X
X

BLOG : राज-उद्धव एकत्र येतील? ‘हे’ वाद मिटतील?

READ IN APP

पुन्हा एकदा जुन्या वावड्या उठू लागल्या "उद्धव आणि राज ठाकरे यांचे मनोमिलन होईल का?".

धवल कुलकर्णी

महाराष्ट्राच्या राजकारणात काही काळानंतर नेहमीच काही ठरलेले पतंग उडवण्यात येतात. कुठलाही उचित प्रसंग आल्यानंतर एरव्ही माळ्यावर ठेवलेले हे पतंग खाली काढून, त्यावरची धूळ झटकून, मांजा घट्ट बांधून, पुन्हा आकाशात उंच उडवले जातात…

अशा काही पतंगांचे नमुने म्हणजे, शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परततील का? किंवा, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील का?…

दुसरा पतंग पुन्हा जोमाने उडवण्याचे कारण असे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी त्यांचे दुरावलेले चुलत व मावस बंधु आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे जातीने हजर होते. त्यामुळे संक्रांतीशिवायदेखील पतंगबाजी करणाऱ्यांना भलताच जोम आला आणि पुन्हा एकदा त्यात जुन्या वावड्या उठू लागल्या “उद्धव आणि राज ठाकरे यांचे मनोमिलन होईल का?”.

पण, हा पतंग आकाशातच कापण्याचे काम करूया वस्तुस्थितीच्या पतंगाने. हा पतंग असा तसा नाहीये… याच्या मांजाला सत्य आणि इतिहासाच्या काचांचे धारधार तुकडे लावलेत…

2005 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि त्याच्याच पुढच्या वर्षी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. या घटनांना पार्श्वभूमी होती ती कुठेतरी सेनेचे नेतृत्व कोणी करावे या विषयावरून चाललेल्या धुस्फुशीची.

1988 मध्ये राज ठाकरे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष झाले. साधारणपणे त्याच काळात म्हणजेच 1990 मध्ये उद्धव ठाकरेंनी सुद्धा राजकारणामध्ये औपचारीक प्रवेश केला. आपले काका बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत लाडके असलेले राज हे यांच्यासोबत बऱ्याचदा राजकीय सभा संमेलन व दौऱ्यांना जात. स्वभावाने काहीशी बुजरे व व एकलकोंडे असलेले उद्धव हे सुद्धा राजकारणात सक्रिय होते पण अर्थातच पडद्यामागून. 1985 मध्ये शिवसेनेचा भगवा मुंबई महानगरपालिकेवर जोमाने फडकला. त्यावेळेला शिवसेनेच्या प्रचारामध्ये उद्धव ठाकरे यांनी मोलाची भूमिका बजावली होती. 1995 ला शिवसेना-भाजप युती सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले. त्यावेळेला राज व उद्धव दोघांनीही प्रचार केला होता. महाराष्ट्रातील तरुण राजच्या प्रतिमांमध्ये कुठेतरी बाळासाहेबांना शोधत होते…

1996 मध्ये रमेश किणींच्या मृत्यूच्या प्रकरणात राज ठाकरे अडचणीत आले. कालांतराने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना क्लीनचिट दिली असली तरी शिवसेनेच्या राजकारणात राज मागे फेकले गेले ते कायमचेच… अर्थात त्याच्या आधीपासूनच राज आणि शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांना मध्ये धुसफुस सुरू असल्याचे सांगितले जाते. या नेत्यांनी कुठेतरी उद्धव यांना पुढे केले असावे. दोघा भावांमधला वाद आणि राजकीय दुरावा हा या ना त्या कारणाने 1990 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळापासून सुरू झाला व नंतर वाढतच गेला. राजाची शिवसेनेच्या राजकारणामध्ये जशी कोंडी होत होती तशीच उद्धव यांची वाढ त्याच गतीने होताना दिसली.

युतीची सत्ता आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई व नंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव बिंदुमाधव उर्फ बिंदा यांचे अचानक निधन झाले. दुसरा मुलगा जयदेव त्याच दरम्यान बाळासाहेबांपासून दुरावला. त्यामुळे असेल कदाचित पण साहेबांचे उद्धव व त्यांच्या कुटुंबीयांवर असलेले इमोशनल अवलंबित्व वाढले…

2008 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले उत्तर भारतीय विरोधी आंदोलन सुरू केल्यानंतर शिवसेनेची अवस्था विचित्र झाली. 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये शिवसेना हिंदुत्वाकडे झुकली होती. अर्थात त्याला कारणही तसेच होते. शहा बानुच्या खटल्यानंतर भारतात मुस्लिम जमातवाद्यांनी वर काढलेले डोकं, त्यानंतर राम मंदिराचा प्रश्न या सगळ्यामुळे धार्मिक भावना महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात वाढीला लागली होती. पण हिंदुत्वाचा एक अर्थ असा होतो ही मुंबईसारख्या बहुभाषिक शहरांमध्ये जिथे मराठी माणूस बहुसंख्यांक नसला तरीसुद्धा सगळ्यात मोठी मायनॉरिटी आहे. तिथे इतर भाषिकांच्या अरेरावी किंवा सांस्कृतिक दादागिरीकडे दुर्लक्ष करणे… त्यात पुन्हा भर पडली ती गिरण्या व इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या जागांवर उभ्या राहिलेल्या गृहनिर्माण प्रकल्पामुळे. यांच्या आसपास राहणाऱ्या मराठी माणसाला या प्रकल्पांमध्ये घर घेणे परवडणारे जरी नसले तरीसुद्धा फक्त शाकाहारींसाठी उभ्या राहिलेल्या इमारती पाहून कुठेतरी त्याच्या मुठी रागाने आपसूक आवळल्या जात होत्या. गिरण्या व इतर कारखाने बंद झाल्यानंतर असंघटित क्षेत्रामध्ये वाढ झाली. या असंघटित अर्थव्यवस्थेमध्ये मराठी माणसाचा संघर्ष होता तो उत्तर भारतीय भय्या सोबत. मनसेने नेमकी हीच भावना पकडली आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये घवघवीत मतं मिळवली आणि त्याच वर्षी झालेल्या विधानसभेत तर चक्क 13 आमदार निवडून आणले.

