-श्रुति गणपत्ये
जगामध्ये गरिबी माणसाला काहीही काम करायला भाग पाडते आणि हास्यास्पद, गलिच्छ, घृणा आणणारी कामंही लोकं पोटाची खळगी भरण्यासाठी करतात. अशाच एक कामावर तरुण दिग्दर्शक प्रतिक वत्स याने “इब आले ऊSS” हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला आहे. चित्रपटाच्या नायकाला दिल्लीच्या मुख्य भागामध्ये रायसिना हिल्स, विज्ञान भवन, पार्लमेंट स्ट्रीट इथे माकडं पळवण्याचं काम मिळतं. तोंडाने इब आले ऊSS असा आवाज काढून त्यांना पळवायचं. काठी दाखवणं, हाताने मारणं याला मात्र “प्राणी वाचवा”वाल्यांचा विरोध. त्यामुळे आव्हानात्मक असं काम. मी दिल्लीला कामासाठी असताना माझ्या पार्लमेंट स्ट्रीटवरच्या कार्यालयाच्या आजूबाजूला एक असा माकड पळवणारा माणूस होता. दहा-बारा वर्षांपूर्वी त्याला ३०० रुपये महिना मिळायचे. तर दिल्लीच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा हा नायक नाखुषीनेच हे काम स्वीकारतो आणि ते टिकवण्यासाठी झुंजत राहतो. ही कथा इतकी सुंदर रंगवली आहे की, फालतू वाटणाऱ्या या कामामध्ये काय काय समस्या येतात, त्याचा मुकाबला तो कसा करतो, काय क्लुप्त्या लढवतो, प्रजासत्ताक दिनी या माकड पळवणाऱ्यांची जबाबदारी कशी वाढते, त्यांच्यावर मंत्रालयाकडून कसा दबाव येतो, कामाचं मूल्यमापन करणारा कंत्राटदार या लोकांना कसा नाडतो आणि तुटपुंज्या पैशांसाठी त्यांचं कसं शोषण करतो, अशी ती कथा उलगडत जाते. त्याचा शेवटही अगदी व्यावहारिक आहे. गरिबांसाठी चमत्कार घडत नाहीत. त्यांचं आयुष्य बहुतांशवेळी तसंच राहतं आणि ते गरिबीतच मरतात. मूळात गरिबीचं भांडवल न करता त्या परिस्थितीमध्ये जगण्याचा संघर्ष करणारा हा नायक म्हणजे भारतातली अर्धी तरुण पिढी आहे. काम करायची, मेहनत घ्याचयी इच्छा आहे पण संधी नाही. नोकरीचा बाजार हा त्यांच्या गरिबीचा फायदा उठवतो आणि त्यांचं शोषण करतो. मग मिळेल ते काम मन मारून करत राहणं हेच त्यांचं भविष्य असतं. मूळात असं माकड पळवणाऱ्याच्या आयुष्यावर अख्खा चित्रपट काढणंच हीच बॉलिवूडसाठी मोठी गोष्ट आहे.

वेगळ्या, विचित्र कामांबद्दल बोलायचं तर “मसान”मधल्या नायकाचं कुटुंब हे वाराणसीच्या घाटावर प्रेतं जाळण्याचं काम करतात. अर्थात हा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय असल्याने नायक त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करतो. राजपाल यादवच्या “सी कंपनी”मध्ये तो एका मॉलमध्ये कार्टूनचे कपडे घालून मुलांचं मनोरंजन करतो. दिवसभर ते जड कपडे, मुखवटा घालून लहान मुलांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आपल्या कामाचं खरं स्वरुप तो कधी घरी सांगतच नाही. मात्र बाकी चित्रपट अगदीच बकवास आहे.

आतापर्यंत भारतातल्या गरिबीचं चित्रण करणारे अनेक चांगले वाईट चित्रपट आले. परदेशी दर्शकांना आकर्षित करण्यासाठी “स्लम डॉग मिलेनिअर” किंवा अलीकडेच नेटफ्लिक्सवर आलेला अरविंद अडिगा यांच्या पुस्तकावर बेतलेला “द व्हाइट टायगर” आहे. पण त्यात गरिबीचं चित्रण हे परदेशी लोकांना काय आवडेल अशा पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे शेवटी त्यात चमत्कार होऊन गरीब माणूस एकदम श्रीमंत होतो. त्यामुळे ते वास्तववादी वाटत नाहीत आणि कथानकही शेवटी कोसळतं. युरोपियन देशांमध्ये “पॉवर्टी पॉर्न” म्हणून अशा चित्रपटांची अवहेलनाही होते. पण “पॉवर्टी सेल्स”हे ब्रीद वाक्य घेऊन अनेक भारतीय दिग्दर्शक गरिबीवर भाष्य करणारे चित्रपट काढत राहतात. त्यांचा प्रामुख्याने भर हा चिंचोळ्या वस्त्या, गटारं, झोपडपट्ट्या, अन्नान दशा इतक्याच दृश्यांवर असतो. “स्लम डॉग मिलेनिअर” प्रदर्शित झाला त्यावेळी लहान मुलगा जमाल नाणं शोधायला गू घाणीमध्ये उडी मारतो, या दृश्याबद्दल परदेशात खूपच आश्चर्य आणि खेद व्यक्त करण्यात आला. पण इथले सफाई कर्मचारी नेहमीच गटारात उतरतात त्यांचं काय? त्यामुळे गरिबीची कल्पना ही फक्त दृश्यांपुरती मर्यादीत राहते. त्यांच्या आयुष्यातली गुंतागुंत फारच कमी वेळेला चित्रपटांतून दिसते.

परदेशी चित्रपटांमध्ये ऑस्कर मिळवणारा “पॅरासाइट” गेल्यावर्षी अॅमेझॉनवर प्रदर्शित झाला. दक्षिण कोरियातल्या एका गरीब कुटुंबाविषयी विनोदी अंगाने हा चित्रपट जातो. त्या कुटुंबातले सगळेच बेकार असल्याने खायचे पण वांदे असतात. अशावेळी चलाखीने ते एका अत्यंत श्रीमंत कुटुंबामध्ये काम मिळवतात आणि असलेल्या नोकरांना हळूहळू हुसकावून लावतात. पण शेवट शेवट खूप हिंसक होतो. चित्रपटाची मांडणी चांगली आहे मात्र परदेशी ऑस्कर स्पर्धेमध्ये याहीपेक्षा उत्तम दर्जाचे चित्रपट येतात.

shruti.sg@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)