– डॉ. अभिराम दीक्षित

पुण्यातल्या अनेक वैचारिक कार्यक्रमात एक वामनमूर्ती, अतिशय गोरा आणि देखणा म्हातारा माणूस मी पाहिला होता. पांढऱ्या शर्टावर घातलेले डार्क रंगाचे सस्पेंडर्स अशी त्यांची ओळख. हे ब्रिटिश कपडे सहसा कोणी हल्ली घालत नाही. आम्ही बाळ काकांना त्यांच्या अपरोक्ष पट्टेवाला काका म्हणत असू.

Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

अरविंद बाळ उच्च विद्याविभूषित होते, मोठ्या हुद्द्यावर कामे करून, देश – जग फिरून रिटायर झाले होते. पुण्यातल्या वैचारिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती हमखास ठरलेली असे. कार्यक्रमातल्या भाषणे चर्चा झाल्या की अनौपचारिक गप्पाचे फड रंगत आणि त्यात बाळ सरांची एखादी अतिशय तीक्ष्ण कॉमेंट सगळ्या चर्चेला हादरवून टाकत असे.

मी नुकताच कॉलेजला जायला लागलो होतो तेव्हा, सुमारे पंधरा वर्षांहून अधिक पूर्वी बाळ सरांची माझी पहिली ओळख झाली. ज्ञान प्रबोधिनीत कुठलातरी कार्यक्रम होता. देवाविषयी काहीतरी चर्चा चालू होती. कोणीतरी आस्तिक बाई होत्या, त्या तावातावाने बोलत होत्या. हात झटकत बाळ सर उठले आणि त्यांनी कोणत्या तरी विधवा स्त्रीचे उदाहरण सांगितले –

“तिने देव्हाऱ्यातले देव काढून त्या ठिकाणी लॉर्ड बेटिंक या इंग्रज गव्हर्नर जर्नलचा फोटो लावला होता. देवांनाही सती प्रथा बंद करणे जमले नव्हते, ते लॉर्ड बेटिंक ला जमले म्हणून…” त्या सभेत नंतर कोणीही काहीही बोलले नाही.

कट टू, रविवारी सकाळी गप्पा मारायला आम्ही काही मित्र बाळ काकांकडे गेलो होतो. आतून पोह्याच्या बशा आल्या आणि नेमक्या त्याच वेळी आमचा हिंदू संस्कृतीचा अभिमान असा काहीसा विषय चालू होता. बाळ सरांनी हात उडवत म्हटले, “हूड! कसली डोंबलाची संस्कृती? आणि कसला अभिमान? आमच्या गावात पूर्वी दलित अमावास्येला जेवण मागायला यायचे. आम्ही ब्राम्हण लोक त्याला अन्न वाढताना, त्या जेवणाला चार बोटं एरंडेलाची लावून द्यायचो. का? दलिताला चांगले जेवण वाढणे हेसुद्धा आपल्या संस्कृतीत बसत नाही. बेसिक माणुसकी सुद्धा नसेल तर पुढचं सगळं फुकट आहे.” बाळ सरांच्या या वन लायनरनंतर खाल्लं कोणीच नाही. हातातले पोहे थंड व्हायच्या आधी संस्कृतीचा अभिमान थंड पडला होता.

सत्यरंजन साठे हे जुन्या पिढीतले टिपिकल पुरोगामी गृहस्थ. आपल्या भाषणात मुस्लिम लोकसंख्येची वाढ या विषयावर बोलत होते. अर्थात विषय कोणताही असला तरी पुरोगामी असल्याने रोख आणि टीका हिंदुत्व वाद्यावर होती. मुस्लिम लोकसंख्या वाढत नाहीये, हिंदुत्व वादी खोटा प्रचार करत आहेत असा सत्यरंजन साठेंचा आरोप होता. बाळ सर ताडकन खुर्चीत उठून उभे राहिले . त्यांनी १९५१ ते २००१ पर्यंतची मुस्लिम टक्केवारी घडाघडा म्हणून दाखवली. शेवटी पुन्हा एक वन लायनर डायलॉग –

“साठे तुम्हाला टक्केवारीचे साधे गणित समजत नसेल तर मी तुमची गणिताची शिकवणी घ्यायला तयार आहे. फुकट”, सभा सुन्न.

हिंदू समाजातली अव्यवस्था, जातीव्यवस्था, अज्ञान, अंधश्रद्धा यावर बाळ कायम कडेलोटी संतापाच्या भूमिकेत असत. मी जर राजा महाराजा असतो तर माझ्या जवळची सारी संपत्ती नरेंद्र दाभोलकरांना देऊन टाकली असती असे अरविंद बाळ म्हणायचे. त्यावेळी दाभोलकर जिवंत होते आणि त्यांचे परिचित सुद्धा होते. हिंदू समाज शक्तिहीन असण्याचं मुख्य कारण अज्ञान आणि अंधश्रद्धा आहे यावर आमचं एकमत होत. एकदा टपरीवर चहा पिताना सस्पेंडर उडवत म्हटले, “जगात दुसरं तिसरं महायुद्ध, अणुयुद्ध झालं – तर फक्त हिंदूच जगातील. विचार का?” मग आपण विचारायचं, “का?” आणि त्यानंतर येणाऱ्या एका ओळीतल्या डायलॉगची वाट पहायची. का अणुयुद्ध झालं तर फक्त हिंदूच का जगातील? अरविंद बाळांचे उत्तर, “अणुबॉम्बने झुरळं मरत नसतात.” आत चहावाल्याचे भांडे पडलेले मला अजूनही ऐकू येते आहे.

