– धवल कुलकर्णी

तसं बघितलं तर ठाकरे मंडळींना अजातशत्रूपणा, किंवा ज्याला पोलिटिकल करेक्टनेस म्हणतात, याचं प्रचंड वावडं. ज्येष्ठ समाजसुधारक, लेखक, पत्रकार आणि वक्ते असलेले प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे एकदम सडेतोड आणि एक घाव दोन तुकडे पद्धतीच्या भाषेसाठी प्रसिद्ध.

स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा सुरुवातीला आपल्या व्यंगचित्रांतून नंतर भाषणातून व लेखनामधून ही ठाकरी भाषेची परंपरा पुढे चालवली. एखाद्या ५,००० शब्दांच्या लेखाचा जो परिणाम होणार नाही तो बाळासाहेबांच्या एका व्यंगचित्राने व्हायचा… अगदी सौ सोनार की एक लोहार की म्हणतात तसा. पुढे बाळासाहेबांचे पुतणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीला शिवसेनेतून आणि स्वतःच्या व्यंगचित्रातून आणि नंतर स्वतः काढलेल्या पक्षामधून हा वारसा पुढे नेला.
२००६ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा मात्र अगदी पोलिटिकली करेक्ट म्हणावा असा होता. भगवा, हिरवा, निळा व पांढरा अशा रंगांचा मिलाफ असलेला झेंडा महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख समाजांना स्वतःमध्ये सामावून घेऊ पाहत होता. अर्थात मार्च ९, २००६ रोजी शिवाजी पार्कवर झालेल्या मनसेच्या पहिल्या सभेमध्ये राज ठाकरे यांचे भाषणसुद्धा सर्वधर्मसमभाव, विकास अशा मुद्यांवरती पोलिटिकली करेक्ट म्हणावं असंच होतं. मात्र मनसेने नंतर स्वतःच्या भूमिकेमध्ये एक मोठा बदल करून मुंबई आणि आसपासच्या परिसरातल्या उत्तर भारतीयांच्या विरोधात शड्डू ठोकला. तेव्हा मनसेमध्ये राज ठाकरे यांच्या जवळ असलेले नेते याचं अगदी साधं सरळ आणि सोप्पं कारण देतात ते म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर मतं मिळत नाहीत…

नंतर पुला खालून खूप पाणी वाहून गेलं.

जानेवारी २३ रोजी राज ठाकरे यांनी पक्षाच्या झेंड्याचा नुसता रंग बदलून त्याला भगवा केलं नाही तर, येत्या काळामध्ये आपल्या पक्षाची राजकीय आणि सामाजिक भूमिका काय असे याचीसुद्धा कल्पना दिली. एरवी आपल्या भाषणाची सुरुवात करताना मराठी बंधू आणि भगिनींना साद घालणारे राज ठाकरे यांनी थेट व्यापक हिंदू समाजालाच संघटित करायला आवाज दिला…

फेब्रुवारी नऊ रोजी राज ठाकरेंनी मुंबई व महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे शिरकाव करून राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात एका विशाल मोर्चाचं आयोजन केलं आहे. तसं बघितलं तर या मोर्चाचा हेतू व उद्देश हा नरेंद्र मोदी सरकारच्या नागरिकता संशोधन विधेयक आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी यांच्या बाजूनं असल्यामुळे मनसेला भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षासोबत युती नाही तर किमान एखाद्या राजकीय तडजोडीसाठी कवाडे खुली होऊ शकतील.
आत्तापर्यंत हिंदू-मुस्लीम वाद यांच्यासारख्या विषयांमध्ये फारसं लक्ष न घालणाऱ्या राज ठाकरे यांनी मशिदीवरच्या भोंग्यांसारख्या हिंदुत्ववाद्यांच्या अगदी लाडक्या विषयांना आपल्या भाषणात स्पर्श केल्यामुळे या म्हणण्याला अधिक पुष्टी मिळते.

तसं बघितलं तर मनसेकडे आज फारसे राजकीय पर्याय शिल्लक नाहीत. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे तीन वेगळ्या तोंडावळ्याचे पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी एकत्र आले आहेत आणि त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधी अवकाश म्हणजेच anti-incumbency space भारतीय जनता पक्षासाठी खुली झाली आहे.

देशामध्ये वाढत असलेला बहुसंख्य वाद लक्षात घेता कदाचित मनसेला हिंदुत्ववादी भूमिका घेऊन या विचाराच्या मंडळींना स्वतःकडे आकृष्ट करून या प्रस्थापित विरोधी अवकाशाचा काही भाग आपण स्वतःकडे घ्यावा असं वाटत असावं. सत्तेसाठी शिवसेनेला अनेक विषयावर तडजोडी कराव्या लागतायेत हे अगदी उघड आहे आणि त्यामुळे कदाचित मनसे शिवसेनेच्या नाराज हिंदुत्ववादी मतदारांना स्वतःकडे आकृष्ट करू पाहील. भारतीय जनता पक्षाकडे महाराष्ट्रात स्वतःचे १०५ आमदार जरी असले, तरीसुद्धा राज ठाकरे यांच्यासारखा एक फर्डा वक्ता आणि गर्दी खेचू शकणारं व्यक्तिमत्व असलं तर त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल. मात्र भाजपचे नेते एक गोष्ट निक्षून सांगतात ती म्हणजे जरी भाजपने मनसेसोबत युती किंवा राजकीय ॲडजस्टमेंट केलं तरी सुद्धा मनसेला शिवसेनेप्रमाणे मोठी जागा या मैत्रीत मिळणार नाही. कारण उघड आहे. ते म्हणजे मनसेला सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये जेमतेम भोपळ्याचा आकडा फोडून फक्त एकच आमदार निवडून आणता आलेला आहे. मनसेची आधीच कमकुवत असलेली संघटनात्मक शक्ती अजूनच खिळखिळी झाली आहे आणि २००९ मध्ये पक्षाला मिळालेल्या घवघवीत यश हे केवळ तत्कालिन क्षणिक भावनेवर आधारित असू शकतं असा अंदाज काढता येईल अशी परिस्थिती आहे.

