News Flash

स्थानिक वि. उपरे : एक अटळ संस्कृती संघर्ष

६७ राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांची बरीच चर्चा झाली आणि...

संग्रहीत

– श्रुति गणपत्ये

या आठवड्यामध्ये जाहीर झालेल्या ६७ राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांची बरीच चर्चा झाली आणि त्यांनी विविध पुरस्कारांवर आपला ठसा उमटवला. “आनंदी गोपाळ”, “ताज महाल”, “बार्डो”, लधुपट “खिसा”, “जक्कल” या चित्रपटांना पुरस्कार जाहीर झाले. उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार धनुष आणि मनोज वाजपेयी यांना तर अभिनेत्री कंगना रनौत हिला जाहीर झाला.

“आनंदी गोपाळ”ची कथा मराठी प्रेक्षकांसाठी नवीन नाही. पण बदलत्या काळाबरोबर चांगल्या दृक माध्यमातून ती लोकांसमोर मांडणं हीच चित्रपटाची खासियत आहे. सध्या झी फाइव्हवर हा चित्रपट प्रेक्षक बघू शकतात. “खिसा” या लघुपटाचा मुद्दाम उल्लेख करावा लागेल कारण अवघ्या १५ मिनिटांमध्ये धार्मिक द्वेष लहान मुलांचा निरागसपणा कसा संपवू शकतो याचं रोजच्या जीवनातलं उत्तम चित्रिकरण केलं आहे.

मला विशेष उल्लेख करायचाय तो मनोज वायपेयी यांना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला त्या “भोंसले” चित्रपटाबद्दल. कारण चित्रपट हिंदी असला तरी याचा विषय हा मुंबईमध्ये कायम खदखदत असलेल्या मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा आहे. वादग्रस्त विषय असूनही या चित्रपटाची फारशी चर्चा झाली नव्हती. एका चाळीत राहणारा कष्टकरी मराठी निम्न मध्यमवर्ग आणि त्याच आर्थिक स्थितीतून आलेला उत्तर भारतीय समाज यांच्यातला संघर्ष यावर चित्रपट उत्तम भाष्य करतो. बॉलिवूडच्या पठडीत न बसणारा, धीम्या गतीने जाणारा आणि रोजच्या आयुष्यातील निरर्थकता टिपणाऱ्या या चित्रपटात मनोज वाजपेयीने एकट्या राहणाऱ्या एका निवृत्त पोलीस हवालदाराचं उत्कृष्ट काम केलं आहे. मुंबईमध्ये मूळच्या असणाऱ्या मराठी समाजाच्या मनात बाहेरून आलेल्या उत्तर भारतीय लोकांविषयी आकस आहे. काही राजकीय पक्ष त्या आकसामध्ये भर घालतात आणि आपली पोळी भाजून घेतात. मुंबईतल्या एका पडक्या चाळीमध्ये बहुतांशी मराठी कुटुंब राहतात आणि टॅक्सी चालवणारी एक-दोन उत्तर भारतीयही. तिथेच दादागिरी करणारा मराठी मुलांचा एक भाई असतो जो सातत्याने या उत्तर भारतीयांना त्रास देण्याचं काम करतो. त्याच्या मते, या लोकांनी म्हणजे भैय्याने इथे येऊन मराठी लोकांचे रोजगार घेतले. त्याला साथ असते ती स्थानिक राजकारण्याची. दोन समाजांमध्ये उडणारे खटके आणि या भाईची दादागिरी मनोज वाजपेयी रोज पाहत असतो पण त्यापासून अलिप्त राहतो. एकदा एक उत्तर भारतीय भाऊ-बहीण चाळीत रहायला येतात. बहीण ही नर्स असते आणि मराठी भाई त्या नवीन आलेल्या भावावर दादागिरी करू पाहतो. कोणाशीच न बोलणारा, एकदम वेगळा राहणारा, जेवण बनवण्यापासून आपली कामं आपणच करणारा मनोज वाजपेयी आजारी पडतो तेव्हा ही शेजारीण नर्स आणि तिचा भाऊ त्याला मदत करतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये नकळत एक भावनिक नातं तयार होतं. त्यातूनच पुढे मराठी मनोज वाजपेयी नर्सच्या भावाला मराठी भाईपासून वाचवतो आणि वाद ओढवून घेतो. पुढे एक अनपेक्षित घटना घडते आणि मनोज वाजपेयीला टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडते. चित्रपटामध्ये गणपती उत्सव, चाळीतला फलक लिहिण्यावरून होणारी भांडणं, आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्याची स्पर्धा, अशा अनेक बारीक तपशील चित्रपटामध्ये आहेत त्याबद्दल दिग्दर्शक देवाशिष माखिजाचं कौतुक नक्कीच करायला हवं.

