एखाद्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा करावी आणि आपलं मन हळवं व्हावं असं फार कमी वेळा घडलं आहे. काहीवर्षांपूर्वी सचिनने निवृत्ती घेतली होती, तेव्हा काही काळासाठी आता कशासाठी क्रिकेट बघायचं असा विचार मनात येऊन गेला होता. (अर्थातच तो क्षणिक होता) यानंतर गौतम गंभीरचा निवृत्तीचा निर्णय आपल्या सगळ्यांना थोडासा चटका लावून गेला. मात्र अनुप कुमारची कबड्डीमधून निवृत्ती ही या सर्व समीकरणांना छेद देणारी ठरते. प्रो-कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून गेली ६ वर्ष भारतीय क्रीडा रसिकांना आपल्या मातीतल्या खेळाकडे वळवण्यात यशस्वी ठरलेल्या अनुपने काल आपली निवृत्ती जाहीर केली. उगाच कोणाशी तुलना करायची म्हणून नाही, पण स्वानुभवावरुन सांगतो…..ज्यावेळी सचिन निवृत्त झाला त्यावेळच्या सर्व भावनाही आजही मनात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनुप गेली १५ वर्ष कबड्डी खेळतोय. मग त्यातली गेली ६ वर्ष तो आपल्याला ओळखीचा का वाटतो?? ९ वर्ष त्याने केलेल्या कामचा आढावा आपण कधीच का घेतला नसेल. असो, वादाच्या मुद्द्यात शिरत नाही, पण क्रिकेटवेड्या भारतीय प्रेक्षकांचा अनुपने आणि प्रो-कबड्डीने एक हक्काचा पर्याय दिला. इतकी वर्ष जो खेळ भारतीय खेळाडू मातीवर खेळत होते, तोच खेळ मॅटवर खेळताना पाहून पहिल्यांदा भारी वाटलं होतं. मैदानावरचे ५-१० कॅमेरे, मीडिया कव्हरेज, ८ वेगवेगळे संघ, परदेशी खेळाडूंचा सहभाग आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य घरातून आलेली मुलं आपल्या खेळाच्या जोरावर मैदान गाजवताना पाहणं हे चित्र किती सुख देणारं असतं, याची कल्पना क्वचितच काही लोकांना येईल. हे सर्व चित्र निर्माण करण्यामध्ये अनुप यशस्वी ठरला आहे.

भारतीय प्रेक्षक हा खेळाचे सामने फारसे चवीने पाहत नाही. क्रिकेट हा त्यांचा धर्म, सचिन तेंडुलकर हा त्यांचा देव. आजही या देशात, सचिन गेल्यानंतर आम्ही क्रिकेट बघतच नाही असं म्हणणारे अनेक लोकं तुम्हाला सापडतील. याचा अर्थ सचिननंतर कोणी ग्रेट खेळाडू होणारच नाही असा आहे का?? तर नाही, पण सचिन ज्या पद्धतीने मैदानात वावरायचा, त्याच्या खेळण्यातली जी नजाकत होती ती पाहण्यासाठी प्रेक्षक टीव्ही सेटला चिकटून बसायचे. २०१३ साली प्रो-कबड्डीच्या पहिल्या हंगामापासून अनुपने घरातल्या समस्त आईवर्गाला सिरीअल सोडून कबड्डीकडे वळवलं.

