– मनोज वैद्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एखादे भव्य विस्तीर्ण पठारावर गवताचे कुरण असते. जेव्हा हवेची झुळूक येते, तसे ते गवतसुद्धा त्या वाऱ्याला साथ देते. जमिनीवर या टोकापासून एक छान लाट तयार होते. खूपच नेत्रसुखद चित्र असतें. मोदींच्या 2014च्या निवडणुकीच्या सभा आठवून बघा. मोदी बोलायचे आणि सभेतील लोक आरंभ तें अंतापर्यंत गवताप्रमाणे डुलायचे. एका लयीत व्हायचे सगळे. कुठलाही कृत्रिमपणा नव्हता. पण गवतला कुठे माहित असते, आपण कुणाचा तरी चारा आहोत. तसेच सभेतील लोकांचे झाले. मोदी यांनी दिलेली आश्वासने साफ खोटी निघणार आहेत, जनसमूहाच्या मनात सुद्धा आले नाही.

मोदी यांच्या अच्छे दिन याबाबतीत काहीच शंका नव्हती. शेतकरी, युवक तसेच महिला या सर्व वर्गाला, मोदी यांनी स्वप्ने दाखविली होती. मग शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव असेल. बेरोजगार तरुणांना वर्षाला दोन कोटी रोजगार असेल. महिलांना महागाई कमी करण्याचे आश्वासन असेल. धर्मांधता व तुष्टीकरण करण्यासाठी नवे “सबका साथ सबका विकास” असेल. हे सगळे मोदी यांनी लावलेला सापळा होता. भारतीय मतदाराला अडकविण्यासाठी.

भारतीयच नव्हे तर, जगातील सगळ्या विकसनशील देशातील, प्रत्येक राजकारणी निवडणूक जिंकण्यासाठी असली दिशाभूल व खोटी आश्वासने देतोच. भारतात तर हे सर्रास होते. भारतीयांना याची सवयच आहे. मग मोदी यांचे काय चुकले. लोकसभा निवडणुकीत मोदींना पाशवी बहुमत मिळाले. त्यानंतर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत अपवाद वगळता चांगले यश मिळाले. लोकांनी मोदींच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवली होती. गुलामगिरीची मानसिकता असलेल्या भारतीयांना सुद्धा असा कोणीतरी नेता हवाच असतो. अगदी गल्लीत असलेल्या भाईसुद्धा चालतो.

प्रत्येक गावात-शहरातील दहावीत पहिला आलेला विद्यार्थी, हा पुढे पदवी परीक्षेतसुद्धा टॉपर असतोच असे नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांची मोठी चूक इथेच झाली. या खंडप्राय देशाचा कारभार ते गुजरातप्रमाणे करायला गेले. सरकारवर नियंत्रण व एककल्ली कारभार यात नक्कीच फरक असतो हे त्यांनी लक्षातच घेतले नाही. मोदी यांचे जर कोणी सगळ्यात जास्त नुकसान केले असेल, तर मोदी यांच्यातील आत्मरत, आत्मकेंद्री, संशयी तसेच त्यांच्यातील हुकूमशाही मानसिकतेने इंग्रजी माध्यमातील पत्रकार आकार पटेल यांनी नरेंद्र मोदी यांच्या मानसिकतेचे वर्णन करताना सांगितले आहे कि, मोदी यांना दोनच वर्ग माहित आहेत.एक तर तुम्ही त्यांची गुलामगिरी स्वीकारली पाहिजे. अन्यथा तुम्हाला त्यांच्या शत्रूच्या यादीतच जागा घ्यावी लागेल. त्यांच्याकडे मित्र, सहकारी हे वर्गीकरणच उपलब्ध नाही.

देशातील जनतेने मोदींना भरभरून मते दिली. देशात असे चित्र निर्माण झाले. जोपर्यंत मोदी ठरवतील, तोपर्यंत ते पंतप्रधान पदावरती राहतील. कोणीच त्यांना हटवू शकत नाही. काँग्रेस तर पुन्हा कधीच दिसणार नाही असे बहुतांश लोक ठामपणे सांगायचे. पण मोदींच्या आतील आत्मस्तुतीच्या मोदीने उचल खाल्ली होती. पंधरा लाखाचा कोट! ज्यावर मोदी -मोदी लिहिले होते. आणि जमीन अधिग्रहण बिलात दुरुस्ती, ज्यामध्ये गब्बर उद्योगपतीच्या हिताकरिता शेतकऱयांच्या बळी दिला जाणार होता. त्याला नगण्य अशा काँग्रेसने विरोध केला. ज्याला पप्पू म्हणून हिणवले जायचे. त्या राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा उल्लेख सूट – बूट कीं सरकार असा सुरु केला. मोदीं या कोटाच्या आत जे गुरफटले ते आजपर्यंत बाहेर पडू शकले नाही. ते वादग्रस्त बिल तर मागे घेतलेच. पण अपवाद वगळता त्यांनी कोट घातला. त्यांना छानछोक्कीची आवड असूनदेखील, त्यांना मी “फकीर”आहे असे सारखे म्हणावे लागायचे. आजपर्यंत मोदी या काँग्रेसने दिलेल्या सूट-बूटच्या टीकेच्या जबर न्यूनगंडातून बाहेर पडू शकले नाही.