या चित्रपटाची प्रेरणा ही नेटफ्लिक्सवर असलेल्या क्लिंट इस्टवूडचा “ग्रॅन टोरिनो”वरून घेतलेली असू शकते. ग्रॅन टोरिनोमध्ये क्लिंट इस्टवूडनी एका अमेरिकन वर्णद्वेषी, देशभक्ताचं पात्र रंगवलं आहे. त्याने अमेरिकन सैनिक म्हणून व्हिएतनामच्या युद्धामध्ये भागही घेतलेला असतो आणि १३ जणांना मारलेलं असतं. त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वातून तो एक वर्णद्वेष्टा, उद्धटपणा, कर्मठ विचारांचा आणि आपल्या मुलांनाही आपल्यापासून दूरच ठेवून बायको मेल्यावर एकटाच आयुष्य जगणारा असा माणूस इस्टवूड यांनी अप्रतिम रंगवला आहे. त्याच्या शेजारीच रहायला आलेल्या माँग (Hmong) समुदायाच्या लोकांचा त्याला उपद्रव वाटायला लागतो. तो अत्यंत तुच्छपणे त्यांच्याकडे पाहून त्यांना “गूक्स”, “चिंक्स” अशा उपहासात्मक नावाने टीका करतो. माँग हे मूळात व्हिएतनाममधून आलेले शरणार्थी असतात. व्हिएतनामच्या युद्धात हा समुदाय अमेरिकेच्या बाजूने लढतो. त्यामुळे युद्ध संपल्यावर तिथल्या नवीन सरकारकडून त्यांना मारलं जातं, तुरुंगात डांबलं जातं. त्यातून सुटून काही जण अमेरिका आणि जगाच्या इतर भागामध्ये शरणार्थी म्हणून जातात. इथेही एक भाऊ-बहीण दाखवले आहेत ज्यांचा क्लिंट इस्टवूडशी संबंध येतो आणि त्या समुदायाविषयी असलेल्या द्वेषाचं रुपांतर मैत्रीच्या नात्यात होतं. हे नातं इतकं घट्ट होतं की, या माँग कुटुंबियांना वाचवण्यासाठी क्लिंट इस्टवूड टोकाची भूमिका घेतो.

अन्न, रोजगार आणि स्थिर आयुष्याच्या शोधामध्ये जगभरातले लोक दुसऱ्या देशात, प्रांतात, गावात, शहरात स्थलांतरित होतात. माणसाच्या उत्क्रांतीपासून हे सुरू आहे. पण आधीच स्थायिक झालेल्या स्थानिकांना ते लोंढे नकोसे वाटतात. त्यांना आपल्या संस्कृतीवर ते आक्रमण वाटतं आणि आपल्या उपलब्ध साधनांवर हा अतिरिक्त ताण वाटतो. जर्मनी आणि काही स्कँडिनेव्हेयन देशांसारखा अपवाद वगळता अशा निर्वासित किंवा स्थलांतरीतांचं स्वागत नक्कीच होत नाही. तरीही ते लोंढे थांबत नाहीत. दोन संस्कृतींचा हा संघर्ष अनेक वर्ष सुरू राहतो पण त्याचवेळी नकळत त्यांची सरमिसळही होऊ लागते कारण ती थांबवणं अशक्य असतं. ती स्वीकारूनच समाजाचा विकास होतो आणि नवीन संस्कृती जन्माला येते. हे मानवी इतिहासाचं सत्यं आहे. हेच या दोन चित्रपटांतून उत्तम साकारलं आहे.

shruti.sg@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 7:30 pm

Web Title: outsider vs locals an unavoidable culture conflict msr 87
Next Stories
1 Blog: एक असतो माकड पळवणारा…
2 बॉम्बे बेगम: मनोरंजनाच्या हक्काला सेन्सॉरची कात्री
3 शेतकऱ्यांच्या व्यथा आणि ‘ओटीटी’वरच्या कथा
Just Now!
X