त्यानंतर 2010 मध्ये ज्येष्ठ शिवसैनिक व बाळासाहेबांचे कडवे निष्ठावंत असलेल्या सतीश वळंजू व त्यांच्या मित्रांनी “माझी चळवळ” नावाचे जनआंदोलन उभारले. या आंदोलनाचा हेतू सरळ होता. तो म्हणजे राज-उद्धव या दोघा भावांना एकत्र आणण्याचा. त्यामागचं लॉजिक असं, की शिवसेना आणि मनसे यांचा उभा दावा असल्यामुळे मराठी माणसाची संघटित असलेली राजकीय शक्ती विभागली जात होती व त्याचा फायदा होता तत्कालीन सत्ताधारी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला. या आंदोलनाला स्वतः शिवसेनाप्रमुखांचा पाठिंबा होता! पण हे आंदोलन आपले निश्चित ध्येय गाठू शकले नाही. त्याच वेळेला दोघा ठाकरे बंधूंचे एकत्रीकरण हा विषय मात्र वरळी भागात शिवसेनेच्या वाडीमध्ये एका पायी काची भूमिका बजावणारे वळंजू व त्यांच्या मित्रांनी चर्चेत आणला हे मात्र खरे.

राज व उद्धवच्या एकत्रीकरणाचा पतंग फार जोमाने उडवण्यात आला होता तो 2012 मध्ये. लीलावती रुग्णालयात ऍन्जिओग्राफीसाठी गेलेल्या “दादूला” सोबत म्हणून “राजा” गेला आणि दोघे भाऊ एकत्र येतील का याच्या वावड्या पुन्हा उडाल्या. पण ते झाले नाही हे वेगळे सांगायला नको. 2014 च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत असलेली आपली 25 वर्ष जुनी युती अचानक तोडली तेव्हा मात्र उद्धवने राजला आघाडीसाठी साद घातली. पण पण शेवटी काही गोष्टी पुढे सरकल्या नाहीत. याचीच पुनरावृत्ती झाली 2017 च्या मुंबई महापालिकांच्या निवडणुकांच्या तोंडावर. खाजगीत बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते असा आरोप करतात की मनसेने भारतीय जनता पक्षासोबत काही ॲडजस्टमेंट करू नयेत यासाठी शिवसेनेने त्यांच्यासमोर ठेवलेले हे गाजर होते…

राज ठाकरे उद्धव च्या शपथविधीसाठी गेले हे सत्य असलं तरीसुद्धा इथ एक लक्षणीय गोष्ट अशी की त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचा कुठलाही नेता नव्हता. राज सोबत फक्त त्यांच्या आई कुंदाताई, मुलगा अमित, बहिण जयवंती व मेहुणे अभय देशपांडे एवढेच लोक होते. म्हणजे हा निर्णय वैयक्तिक स्वरूपाचा होता राजकीय नव्हे!

2012 मध्ये ज्या वेळेला राज-उद्धव च्या मदतीसाठी धावून गेले होते, त्यावेळेला या दोघा भावांना जवळून ओळखणाऱ्या एकाच शिवसेनेच्या नेत्याने प्रस्तुत लेखकाला असे खासगीत सांगितले होते की, राजकीय मतभेद हे मिटू शकतात. पण जिथे वैयक्तिक कटू त्यामुळे मनभेद निर्माण होतात तिथे मात्र एकत्रीकरण खूप मुश्कील असतो. राज व उद्धव यांच्यातील वाद हा नेतृत्व कुणाचं असावं या विषयावरून आहे. तो प्रश्न अजूनही दोघांकडून सुटलेला नाही. राज किंवा उद्धव एकमेकांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार होतील का? मनसे व शिवसेना या दोघांचे समजावी करण झाले तरी एकमेकांना समांतर उभ्या असलेल्या पक्ष संघटनांचे व पदाधिकाऱ्यांचा नेमकं करायचं काय? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहतात.

एकेकाळी राजकारणात जोरदार मुसंडी मारणाऱ्या मनसेची अवस्था आज तितकीशी चांगली नाही. विधिमंडळामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून सुद्धा शिवसेनेचा आज स्वतःचा मुख्यमंत्री आहे. तर मनसेकडे फक्त एकच आमदार आहे. अर्थात राज यांच्याकडे जबरदस्त क्राउड पोलिंग अॅबिलिटी आणि करिष्मा आहे. असा करिश्मा असलेला कुठलाही नेता संधीच सोनं करू शकतो हे वेगळं सांगायला नकोच…

23
X