05 April 2020

News Flash

BLOG: ‘मोदी, मसूद अभी जिंदा हैं’

अनेकदा people have very short memory असं म्हटलं जातं.

– दीनानाथ परब

अनेकदा people have very short memory असं म्हटलं जातं. तुम्हीच आठवून बघा ना, तुम्हाला आतापर्यंतचे किती दहशतवादी हल्ले आठवतात. हल्ला होतो, दोन दिवस निषेधाचे सूर उमटतात. फारफार तर, वृत्तपत्रांमध्ये चार कॉलम येतात. सोशल मीडियावर देशभक्तीचा पूर येतो आणि राहिलच तर, माणुसकीच्या नावाखाली मेणबत्त्या पेटतात. पण हे सगळ शॉर्ट मेमरीच ठरतं. तुम्हाला आठवतय का, पुलवामा हल्ला कधी झाला होता? अभिनंदन वर्थमानमुळे कदाचित तुम्हाला एअर स्ट्राइक आठवत असेल, पण त्या आधी झालेल्या हल्ल्यात किती भारतीय सैनिक शहीद झाले होते. मसूद अझहर संदर्भात कदाचित आपली हीच शॉर्ट टर्म मेमरी आहे. हल्ला झाला की, मसूद अझहर आठवतो. आपण बालाकोटवर हल्ला केला, पुलवामाचा बदला घेतला याला आज एक वर्ष होत आलयं. पण भारताला कायम चुचकारणारा मसूद अझहर हा क्रूरकर्मा दहशतवादी आजही जिवंत आहे.

मागच्यावर्षी १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपण आपल्या ४० शूरवीरांना गमावले. या प्रकरणाचे पुढे काय झाले? हल्लेखोर अदिल अहमद दारपर्यंत इतक्या मोठया प्रमाणात स्फोटके कशी पोहोचली? या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मसूद अझहर कडेकोट सुरक्षा बंदोबस्तामध्ये वावरतोय, याबद्दल एक समाज म्हणून आपल्या मनात अजिबात चीड किंवा संतापाची भावना नाहीय. आपल्याला या घटनेचे तितके गांभीर्य उरलेले नाहीय?. फक्त १४ फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्याच्या वर्षपूर्तीला आपण आपल्या व्हॉट्स अॅपच्या स्टेटसवर पुलवामा हल्ल्यातील शहीदांचे फोटो लावले, श्रद्धांजली वाहिली व विसरुन गेलो.

प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्याला परदेशी सुरक्षा संस्थांचा हेवा वाटायला सुरुवात होते. इस्रायल हे त्यात आघाडीवर. सध्या केंद्रात सत्तेवर असलेल्या सत्ताधाऱ्यांना किंवा त्यांच्या पितृ संघटनेला इस्रायलचे खूप आकर्षण आहे. भारताने दहशतवादाविरुद्ध इस्रायलसारखेच धोरण अवलंबले पाहिजे, इस्रायलसारखीच आक्रमकता बाळगली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. इस्रायलच्या आपण किती निकट आहोत हे, दाखवून देण्याचा ते प्रयत्नही करतात. पण त्याच इस्रायलने १९७२ सालच्या म्युनिच ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या ११ खेळाडूंची हत्या झाल्यानंतर घेतलेला बदला कोणीही विसरणार नाही. पॅलेस्टाइन दहशतवाद्यांनी हे हत्याकांड केले होते. इस्रायलने ऑपरेशन ‘रॅथ ऑफ गॉड’ची आखणी केली व पुढची २० वर्ष या कटामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक दहशतवाद्याला त्यांनी वेचून-वेचून संपवले.

पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या दिवशी दहशतवाद्यांनी सर्वात मोठी चूक केली आहे, याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असे जाहीर केले होते. त्यानंतर आपण बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअरस्ट्राइक केला. अनेक दहशतवादी या कारवाईत मारले गेल्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र आजही अनेकांच्या मनात या एअर स्ट्राइकबद्दल संशय आहे. पुलवामा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मसूद अझहर आज पाकिस्तानात सुरक्षित आहे.

पंजाब प्रांतातील बहावलपूरमध्ये पाकिस्तानी सैन्याने मसूद अझहरला सुरक्षित ठेवल्याचे भारतीय गुप्तचरांचे म्हणणे आहे. याच मसूदने भारतीय लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेवर हल्ला केला होता. इंडियन एअर फोर्सच्या पठाणकोट एअर बेसवर हल्ला केला होता. हाच मसूद आणखी काही वर्षांनी पुलवामासारखा हल्ला पुन्हा करेल, या राक्षसाला आपण संपवणार आहोत की, नाही?

ओसामा बिन लादेनने अमेरिकेवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने बरोबर दहा वर्षांनी पाकिस्तानात घुसून लादेनचा खात्मा केला. उरी हल्ल्यानंतर आपण सर्जिकल स्ट्राइक केला, पुलावामानंतर बालाकोट एअरस्ट्राइक केला. पण यामागे मसूद अझहर सारख्यांचे जे मेंदू आहेत, ते आपण संपवणार आहोत की, नाही?पाकिस्तानने दहशतवाद्यांना थारा देऊ नये, असा दम अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्यावर असताना भरला. पण तेवढयाने काही होईल? अमेरिका, इस्रायलने जे करुन दाखवलं त्याला बदला म्हणतात. मोदी म्हणाले होते की, ‘आंतकवादीयो को बहोत बडी किमत चुकानी होगी’. मसूद तिथे आरामात राहतोय, आपण काय करु शकलो त्याचं? त्यामुळेच ‘मोदी, मसूद अभी जिंदा हैं’ हे खेदाने म्हणावे लागतं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2020 10:21 am

Web Title: pulwama attack mastermind jaish e mohammed chief masood azhar is in pakistan dmp 82
Next Stories
1 Ind vs NZ : या संघाला पॅसिफिक महासागरात बुडवायला हवं !
2 BLOG : ‘चाँदनी’ला आठवताना…
3 Ind vs NZ : दिलीप सरदेसाईंचं द्विशतक, तरीही पतौडी ठरले टीकेचे धनी
Just Now!
X