अवश्य वाचा – ‘कॅप्टन कूल’ अनुप कुमारचा कबड्डीला रामराम

हा अनुप चांगला खेळाडू दिसतो बघ, शांत राहून सगळ्या संघाला सांभाळून खेळतोय. काही वर्षांपूर्वी आईच्या तोंडातून सिरीअल आणि क्रिकेट सोडून कोणत्यातरी दुसऱ्या खेळाबद्दल आणि खेळाडूबद्दल मी हे वाक्य ऐकलं होतं. यू मुम्बा या संघाकडून अनुप ५ वर्ष खेळला. यातली पहिली ३ वर्ष अनुपने आपल्या संघाला अंतिम फेरी गाठून दिली. यामध्ये दुसऱ्या पर्वाचं विजेतेपदही समाविष्ट आहे बरं का!! शांत स्वभाव, संघातल्या प्रत्येक खेळाडूवर असलेली बारीक नजर, खेळाडूंना सुचना देणं, चुक झाली की त्यांच्यावर दातओठ न खाता, क्यू कर रहा है ऐसा?? असं म्हणत त्यांना समजूत घालणं…हे अनुपचे सर्व गुण क्रीडा रसिकांनी अनुभवले आहेत. चढाईदरम्यान अनुप एखाद्या शांत चित्त्याप्रमाणे प्रवेश करायचा, बचावपटूला एका ठिकाणी गुंतवून ठेवत नकळत अनुपचा एक पाय समोरच्या खेळाडूच्या पायावर पडायचा…और ये अनुप कुमार का टो टच !! टिव्हीवर समालोचन करणारे सुनिल तनेजा आणि संजय बॅनर्जी मग पुढची काही मिनीटं त्याच्या खेळाचं रसभरीत वर्णन करायचे. यापुढे हे सगळं वर्णन कबड्डी प्रेमी ऐकू शकणार नाहीत.

एखादा निर्णय आपल्या विरोधात गेलाय म्हणून अनुप मैदानात भडकलाय असं फार कमी वेळा पहायला मिळालंय. हो, मात्र प्रत्येक चुकीच्या निर्णयावेळी अनुपने आपली नाराजी उघडपणे मैदानात व्यक्त केली आहे. चौथ्या सत्रात प्रो-कबड्डीमध्ये यू मुम्बाचा संघ पहिल्यांदा बाद फेरीत दाखल होऊ शकला नाही. यावेळी पंचांच्या सदोष निर्णयाचा फटका संघाला बसला, अनुपने जाहीरपणे ही बाब बोलून दाखवली. कित्येकदा अनेक नवोदीत खेळाडू अनुपला बाद करण्याच्या नादात आक्रमक व्हायचे, मात्र प्रत्येक वेळा, हा भाई शांत हो जा, आऊट हू मै !! असे हातवारे करत शांत केलं आहे. पाचव्या सत्रात यू मुम्बाच्या संघात हिमाचल प्रदेशचा सुरिंदर सिंह आला होता, सुरिंदर उत्कृष्ट बचावपटू असला तरीही त्याचा खेळ अजुन परिपक्व झालेला नाही. तो धसमुसळा खेळ करतो म्हणून अनुपने कित्येकदा त्याला आपल्यासोबत साखळीमध्ये खेळवत त्याला स्वतःवर नियंत्रण कसं करावं हे शिकवलं आहे.

पाचव्या हंगामात यू मुम्बा आणि अनुप कुमार यांचा खेळ खालावला. सहाव्या हंगामाला यु मुम्बाचा संघ अनुपला कायम राखणार नाही अशी बातमी होती. प्रत्यक्ष लिलावातही असंच झालं, यू मुम्बाने अनुपला घेण्यात नापसंती दाखव्यानंतर जयपूरने अनुपसाठी ३० लाखांची किंमत मोजून त्याला आपल्या संघात घेतलं. मात्र या हंगामातही अनुपला त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यातचं यंदाचं वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रो-कबड्डीचा प्रेक्षकवर्ग कमी झाला. घरी आई-बाबा विचारायला लागले, यंदा अनुप नाही का यू मुम्बामध्ये?? मग काय बघण्यात मजा नाही….त्यांचंही एका अर्थाने बरोबर होतं. अनुपने त्यांना मालिका सोडून कबड्डी पहायची सवय लावली होती, त्यामुळे आता तोच नसेल तर….असो, पण आपलं आपल्या आई-बाबांसारखं नाहीये. अनुप नसला म्हणून काय झालं, असे अनेक उमदे खेळाडू प्रत्येक हंगामात कबड्डीकडे वळतायत. तुमच्या आमच्यासारखे सामन्य घरातले खेळाडू या मैदानावर येऊन मोठे होतायत. पर्यायाने खेळही मोठा होतोय. असाच पाठींबा राहिला तर एकदिवस कबड्डी क्रिकेटलाही मागे टाकेलं, आणि हेच तर स्वप्न होतं ना अनुपचं!!

मराठीतील सर्व pro kabaddi league बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi season 6 anup kumar retire from kabaddi special blog by prathmesh dixit
First published on: 20-12-2018 at 10:10 IST