अमराठींच्या दादागिरीकडे दुर्लक्ष करणार का?

१९८० च्या दशकात संघ परिवाराने राम मंदिर आंदोलनाची सुरुवात केली. मात्र महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा ताबा घेतला तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. याच दशकात हिंदुहृदयसम्राट म्हणून एक नवी ओळख घेऊन उदयाला आलेल्या बाळासाहेबांनी बाबरी मशीद पाडणाऱ्या मंडळींमध्ये शिवसैनिक असतील तर मला त्यांचा सार्थ अभिमान आहे असं जाहीरपणे सांगितलं होतं. CAA आणि NRC च्या बाजूने भूमिका घेऊन जनमत अशाच पद्धतीने स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न मनसेकडून होत असेल का?

पण हेही लक्षात घ्यायला हवं की, १९८० च्या दशकात हिंदुत्वाकडे वळलेल्या शिवसेनेला सुरुवातीला यश जरी मिळालेलं असलं तरी नंतर हिंदुत्वामुळे काही अपरिहार्य तडजोडी सुद्धा कराव्या लागल्या. ह्याच मुळे नाराज झालेल्या मराठी माणसाने २००९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेच्या पारड्यात घवघवीत मतं टाकली. मात्र मनसेचे नेते असा दावा करतात की त्यांचं हिंदुत्व हे महाराष्ट्रधर्म म्हणजेच मराठी वादाच्या चौकटीत बांधलेलं असेल. पण हे दिसतं तितकं सोपं नाही कारण एकदा हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्यावर इतर भाषिक समुदाय, जसे की गुजराती, हिंदी भाषिक वगैरे यांच्या “दादागिरी” कडे दुर्लक्ष करावं लागेल हे ओघाने आलेच. हिंदुत्वाची भूमिका घेतल्यावर समाजातला एक महत्त्वाचा वर्ग जसे मराठी मुसलमान, बौद्ध, दलित वगैरे दुखावले जातील हे सुद्धा सांगायला नको.

भाजपचे नेते मनसेला एका विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढू द्यायला फारसे उत्सुक असायचं कारण नाही. महाराष्ट्रात आधीच हिंदुत्वाची राजकीय स्पेस व्यापणारे दोन मोठे पक्ष आहेत ते म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष. त्यात तिसऱ्या पक्षाला खतपाणी घालून तीन तिघाडा काम बिघाडा करायचा उद्योग भाजप का बरं करेल? २००९ च्या यशानंतर मनसेला गळती लागली आणि मनसेचे बरेच दुसऱ्या फळीतले नेते जसे प्रवीण दरेकर, मंगेश सांगळे, राम कदम वगैरे भाजपची वाट पकडून मोकळे झाले. कधीकाळी भाजपचा हक्काचा मतदार असणारा एक वर्ग पुणे आणि कल्याण डोंबिवली सारख्या महानगरांमध्ये मनसेकडे झुकला होता. नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या राजकीय उदयानंतर हे लोक पुन्हा स्वगृही परतले हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं.

मनसेकडे दुसरा पर्यायही नाही हे खरं

२००८ मध्ये केलेल्या उत्तर भारतीय विरोधी आंदोलनाचा फायदा मनसेला २००९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या यशामध्ये मिळाला. त्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मनसेमुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या जवळजवळ नऊ उमेदवारांचा पराभव झाला तर विधानसभेच्या निवडणुकीत मनसेच्या १३ जागा जरी निवडून आल्या. त्या पलीकडे मनसेच्या उमेदवारांमुळे आपला साधारणपणे ६६ ठिकाणी पराभव झाल्याची कबुली युतीच्या नेत्यांनी दिली होती. नंतरच्या काळात भाजपचे नेते शिवसेनेला चिडवायला मनसेसोबत होऊ घातलेल्या युतीबाबत पुढ्या सोडत असत. २०१४ मध्ये राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा देऊनसुद्धा शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात लोकसभेच्या निवडणुकीत आपली माणसे उभी करण्याची खेळी त्यांच्या अंगाशी आली. नंतर आपला भरवशाचा मतदारवर्ग भाजपकडे सरकल्याची जाणीव झाल्यावर राज ठाकरे यांनी मोदी वर टीका करायला सुरुवात केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरून सभा घेतल्या. त्याआधी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत ॲडजस्टमेंट करायचं प्रयत्नसुद्धा करून पाहिला होता. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत गेल्यामुळे मनसेला तसे दुसरे कुठले पर्याय शिल्लक राहिले नाही आहेत हेच खरं…

बहुजन समाज पक्षाचे प्रणेते कांशीराम यांचा एक प्रसिद्ध वाक्य आहे. स्वतःच्या पक्षाच्या एकूणच राजकीय प्रवासाबाबत बोलताना कांशीराम म्हणतात “पहले गिरो, फिर गिराव, फिर चुनके आओ.” बहुजन समाज पक्षाचा एकूणच राजकीय प्रवास हा त्या धर्तीवर झाला ही वस्तुस्थिती आहे. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना कात टाकून मराठीकडून हिंदुत्वाकडे वळत असताना कांशीराम यांचं हे वाक्य आठवल्याशिवाय राहत नाही. खरंच हे राजकीय स्थित्यंतर राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला गिरो आणि गिराव पासून चुनके आवपर्यंतचा मोठा प्रवास करायला मदत करेल का? याचं उत्तर काळाच्या पोटात आहे…