08 December 2019

News Flash

BLOG: नरेंद्र मोदींच्या मुंबईतल्या घरासाठी लोकलचे प्रवासी गोळा करणार चंदा

मोदींना लोकल ट्रेनने प्रवास कसा करावा याचे ट्रेनिंग देण्यासही प्रवासी तयार

सोशल मडियावर व्हायरल झालेला मोदींसारखे लुक्स असणाऱ्या व्यक्तीचा फोटो

मंगळवारी मुंबईकर रेल्वेप्रवासी एकमेकांना चिमटे घेऊन आपण स्वप्नात तर नाही ना याची खात्री करत होते. साडे चार वर्षे रेल्वे प्रवासाला अच्छे दिन असं स्वप्न बघितलेल्या प्रवाशांना मंगळवारी आश्चर्याचा धक्काच बसला. सगळ्या लोकल्स चक्क वेळेवर आल्या नी वेळेवर पोचल्या देखील. हरदासाटी गाथा बुधवारी मूळ पदावर आली. आणि खास सूत्रांच्या सांगण्यानुसार रेल्वे प्रवासी संघटनांनी एक धाडसी निर्णय घेतलाय, नोटाबंदीसारखाच! तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबईत घर भेट देण्याचा!

मोदींचं मुंबईत घर असेल तर रोज लोकल वेळेवर धावतील, गाड्यांची संख्या वाढेल, सहा मार्गांचं काम वेगानं होईल, प्रवासी म्हणजे गुरंढोरं नसून माणसंच आहेत अशी भावना रेल्वेच्या अधिकारवर्गात व मंत्रिगणात बळावेल. ‘गोयल’गतीनं धावणारी रेल्वे वेगानं पळेल अशी आशा प्रवासी संघटनेला असल्याचं समजतंय. मोदींनी संपूर्ण मंत्रीमंडळासहीत मुंबईत शिफ्ट होऊन येथूनच देशाचा कारभार हाकावा अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. किमानपक्षी मोदींनी मुंबईच्या घरी महिन्यातून एक चक्कर मारली तरी पुरे यासाठी एक मास्टर प्लॅन बनवला असल्याची माहिती ‘चल ना अंदर, पुरा ट्रेन खाली है’ या प्रवासी संघटनेच्या अध्यक्षांनी दिली आहे.

१८ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी मुंबईत असताना आश्चर्यकारकरित्या मुंबईच्या लोकल ट्रेन ऑन टाइम धावत होत्या. ट्रेन भलत्याच वेळेत असल्याने अनेक प्रवाशांच्या नेहमीच्या ट्रेन सुटल्याची तक्रार अनेकांनी स्टेशन मास्तरांकडे केली आहे. “ट्रेन वेळेत येणार असतील तर तशी माहिती एक दिवस आधी द्यायला हवी होती. ही निव्वळ फसवणूक आहे. आधी ट्रेन लेट करुन साडेसातची ट्रेन आठला पकडायची आम्हाला सवय लावायची आणि मोदी आले की ती बरोबर साडेसातलाच सोडायची हा कुठला न्याय आहे,” असा संतप्त सवाल ‘सीआर धुकं धुकं करने लगी’ या कर्जत-कसारा येथील हिवाळी प्रवाशी संघटनेच्या अध्यक्षांनी केला आहे.