मोदींचे सगळ्यात जास्त खोलवर नुकसान त्यांच्यातील अहंकारी मोदींनी केले. बुद्धिमान व्यक्ती एकवेळ उपाशी राहील पण सुमार व अहंकारी मालकाची चाकरी करत नाही. मोदी यांना आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन सोडून गेले हे एकवेळ आपण समजू शकतो. पण स्वतः मोदी यांनी शोधून आणले होते, ते उर्जित पटेल सुद्धा सोडून गेले. नीती आयोगचे अरविंद पानगढिया, राष्ट्रीय आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियम यांनी पळ काढला, यांचा बळी अहंकारी मोदी यांनी घेतला. पण यांचे सल्ले धाब्यावर बसवून मोदी यांनी नोटबंदी सारखा निर्णय घेतला. किंबहुना यांना अंधारात ठेवून घेतला. याचे दूरगामी परिणाम मोदींना तर भोगावेच लागले. देशाची आर्थिक घडी विस्कळीत झाली. लोकांचे रोजगार बुडाले, ऐंशी लक्ष आयकर भरणारे त्या प्रक्रियेतून बाहेर पडले. परंतु मोदी अहंकारी नसते तर असा चुकीचा निर्णय घेतला गेला नसता. मोदींनी नोटबंदीमधून काही तात्पुरते लाभ मिळवले असतील. पण त्याची खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. उत्तर प्रदेशमध्ये काही जागा कमी आल्या असत्या, पण नोटबंदी केली नसती तरी सत्ता आली असतीच. पण आज मोदींना देशातील सत्ता आणताना कठीण झाले आहे.

सेवा व वस्तू कर म्हणजेच जी एस टी बाबतीतसुद्धा मोदींचा हट्टाग्रही स्वभाव नडला. तज्ज्ञ मूग गिळून गप्प होते. तर जेटलीसारखे चमचे तज्ज्ञ झाले होते. त्यामुळे नोटबंदीचे संकट संपत नाही, तोच किचकट जीएसटीने छोटे दुकानदार व सामान्य माणूस भरडून निघाला. मोदी यांच्याविषयी देशात नकारात्मकता स्वतःच मोदी वाढवीत होते. विरोधक थंडच होते. किंबहुना त्याची ताकतच नव्हती. पण त्यामुळं लोकांचा मनातील असंतोष मोदींच्या लक्षातच आला नाही. कधी-कधी दुर्बल विरोधक असल्याने काहीच आंदोलन आदी काही नाही झाले कीं, सत्ताधारी समजून घेतात. आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत. मोदींची यात गफलत झाली. हट्टी मोदी यांनी पंतप्रधान मोदी यांचे बरचसे नुकसान करून ठेवले होते. यामुळे गुजरातमध्ये भाजप सत्तेतून बाहेर पडताना थोडक्यात वाचली. पण गुजरातचा आत्मविश्वास काँग्रेसला भाजपचे बालेकिल्ले मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड हे हस्तगत करताना कामाला आला. अमित शाह यांचे पन्ना प्रमुखसारखे निवडणूक व्यवस्थापन मोडीत निघाले.

आत्ममग्न म्हणजेच नार्सिस्ट मोदी सतत सगळीकडे स्वतःची जाहिरातबाजी करायला भाग पाडत होते. परदेश दौरे, देशातील दौरे. सारखी भाषणे, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सगळीकडे आत्मस्तुती करणारी छबी दिसत होती. आतील हुकूमशहा बाह्यरूपात असणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना विरोधात जाणाऱ्या प्रत्येक घटकांची गळचेपी करायला भाग पाडत होता. विरोधी पक्षातील लोकांवर सरकारी यंत्रणाचा म्हणजेच सीबीआय, इडी व आयकर विभाग यांचा खुलेआम दुरुपयोग सुरु झाला होता. पण या खुनशी व बदला घेणाऱ्या मोदीने पंतप्रधान मोदीविरोधात देशातील सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र आणले. उत्तर प्रदेशमधील एकमेकांचे तोंडसुद्धा न बघणारे सपा व बसपा एकत्र आले. त्यांनी गोरखपूर व फुलपुर या पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवला. जमिनीवर मोदी यांचा पराभव होऊ शकतो, याचे गणित प्रतिशोधाची वृत्ती असलेल्या मोदीने पंतप्रधान मोदी यांचा पराभव करण्यास भाग पाडले. आज उत्तर प्रदेशमध्ये सपा व बसपा महागठबंधनमुळे भाजप देशातील सत्ता गमावू शकते असे आजचे वातावरण आहे.

