-श्रुति गणपत्ये

गेली दीड वर्ष सातत्याने होत असलेल्या टाळेबंदीमुळे किमान मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय घरांमध्ये मनोरंजनासाठी टीव्ही आणि ओटीटीचा (ओव्हर द टॉप) वापर प्रचंड वाढला आहे. विशेषतः ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचे असंख्य कार्यक्रम उपलब्ध झाल्याने ग्राहक खूष आहेत. अनेकांनी टिव्हीवरच्या सास-बहू मालिकांपेक्षा ओटीटीला पसंती दिली आहे. तिथे असलेल्या मालिका आणि चित्रपटांचं वैविध्य लोकांना खूप आवडतं. आता आपली करमणूक आपल्या हातात आहे, त्यासाठी चॅनेल दाखवतील ते आणि ठराविकच वेळ हे गणित साफ मोडीत निघालं आहे. पण जरा थांबा! हे मनोरंजन नक्की तुमच्या पसंतीचं आहे का?

पारंपरिक टिव्ही कार्यक्रम हे ठराविक वेळेसाठी, अनेक वर्ष सुरू असणारे, जाहिरातींची भडिमार करणारे असे आहेत. कोणता कार्यक्रम कोणत्या वेळेत बघायचा हे आपल्या हाती नाही. त्याच्या पुनर्प्रक्षेपणाची वेळ पण ठरलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा सहभाग हा फक्त कार्यक्रम बघण्यापुरता मर्यादीत राहतो. पण ओटटी प्लॅटफॉर्मनी जगभरात क्रांती घडवून आणली. मनोरंजाची आवड-निवड, वेळ त्यांनी प्रेक्षकांवर सोडली. आपल्या वेळेनुसार, हवं तेव्हा आणि हवं तेवढं मनोरंजन आता प्रेक्षकांना पाहता येतं. त्यासाठी रोज अर्धा तास वाट बघायती गरज नाही. एखादी मालिका बिंज वॉचिंग करत अर्ध्या दिवसांतही संपवली जाऊ शकते. त्यामुळेच ओटीटी मनोरंजनाकडे वळणाऱ्या प्रेक्षकांची संख्या जास्त आहे. मात्र भारतासारख्या देशात मनोरंजन हे कुटुंबाने एकत्र येऊन बघितलं जातं. ते मात्र ओटीटीने मोडीत काढलं आहे. स्वतंत्र मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी ओटीटी आहेत. अनेक मालिका, चित्रपट, त्यातील दृश्य ही कुटुंबासोबत बघता येणार नाहीत. त्यामुळेच ओटीटी मोबाइलवरही उपलब्ध झालं आहे.

पण केवळ एवढ्याच कारणांसाठी ओटीटी लोकप्रिय नाही. ते ग्राहकांच्या पसंती-नापसंतीचा पद्धतशीर अभ्यास करतात. त्याबद्दल सगळी माहिती गोळा करतात आणि त्या माध्यमातून प्रेक्षकांना आवडतील असे कार्यक्रम सूचवत राहतात. त्यामुळे एकाच टिव्हीवर जरी तुम्ही नेटफ्लिक्स बघत असाल तरी दोन माणसांना वेगळे कार्यक्रम सुचवले जातात. आपल्याला पुन्हा पुन्हा नेटफ्लिक्सवरचे कार्यक्रम बघावेसे वाटतात कारण तशी योजना कंपनी करते. रिमोट आपल्या हातात असलं तरी त्याचा कंट्रोल कंपनीच्या हातात राहतो.

