जय पाटील
‘मी आता सर्वांना चुंबन देणार आहे. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या पुरुषांना आणि सुंदर स्त्रियांना. मी सर्वांनाच चुंबन देणार आहे…’ इति डोनाल्ड ट्रम्प! कोविड-१९ची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर फ्लोरिडात घेण्यात आलेल्या पहिल्या प्रचारसभेला उद्देशून त्यांनी हे विधान केलं.
कोविड-१९च्या संसर्गामुळे गेल्या १० दिवसांत थंडावलेला प्रचार पुन्हा सुरू करत ट्रम्प यांनी फ्लोरिडामध्ये सभा घेतली. या सभेत ते नेहमीप्रमाणेच मास्क न घालता सहभागी झाले. आपण कोविड-१९मधून बरे झालो असून, आपल्या शरीरात या आजाराविरोधात प्रतिकारशक्ती विकसित झाल्याचा दावा ट्रम्प यांनी आपल्या भाषणात केला. ‘मला शक्तिशाली झाल्यासारखं वाटतंय,’ असंही ते म्हणाले. पण ट्रम्प आता कोविडचा संसर्ग पसरवण्यास कारण ठरू शकतात की नाही आणि त्यांची अखेरची कोविड चाचणी केव्हा झाली, याविषयी व्हाइट हाऊसने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज किती दिवस कायम राहतात आणि त्याला पुन्हा होणाऱ्या संसर्गापासून किती काळ संरक्षण देऊ शकतात, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. असे असताना ट्रम्प यांनी केलेला दावा अवैज्ञानिक असल्याची टीका होत आहे.
ट्रम्प यांचे हजारो समर्थकही मास्क न घालता सभेला आले होते आणि दाटीवाटीने उभे होते. ‘टाळेबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. धोका आहे, पण तरीही आपण बाहेर पडायला हवं,’ असं आवाहन ट्रम्प यांनी समर्थकांना केलं. करोनाच्या साथीचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये अमेरिकेचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे ११ सहकारी कोविड पॉझिटिव्ह आहेत. तरीही ते त्यांच्या समर्थकांना आणि व्हाइट हाउसमधील कर्मचारी वा सहकाऱ्यांना मास्क घालण्याच्या किंवा अंतर पाळण्याच्या सूचना देत नसल्यावरून विरोधकांनी त्यांना फटकारले.
कोविडच्या संसर्गामुळे ट्रम्प प्रचारापासून दूर असण्याच्या काळाचा त्यांचे प्रतिस्पर्धी आणि डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी पुरेपूर लाभ घेतला आहे. रिपब्लिकन पार्टीचे वर्चस्व असलेल्या राज्यांत त्यांनी या काळात आक्रमक प्रचार केला. ‘मला साथीविषयी घबराट पसरवायची नाही,’ या ट्रम्प यांच्या विधानाचा त्यांनी समाचार घेतला. ‘घबराट पसरवायची नाही, असे म्हणणारे ट्रम्प स्वतःच घाबरलेले आहेत. कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासूनचे त्यांचे बेजबाबदार वर्तन दखलपात्र आहे. ते जेवढा अधिक काळ राष्ट्राध्यक्षपदी राहतील, तेवढे अधिक बेजबाबदार होत जातील,’ अशी टीका बायडेन यांनी केली आहे.