– जय पाटील

विविध मॅट्रिमोनियल वेबसाइट्सवर किंवा समाजमाध्यमांवर वधू-वरांचा शोध घेणं आता नित्याचंच झालं आहे. पण केरळमधील एका कुटुंबाने एक अगदी वेगळा प्रस्ताव ठेवला. त्यांनी आपल्या उपवर श्वानाचं पारंपरिक मल्याळी वेशभूषेतलं छायाचित्र समाजमाध्यमांवर पोस्ट केलं आणि नेटकऱ्यांनी त्याला मजेदार प्रतिक्रियांतून प्रतिसाद दिला.

या छायाचित्रातला गोंडस पग ‘कसावू मंडू’ या पारंपरिक मल्याळी वेशभूषेत आहे. गुलाबी रंगाचं शर्ट आणि जरी काठाची लुंगी असा हा पोषाख आहे. एका चित्रात तो या वेशभूषेत दोन पाय वर करून उभा असल्याचं दिसत आहे, तर दुसऱ्या छायाचित्रात त्याच्यासमोर केळीच्या पानावर पारंपरिक मल्याळी पदार्थ ठेवण्यात आले आहेत. ‘आमच्या या रुबाबदार मल्याळी मुलाशी कोणी आपल्या सुंदर मुलीचं लग्न लावण्यास उत्सुक आहे का?’ असा प्रश्नही पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने विचारला आहे. सध्या हा फोटो ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काहींनी तो मायक्रोब्लॉगिंग साइट्सवरही शेअर केला आहे. विविध समाजमाध्यमांवर आणि मिम्स पेजेसवरही तो व्हायरल होत आहे.


कोणी ‘खरं सांगायचं तर मी फक्त इंडियन डॉग पेरेन्ट ग्रुपसाठीच फेसबुकवर आहे. हा ग्रुप कधीच निराश करत नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर कोणी गँग्ज ऑफ वासेपूरमधलं पंकज त्रिपाठीचं छायाचित्र आणि त्यावर ‘हम करते हैं प्रबंध, आप चिंता मत करिये,’ असा डायलॉग लिहिला आहे. एका श्वानाच्या मालकिणीने ‘आमची मुलगी बघा, ही काश्मीरची आहे,’ अशी पोस्ट आणि त्यासोबत आपल्या पगचा फोटो पोस्ट केला आहे. कोणी ‘हा कुत्रा आमच्या कॉलेजमधल्या बहुतेक मुलांपेक्षा अधिक सुंदर आहे. तेव्हा कॉलेजमध्ये केवळ बेल बॉटम आणि भरतकाम केलेले प्रिंटेड शर्ट दिसायचे,’ अशी आठवण पोस्ट केली आहे.

थोडक्यात या कुत्र्याच्या छायाचित्राने अनेकांचं मनोरंजन केलं आहे. यानिमित्ताने कुत्रे आणि अन्य पाळीव प्राण्यांसाठीही जोडीदार मिळवण्याची ऑनलाइन सोय होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.