त्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर केला जातों. नेटफ्लिक्सकडून या तंत्रज्ञानाचा वापर सर्वात जास्त होतो. त्यामुळेच नेटफ्लिक्सवर प्रत्येक प्रेक्षकाला त्याच्या लॉगिनमध्ये त्याच्या आवडीचेच कार्यक्रम बघायला मिळतात. एखाद्याला गुन्हेगारी विषयावरील चित्रपट किंवा मालिका आवडत असतील तर तशाच मालिका नेटफ्लिक्स सुचवत राहतं. कोणी साय-फाय सिरिज पाहत असेल तर त्या जास्त सुचवल्या जातात. नेटफ्लिक्सवर तुम्ही शोधत असलेले चित्रपट, विषय, एखाद्या अभिनेता, तुम्ही थम्स अप करून देत असलेले लाइक्स किंवा डिस्लाइक, आधी काय बधितलं याचा इतिहास अशी सगळी माहिती रोज साठवली जाते. जगभरातल्या करोडो ग्राहकांची अशी माहिती त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्या माहितीचं सातत्याने वर्गीकरण होतं राहतं आणि त्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर होतो. कारण करोडो लोकांची माहिती वेगवेगळ्या पद्धतीने तपासणं, त्याचं वर्गीकरण हे तंत्रज्ञानाशिवाय शक्य नाही. आर्टिफिशल इंटेलिन्सचा वापर करायला त्यांच्याकडे डेटा शास्त्रज्ञ आहेत. ते वेगवेगळे अल्गोरिदम बनवून त्यानुसार प्रत्येक ग्राहकाला वेगवेगळे कार्यक्रम सुचवतात. आपल्या आवडीप्रमाणे कार्यक्रम येत राहिले की प्रेक्षक अर्थातच जास्त वेळ नेटफ्लिक्स बघण्यात घालवतात, पुढच्या महिन्याचे पैसे भरतात आणि इतर प्लॅटफॉर्मवर जात नाहीत.

आता या आर्टिफिशल इंटेलिन्सचा फायदा लक्षात आल्यावर त्याचा वापर आणखी कुठे कुठे करता येईल याचाही कंपनीने विचार केला आहे. आता त्याचा वापर कार्यक्रमाचं चित्रीकरण करण्यापूर्वीही नेटफ्लिक्सकडून केला जातो. एखादी मालिका कुठे चित्रित करायची, कोणत्या आणि कशा जागा लोकांना आवडतात याचीही इत्थंभूत माहिती या प्लॅटफॉर्मकडे आहे. नवीन चित्रपट किंवा मालिका बनवताना एवढ्या बारकाईने प्रेक्षकांच्या पसंतीचा विचार होतो.

त्यानंतर गुणवत्ता राखण्यासाठीही हेच तंत्रज्ञान वापरलं जातं. एखाद्या भागामध्ये इंटरनेटची जोडणी कमकुवत असेल, त्याला जास्त स्पीड नसेल तरी नेटफ्लिक्सला कळतं. त्यामुळे जास्त बँडविथ लागणारे कार्यक्रम नेटफ्लिक्स त्या भागामध्ये दाखवत नाही. कारण प्रक्षेपण मध्येच थांबलं तर प्रेक्षक अर्थातच दुसऱ्या प्लॅटफॉर्मकडे वळणार. त्यामुळे ते त्या स्पीडवर पाहता येतील, असेच कार्यक्रम सूचवत राहतात. प्रत्येक ग्राहकाला गुणवत्तापूर्ण सुविधा मिळाली पाहिजे, अशी त्यामागे भावना आहे.

एखादा नवीन कार्यक्रम प्रदर्शित झाला की, किती प्रेक्षक किती वेळपर्यंत तो पाहतात, ते परत तो कार्यक्रम बघतात का, मध्येच सोडून देतात की पूर्ण करतात या सगळ्या गोष्टींचा हिशेब पहिल्या २८ दिवसांमध्ये ठेवला जातो. त्यामुळे नवीन कार्यक्रमाचे हक्क विकत घेताना या सगळ्या डेटाचा विचार केला जातो.

आर्टिफिशल इंटेलिजन्सचा हुशारीने वापर करून आपला नफा वाढवणाऱ्या कंपन्यांपैकी नेटफ्लिक्स एक आहे. पण जसा या माहितीचा योग्य वापर होऊ शकतो तसा गैरवापरही होऊ शकतो. एखाद्याच्या आवडी-निवडी, वेळा कंपनीला मिळू शकतात तर समाज कंटकांनाही ती माहिती मिळू शकते. डेटा लिकच्या अनेक विवादास्पद घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेमध्ये डेटा ट्रान्सपरन्सी नावाची चळवळ चालवली जाते. आपल्या माहितीचा वापर कसा केला जातो, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे आणि त्यावर बंधनं हवीत. अर्थाच त्याला यश येण्यासाठी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे.

shruti.sg@gmail.com