आज पंतप्रधान मोदीना आतील हेकेखोर मोदीने अडचणीत आणून ठेवले आहे. प्रचार सभामधून पंतप्रधान मोदींसाठी रोजगार, शेती, स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी, स्किल इंडिया, स्टार्ट अप, इ. योजनाबद्दल काहीच बोलण्याची सोय ठेवली नाही. ढोंगीपणा व खोटं बोलणाऱ्या मोदींनी पंतप्रधान मोदी यांना अच्छे दिन व पंधरा लाख रुपये यांची फारच अडचण करून ठेवली आहे. राफेल प्रकरणात अतिसाहसी मोदीने पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करून टाकली आहे. चौकीदार चोर है या मोहिमेला उत्तर देणे, त्यांना कठीण झाले आहे. एकेकाळी सूत्रबद्ध प्रचारासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजप पक्षाला, कधी नामुमकिन मुमकिन है, तर कधी मै भी चौकीदार अशा भंपक घोषणांचा आधार घ्यावा लागत आहे.

राम मंदिरापासूनचा प्रचार लोकांना भावत नाही असे लक्षात आल्यावर, पुलवामाचे शहिद व बालाकोट येथील लष्करी कारवाईच्या नावाखाली पंतप्रधान मोदी यांना मते मागण्याची लाजिरवाणी परिस्थिती कोणी आणली? स्वतःभोंवती क्रमांक दोन कोणीच नसले पाहिजे. मला कोणी प्रतिस्पर्धी नकोच या संशयी मोदीने भाजपची संघ(?) भावना संपवून टाकली आहे. 2014 मध्ये मोदी यांच्या सभांना तिकीट लावून लोक येत होती. सध्या समाज माध्यमातून जे दिसते आहे ते चित्र फारच दारुण आहे. लोकांना पैसे देऊनसुद्धा मोदींच्या सभेतील खुर्च्या भरत नाहीत. समोर असलेल्या काही रांगा सोडल्या तर मोदींच्या भाषणाला कोणाचा प्रतिसाद नसतो. मोदी एकतर्फीच बोलत/रेकत असतात. रेडिओवरच्या मन कीं बात सारखे. समोर फक्त कोमात असलेले, कोणीतरी धरून आणलेली पुतळे असतात. एक निर्जीव गर्दी, जणू काही म्हणतायत मला जाऊ द्या कीं घरी, समस्या वाट पाहत आहेत माझ्या दारी.

मोदी यांचा राजकीय अध्याय वाराणसीत याच निवडणुकीत एखादवेळेस संपू शकतो. प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना प्रतिशोध म्हणजेच बदला घेण्याची प्रवृत्ती असलेले मोदी यांनी, जाणीवपूर्वक त्रास दिला. त्यातून प्रियंका गांधी यांनी जर पंतप्रधान मोदी यांना वाराणसीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर एक इतिहास घडेल. मागील निवडूणुकीत मोदीलाट होती. त्याची आकडेवारी लक्षात घेतली तर, पंतप्रधान मोदी यांना जर सर्व विरोधी पक्षाची संयुक्त उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांना मान्यता देण्याच्या हालचाली सुरु आहेत. वाराणसी मधून भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद रावण हे मोदी विरोधात निवडणूक लढणार होते. परंतु त्यानीं अचानक माघार घेतली व त्यांनी सपा व बसपशी जुळवून घेत्तले, यापूर्वी तसेच रावण रुग्णालयात होते त्यावेळी प्रियांका गांधी यांनी त्यांची घेतलेली सदीच्छा भेट लक्षात घेतली पाहिजे. ही लढत झाली तर मात्र पंतप्रधान मोदींच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट सुद्धा ठरु शकतो. पण या लढतीसुद्धा मोदीच यांनी ओढवून घेतल्या असेच म्हणावे लागेल.

एकूणच मोदी यांनी आपल्यातील मोदी यांना आवर घातला असता. एक पंतप्रधान म्हणून जर प्रामाणिकपणे कर्तव्य निभावले असते. आणि त्यांना त्यांची वचने पूर्ण करण्यात जरी अपयश आले असते. आणि त्यांनी भारतीय जनतेला आवाहन केले असते. मला अजून एक संधी द्या. तर आज देशातील चित्र वेगळे असते. आज जे काही उगवले आहे ते मोदी यांनीच पेरले आहे. त्यांच्यातील उग्र मोदी काही ऐकत नाही हे प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीवरून लक्षात आलेच आहे. म्हणूनच मोदी यांचा पराभव केला तर तो फक्त मोदीच करतील!

(लेखक राजकीय विश्लेषक आहेत)

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi will be defeated by modi himself
First published on: 24-04-2019 at 16:27 IST