व्यक्तिपूजा आणि आदर बिदर दाखवण्याच्या भानगडीत बाळ कधी पडत नसत. किंबहुना कुण्यातरी नेत्याची भक्ती बिक्ती करणारा पांडू भेटला तर त्याची यथेच्छ हजामत केली जाई. (बिनपाण्याने.) बाळ सर हिंदुत्ववादी, पुरोगामी, मुस्लिम सत्यशोधक, दलित चळवळ या सगळ्या गटात वावरत. सर्वत्र त्यांचे मित्र होते. हजामत सुद्धा सर्वत्र केली जाई. पुरोगामी गटातले लोक पुरेसे सहिष्णू नसल्याने संघाचे उदाहरण देतो. अरविंद बाळ प्रखर राष्ट्रवादी होते, त्यामुळे संघाची मंडळी त्यांच्याकडे त्यांच्याकडे येतजात असत. गोळवलकर गुरुजींविषयी चर्चा चालू होती. गुरुजींच्या जिद्दीचे आणि व्यवस्थापन कौशल्याचे वन लायनर कौतुक करून बाळ म्हटले, “गोळवलकर चांगले गृहस्थ होते . त्यांनी पुस्तके लिहिली नसती तर अजून चांगलं झालं असत! त्यांचं विचारधन हे पुस्तक म्हणजे अर्धे अविचारधन ( एक मोठ्ठा पॉज ) आणि उरलेलं म्हणजे दुर्विचार धन.” स्वयंसेवक गार. आम्हाला म्हणायचे, “सावरकर बुद्धिवादी होते वगैरे ठीक आहे. माणसाला त्याच्या मर्यादा असतात त्यांच्या पायाशी घुटमुळू नका आदर बिदर दाखवत बसू नका – सावरकरांच्या खांद्यावर चढा आणि पुढे जा!”

विनोबा भावे स्वतः नुसतं कुराण आणि भाषांतर समोर ठेवून अरबी भाषा अख्खी शिकले होते. विनोबांच्या बुद्धिमत्तेचे बाळांना आकर्षण होते. विनोबांनी कुराण सार आणि मनू शासनम नावाची दोन पुस्तके लिहिले आहेत. त्यात विनोबांनी वाटेल ते अर्थ लावून कुराण आणि मनुस्मृतीचे या दोघांचे तुफान कौतुक केले आहे. असला भोंगळ सर्वधर्म समभाव बाळ सरांचा पार चढवत असे. एका विनोबा भक्ताची हजामत करताना बाळ म्हटले होते, “कुशाग्र बुद्धीचा संपूर्ण दुरुपयोग कसा करावा? याच विनोबा इतकं दुसरं चांगलं उदाहरण नाही.”

त्यांच्या उपमेतल्या झुरळ हिंदूंना मुस्लिम प्रश्न समजत नाही, पुरोगामी हे उत्तम हिंदू असतात कारण ते झुरळोत्तम असतात. सर्वधर्म समभाव वगैरे खुळचटपणा हे झुरळ संस्कृतीचे सर्वात महत्वाचे अंग आहे असेही ते म्हणत. हिंदू मुस्लिम संघर्षाची मुळे इस्लाम धर्मात आहेत. इतरांना काफर तुच्छ मानून सगळ्या जगाला दार उल इस्लाम बनवणे हे इस्लामचे ध्येय आहे. मुस्लिम राजकारणावरचा त्यांचा वन लायनर असा होता, “कमी संख्या असताना स्वतःला विशेष अधिकार आणि संख्या वाढली की सर्वाधिकार, पण समान अधीकार कधीच नाही – हे इस्लामी राजकारणाचे सूत्र आहे.” इतक्या कमी शब्दात मुस्लिम राजकारण समजावायला तीव्र आणि तीक्ष्ण बुद्धी लागते.

भारत-पाकिस्तान फाळणीवर डॉ आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकाचे बाळ सर जबरदस्त चाहते होते. त्यांच्या मते, “भारतात फक्त डॉ. आंबेडकरांना मुस्लिम प्रश्न कळला कारण ते मनाने हिंदू नव्हते.”