प्रवासी संघटनांकडे ढुंकून न बघणाऱ्या प्रवाशांनी आता स्वत:हून संघटनांकडे धाव घेतली असून मोदींना मुंबईत घर भेट देण्यासाठी निधी उभा करण्याची तयारी दर्शवली आहे. ‘हो हे खरं आहे, आमच्याकडे कालपासून असे अनेक कॉल आले आहेत; मोदींना मुंबईतच ठेऊन घ्या असा आग्रह प्रवासी करत आहेत. रेल्वे प्रशासनाने मोदींचे मुंबईत येणे आणि लोकल ऑन टाइम धावणे हा निव्वळ योगायोग असल्याचा खुलासा केला असला तरी प्रवाशांचा यावर विश्वास नाहीये. लोकल वेळेवर निघाली नी वेळेवर पोचली तर त्या मोटरमनवर शिस्तभंगाची कारवाई करून त्याचा त्या दिवसाचा पगार कापतात हे काय आम्हाला माहीत नाही का? असे एका प्रवाशानं सांगितलं आणि रेल्वेचा खुलासा हाणून पाडला. त्यामुळं काहीही करा पण मोदींना मुंबईत घर घेऊन द्या असा हट्टच आमच्याकडे धऱला असल्याची माहिती ‘वाट पाहिन पण फास्ट लोकलनेच जाईन’ संघटनेच्या अध्यक्षांनी दिली आहे. मोदींना एखाद्या प्राइम लोकेशनला घर घेऊन देण्याचा विचार प्रवासी संघटनांच्या अध्यक्षांच्या कॉनकॉलमध्ये घेण्यात आला. याबद्दल ‘चौथी सीट’ संघटनेचे अध्यक्षांनी माहिती दिली. ‘बघा आम्ही सुंदरदादांच्या गुगलच्या मदतीने हिशोब लावला त्याप्रमाणे मध्य आणि पश्चिम रेल्वेतून रोज ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी ५० लाख लोकांनी पन्नास शंभर रूपये दान केले तरी काही कोटी रुपये जमा होतील. या किंमतीमध्ये दक्षिण मुंबईत मोदींसाठी चांगला फ्लॅट आरामात विकत घेता येईल. सध्या तरी आमची केवळ चर्चाच झाली असली तरी ट्रेन वेळेत येणार असतील तर मोदी काय राष्ट्रपतींनाही मुंबईत ठेऊन घ्यायला लोकल प्रवाशांची काही हरकत नसावी असे सर्वांचे मत पडले’ अशी माहिती अध्यक्षांनी दिली.

रोज लेट मार्क लावून घेऊन काही शे रुपये दर महिन्याला पगारातून कापून घेण्यापेक्षा एकदा शंभर रुपये द्यायला आम्ही तयार असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. उल्हासनगरवरून रोज सीएसटीला येणाऱ्या अमितशेट आहानं मोदी मुंबईत रहायला आले तर चांगलेच होईल असे मत नोंदवले आहे. ‘अरे बडा भाई बॉम्बे मे रहने आऐगा तो १०० क्या हम २०० रुपया भी देने को तयार है’ असे आहा म्हणाले. हे पैसे ऑनलाइन ट्रान्सफरबरोबरच स्वयंसेवकांची तुकडी तयार करुन लोकलमध्ये डबे फिरवण्याच्या माध्यमातूनही गोळा करण्यात येतील. स्वयंसेवक नेमण्याच्या मागणीला अनेक प्रवासी संघटनांच्या अध्यक्षांनी पाठिंबा दिल्याचे समजते.

मोदींना ट्रेनिंग देण्यासही तयार

मोदींनी मुंबईत केवळ राहू नये तर वरचेवर लोकलने प्रवासही करावा म्हणजे ट्रेन जपानसारख्या वेळत धावतील असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळे ‘असेल जागा तरी लटक फुटबोर्डवर’ संघटनेच्या अध्यक्षांनी मोदी लोकलने प्रवास करण्यास तयार असतील तर फूटबोर्डावर दोरीवरच्या कपड्यासारखं लटकत असतानाही मोबाईलवर मन की बात कशी करावी हे शिकवणारा एक क्रॅश कोर्स आम्ही तयार केला असल्याचे सांगितले आहे. शिवाय, ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यावर डब्ब्याबरोबर धावत जाऊन सर्वात आधी आतमध्ये कसे शिरावे, दोन सीट्सच्यामध्ये बसलेल्यांना त्रास न देता उभे कसे रहावे, खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये आडवे होऊन दोघांच्यामधून कसे निसटावे, कोणत्या ट्रेनमध्ये कमी गर्दी असेल याचा अंदाज कसा बांधावा, बॅग पुढे, मागे, खालती, वरती कुठेही लावली तरी ट्रेनमध्ये कसे चढावे, कोणत्या स्थानकांवर टिसी आहेत कोणत्या स्थानकावर नाहीत हे कसे ओळखावे, एमइंडिकेटर कसे वापरावे यासारखे अनेक विषय या चार दिवसाच्या क्रॅश कोर्समध्ये तज्ज्ञांकडून शिकवले जातील. मोदी खरोखरच मुंबईत राहतील का नी लोकलने प्रवास करतील का हे येणार काळच सांगेल परंतु मोदींना कट्टर मुंबईकर करण्यासाठी लोकल प्रवाशांनी कंबर कसल्याचे सध्या तरी दिसत आहे.

(हा लेख निव्वल कल्पानात्मक आहे याचा वाचकांनी नोंद घ्यावी)

First Published on December 19, 2018 1:10 pm

Web Title: mumbai local train passenger to brought home for pm modi
Just Now!
X