंना खेळवावंच लागलं. तीन-चार वगळता वॉटसनचा यंदाचा फॉर्म फारसा चांगला नव्हता, पण चेन्नईच्या संघाकडे वरच्या फळीत भरवशाचा वाटावा असा भारतीय फलंदाजच नव्हता. त्यामुळे संघात केवळ चार परदेशी खेळाडू असावेत या नियमाने धोनीच्या संघाचं संतुलन बिघडवलं. संघात रैना असता तर कदाचित वॉटसनला लवकर संघाबाहेर करून रायडूला सलामीवीर म्हणून पाठवता आलं असतं आणि एखाद्या भारतीय गोलंदाजाला विश्रांती देऊन त्याजागी जोश हेजलवूड, मिचेल सँटनर किंवा इम्रान ताहीरला फार आधी संघात घेणं शक्य झालं असतं. सुरेश रैना आणि अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग यांच्या माघारीचा मोठा फटका CSKला बसला. CSKने आपल्या बेवसाईटवरून या दोघांची नावंदेखील हटवली. त्यामुळे या दोघांच्या समावेशाबाबत फारशी खात्री देणं शक्य नाही. अशा परिस्थितीत आता IPL 2021मध्ये चेन्नईच्या संघाची नव्याने बांधणी करणं हे धोनीच्या पुढलं मोठं आव्हान असणार आहे.

धोनीची वैयक्तिक कामगिरी

‘Captain Should lead the team from the Front’ असं एक प्रसिद्ध वाक्य आहे. याचा अर्थ कर्णधाराने आपल्या संघाचं नेतृत्व करताना स्वत: आदर्शवत कामगिरी केली पाहिजे. धोनीने गेल्या १२ वर्षात IPLमधील या वाक्याला पूरेपुर न्याय दिला. पण यंदाच्या हंगामात ‘फलंदाज धोनी’ फारसा पाहायला मिळाला नाही. यंदा पहिल्यांदा असं घडलं की धोनीने एखाद्या IPL हंगामात २०० पेक्षा कमी धावा केल्या. ७ पेक्षा कमी षटकार किंवा एकही अर्धशतक न झळकावण्याचंदेखील धोनीचं हे पहिलंच वर्ष ठरलं. गेल्या १३ वर्षांच्या IPL कारकिर्दीत पहिल्यांदा धोनी २५च्या सरासरीने खेळला. ही त्याची आतापर्यंतची सर्वात खराब फलंदाजीची सरासरी ठरली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनी ऑगस्ट २०२०मध्ये निवृत्त झाला. पण क्रिकेटच्या मैदानात तो जुलै २०१९पासून आलाच नव्हता. जवळपास दीड वर्षाच्या विश्रांतीनंतर धोनी कालावधीनंतर धोनीने क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवलं. पण फलंदाजीतील त्याची कामगिरी अगदीच सुमार राहिली. ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलक्रिस्ट किंवा दक्षिण आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स या दोन मोठ्या खेळाडूंनीबद्दल बोलायचं तर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतरही त्यांनी IPLमध्ये उत्तम कामगिरी करून दाखवली होती. गिलक्रिस्ट २००८साली निवृत्त झाला, पण २००९साली त्याने १६ सामन्यात ३ अर्धशतकांसह ४९५ धावा कुटल्या होत्या. इतकंच नव्हे तर त्याने संघाला विजेतेपदंही मिळवून दिलं होतं. डीव्हिलियर्सनेदेखील २०१८मध्ये तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. पण २०१९च्या IPLमध्ये त्याने १३ सामन्यात ५ अर्धशतक ठोकत ४४२ धावा केल्या होत्या. धोनीलाही अशीच चमकदार कामगिरी करणं आवश्यक असणार आहे.

संघबांधणीसोबत वैयक्तिक कामगिरी सुधारण्याचं दुहेरी आव्हान IPL 2021 मध्ये धोनीपुढे असणार आहे. आतापर्यंत धोनी सतत मैदानावर असल्याने त्याची कामगिरी उत्तम झाली. पण एक वर्षापेक्षा जास्त काळ क्रिकेटपासून दूर राहिल्यावर या कामगिरीवर प्रचंड फरक पडला. आता IPL 2021 कदाचित वर्षभराच्या कालावधीपेक्षाही आधीच आयोजित केलं जाईल. पण या मधल्या काळात क्रिकेटपासून दूर राहून दमदार पुनरामगन करण्याचं आव्हान धोनी पेलवू शकेल का, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 2:52 pm

Web Title: ms dhoni definitely not answer for csk superhit on social media but will msd prove himself in ipl 2021 vjb 91
टॅग IPL 2020,Ms Dhoni
Next Stories
1 Blog : अरविंद बाळ नावाचे ब्रह्मवाक्य
2 लॉकडाऊन इन्हे ना रोके…
3 BLOG : भाई, मन्नत बिकती नहीं! – शाहरुख खान
Just Now!
X