“पुरोगाम्यांना मुस्लिम प्रश्न समजत नाही कारण ते मनाने हिंदूच आहेत,” हा अजून एक वन लायनर! डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे फाळणीवरचे पुस्तक हा एक वकिली दस्तावेज आहे. त्यात निरनिराळ्या अंगांनी हिंदू मुस्लिम प्रश्नांची चर्चा केली आहे. या समस्येवरचे एक उत्तर म्हणजे संपूर्ण फाळणी असे डॉ. आंबेडकरांना वाटायचे. सर्व मुस्लिमांनी पाकिस्तानात जावे – सर्व हिंदू बौद्ध शिखांनी भारतात यावे अशा एका पर्यायाची साधक बाधक चर्चा डॉ. आंबेडकरांनी त्यात केली आहे. हिंदू मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत कारण ती दोन सशस्त्र युद्धमान राष्ट्रे आहेत असेही मत आंबेडकरांनी मांडले आहे. या पर्यायाची आम्ही कधीतरी चर्चा करत होतो. माझा मुद्दा असा की, इतके कोट्यावधी मुसलमान तिकडे पाठवायचे कसे?, किती ट्रेन?, किती बस?, जाणार कसे?, बरे प्रेमाने सांगून गेले नाहीत तर एकाला पाठवायला दोन – दोन पोलीस लागणार?, इतके कोट्यावधी पोलीस कुठून आणणार? त्यामुळे लोकसंख्येच्या आदला बदलीचा मुद्दा प्रॅक्टिकल नाहीये. यावर बाळ सरांनी एक झुरळ कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि मग एक ब्रम्हवाक्य उद्गारले- “हा प्रश्न कधी मुस्लिमाना पडला होता का? त्यांनी पाकिस्तानातल्या हिंदूच जगणं अशक्य करून टाकलं. आज आकिस्तानात किती उरलेत झुरळं? आले ना बस ट्रेन पकडून परत भारतात?”

ज्येष्ठ विचारवंत सह देशपांडे हे बाळ सरांचे जवळचे मित्र. त्यांना ‘सह’ असेच टोपणनाव होते. याल तर तुमच्या ‘सह’ नायतर शेषराव मोरे असे ते त्यांना सुनवत असत. सह , शेषराव आणि बाळ यांच्या चर्चा मी लहानपणीच ऐकल्या. माझी जी काही बौद्धिक वाढ झाली ती तिथे. स ह देशपांडे काही वर्षांपूर्वी वारले त्याआधी ते क्यान्सर ने आजारी होते. मी, प्रा संतोष शेलार आणि बाळ सर सह देशपांडेंना शेवटचं भेटायला गेलो होतो. हॉस्पिटलमध्ये सह देशपांडेंच्या नाकात नळ्या वगैरे होत्या. बाळ सर म्हटले- “कशाला ताणताय? त्या नळीतून आधी थोडी व्हिस्की सोडा!”, मगच सहना सोडा. बाळ सरांचा सगळ्यात जवळचा मित्र शेवटच्या घटका मोजत होता तेव्हा त्यांचा धीर खचला नव्हता. विनोद बुद्धीही कमी झाली नव्हती.

सरांचे वन लायनर ऐकत ऐकत लहानाचा मोठा झालो. एकदा पुण्यात सरांचा सत्कार केला होता. सत्कार बित्कार असल्या भानगडी ते करत नसत. पण त्यांचं माझयावर व्यक्तिगत प्रेम होत म्हणून ते आले. सत्काराला उत्तर देताना म्हटले, “अभिराम तुझ्या मित्रमंडळींकडून खूप अपेक्षा आहेत. तुम्ही लोकं खूप काहीतरी उलथापालथ कराल भारताच्या वैचारिक विश्वात.”तसलं काही आमच्याने झालं नाही. मी चळवळ न करता, करिअर केलं आणि आता फेसबुकवर वन लायनर खरडतो. सरांची अपेक्षा बहुदा फेल गेली माझ्याबाबतीत. सर आता खूप म्हातारे झाले होते – बऱ्याच वर्षात भेट नाही. ते पुण्यात मी उत्तर अमेरिकेत. बरेच दिवस बाळ सर खूप आजारी होते ते मला माहीत होतं. त्यांच्या बायकोचे निधन झाल्यापासून मनाने खूप खचले होते. त्यांनी मला दोघा तिघांकडून निरोप पाठवले. फोन कर म्हणून. पण या कोव्हिडच्या भानगडीत फोन करणं जमलं नाही. परत भारत अमेरिकेच्या वेळा जुळत नाहीत. फोन करणं जमलं नाही. काल बाळ सर वारले. मरण्यापूर्वी त्यांच्याशी एक वाक्य सुद्धा बोलता आलं नाही. शेवटचा वन लायनर ऐकायचं राहून गेलं. हे दुःख आता आयुष्यभर राहील. आत्मा, जन्म पुनर्जन्म काहीच न मानणाऱ्या या बुद्धिवादी माणसाला श्रद्धांजली तरी कशी वाहू? एक वन लायनर वाहतो –

“स्वर्ग नर्क नाहीये ते बरंय. नाहीतर इंद्र आणि यम तुमच्या तावडीतून सुटले नसते. इंद्र व्हिस्की मारत बुद्धिवाद करत बसला असता आणि यम कुठलेतरी सस्पेंडर घालून भाषणाला गेला असता. पिंका टाकायला.”

अरविंद बाळ मृत्युलेख : २८ ऑक्टोबर २०२०

(लेखक डॉ. अभिराम दीक्षित यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार. मूळ पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )