29 May 2020

News Flash

BLOG : मुंबईतला पाऊस हरवला आहे….

पाऊस सुरु झाला की आत्ता रोमॅटिसझम बाजूला सरतो आणि आठवण येते लोकल गाड्यांची.

पावसात, धुक्यात दडलेला राजाबाई टॉवर, त्याच्या बाजूस आणखीनच अस्पष्ट असलेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत या पार्श्वभूमीवर थ्री पीसी सूट घातलेला अमिताभ आणि साडी नेसलेली मौसमी चटर्जी. दोघेही चिंब पावसात भिजताहेत. मौसमी एखाद्या लहान मुलीप्रमाणे पाण्यात हुंदडते आणि अमिताभ जबाबदारीने तिला सांभाळण्याचा आणि बरोबरीने बागडण्याचा अभिनय करतोय. आरडीच्या संगिताचे सूर दोन कडव्याच्या मधील जागा साधून घेत आहेत आणि मागोमाग लताबाईंचा सूर उमटतो. ‘इस बार सावन बहका हुवा है, इस बार मौसम, बहका हुवा है….’ चित्रपटातला पाऊस बऱ्याच वेळा कृत्रिमच असतो. पण अशी ही काही रिअल टाइम पावसाची चित्रणंदेखील पाहायला मिळतात. मग शब्द, सूर आणि संगीतापेक्षा पडद्यावरचं दृश्य अधिक जिवंत होऊन जातं. मुंबईच्या पावसाचं असं जिवंत दृश्य खूप कमी वेळा पाहायला मिळतं. आणि हल्ली तर ते बंदच झालंय. कारण गीतकार योगेशच्या शब्दातला ‘बहका हुवा मौसम’चा आनंदच मुंबईचा पाऊस मिळवू देत नाही… कारण मुंबईचा तो पाऊसच आता हरवला आहे.

मुंबईतला पाऊस हरवला आहे. खरंच हरवला आहे. म्हणजे तसा तो दरवर्षीच पडतो. पण जो पडतो तो पाऊस नसतोच मुळी. ते असतात पावसाचे निव्वळ आकडे. मग हे आकडेच प्रत्येकाला घाबरवून सोडतात. कारण त्या आकड्यांबरोबर येतात लोकल गाड्या लेट झाल्याचे मेसेज. हल्ली पाऊस रस्त्यावर पडतच नाही. तो आधी व्हॉट्सअपवर आधी पडतो. मग रस्त्यावर जायचं की नाही ते ठरतं. त्यातून गेलोच तर कुठे अडकणार तर नाही ना? आणि अडकलोच तर सर्वात आधी व्हॉट्सअपवर दहाबारा ग्रुपवर अपडेट द्यायचे असतात. जमलंच तर ट्विटर, फेसबुकवर रेल्वे, महापालिकेला टॅग करुन खरडपट्टी काढायची असते. मग वेळ उरलाच तर पावसाकडे पाहायचं असते…. कारण मुंबईचा पाऊस आता हरवला आहे.

पावसातला आनंद कुठंपर्यंत? ऑफीसला पोहचल्यानंतर ते ऑफीसमधून निघेपर्यंत, इतकाच किंवा ऑफीसला जाण्यासाठी घरुन निघण्याआधी आणि घरी पोहचल्यानंतर. कारण ऑफीसला जाण्याआधी पडलाच तर बॉसच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतात. ऑफीसमधून निघताना पडला तर मग घरी कसं पोहचायचं याची चिंता लागून राहते. त्यात पुन्हा तुमचं ऑफीस कुठं आहे त्यावर बरंच अवलंबून असते. मग मधल्या वेळेत फेसबुक आणि व्हॉट्सअपवर पावसाचा आनंद शोधायचा असतो. मातीचा गंध आणि अत्तराचा सुंगध वगैरे लैच जुनं झालं असलं तरी तेच अत्तर पुन्हा पुन्हा शिंपडायचं असते. कारण दुसरं काही सुचतंच नसतं. पाऊस हा रोमॅटिक असतो हेच आत्ता मुंबईकर विसरुन गेलाय…. कारण मुंबईतला पाऊस आता हरवला आहे….

मुंबईतला पाऊस सुरु झाला की आता रोमॅटिसझम बाजूला सरतो आणि आठवण येते ती लोकल गाड्यांची. सायन, कुर्ला, विद्याविहार ट्रॅकवर पाणी साचलंय का याची. रस्त्याने जाणार तर मग हिंदमाता, परळ, माहिम, बीकेसी, असं बरंच काही आठवू लागतं. त्यात पुन्हा आपले लोकप्रतिनिधी टि्वट करतात, गरज असेल तरच घराबाहेर पडा. थोडक्यात काय तर मुंबईतला पाऊस घरातूनच पाहायचा असतो अशाच आपल्या यंत्रणा वागतात.
चित्रपटात पावसाचा रोमान्स जरा अधिकच कृत्रिम असतो हे मान्य, पण आता ‘एक लडकी भिगी भागीसी’ केवळ ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल पुढे जाऊ शकत नसल्यानेच भेटते. त्यात रोमान्सबिमान्सपेक्षा मुंबई स्पिरिट नावाचं गोंडस प्रकरणच अधिक असते. हा पाऊस तुम्हाला प्रेम करण्यापेक्षा जिवंत राहण्यासाठी, हातीपायी धडपणे घरी जाण्यासाठी धडपडायला लावतोय… कारण मुंबईतला पाऊस आता हरवला आहे…

मग या हरवलेल्या पावसाला शोधायला हाच मुंबईकर विकेंडला मुंबईलाच रामराम ठोकतो. घाट चढून घाटमाथ्यावर जातो. तेथे त्याला हा रोमॅटिंक पाऊस शोधायचा असतो. रिज्युवनेट व्हायचं असतं. अशा पाऊस शोधणाऱ्यांची तोबा गर्दी घाटमाथ्यावर साचू लागते. मग तेथेपण तेच. आत्ता लवकर निघायला हवं, नाहीतर परतणाऱ्यांची गर्दी वाढेल, मुंबईत शिरता येणार नाही ही काळजी. मुंबईतल्या पावसात घरी पोहचता येणार नाही म्हणून आणि मुंबईबाहेरच्या पावसात मुंबईत येता येणार नाही म्हणून. पाऊस कमी आणि काळजीच अधिक. घाटावरची ही ठिकाणं मग चार महिने अगदी फुलून जातात. प्रत्येकाच्या पाऊस साजरा करण्याच्या तऱ्हा वेगळ्या. मग घाटमाथ्यावरच्या खेड्यापाड्यातील साधेसुधे गावकरी यांच्या दिमतीला येतात. त्यांना आपलं दोन पैशाच्या रोजगाराची अपेक्षा आणि मुंबईकरांना पाऊस साजरा करायची संधी. मग डोंगरदऱ्यात प्रत्येक विकेंडला मुंबईचेच प्रतिरुप तयार होते. कारण मुंबईतला तो पाऊस आता हरवला आहे….

सुहास जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2019 6:11 pm

Web Title: mumbai rain is missing local trains hindamata parel office weekend jud 87
Next Stories
1 BLOG : मुंबई किनाऱ्याचा लहरी समुद्र – रोहित शर्मा !
2 BLOG : धरण फोडणारे खेकडे आता करणार विधायक कामं!
3 BLOG: सुबोध भावे साकारणार आचार्य अत्रेंचा बायोपिक?
Just Now!
X