28 February 2021

News Flash

BLOG: मिशीवाला रामलल्ला!

याखेपेला गुर्जीनी नवाच मंत्र दिला, ‘अयोध्येतील रामलल्लाला मिश्या हव्यातच

प्रतीकात्मक संग्रहित छायाचित्र

– डॉ. नीरज देव

‘मिशी’ स्त्रीलिंगी असली तरी पुरुषत्वाचे पहिले लक्षण मानली जाते. त्यामुळेच असेल मर्द मराठीत मिशीवरुन अनेक शब्दप्रयोग तयार झाले असावेत. ‘मिसरुड फुटणे’ म्हणजे तारुण्यात पदार्पण करणे, ‘मिशीवर ताव मारणे’ म्हणजे खुष होणे तर ‘मिश्यांना पीळ देणे’, ‘मिश्या वर होणे’ म्हणजे अभिमान, गर्व वाटणे. थोडक्यात मिशीचा प्रवास पुरुषत्वाच्या प्राथमिक लक्षणाकडून गर्वाच्या उच्चतम लक्षणाकडे वळायला लागतो.
‘गर्व’ म्हटले कि आम्हाला चटकन आठवतो तो ‘गर्व से कहो’ चा बुलंद नारा अन् बुलंद नारा म्हटले की आपसुकच आठवतात भरदार नि पीळदार मिश्यांचे गुर्जी ! मिश्या नि गुर्जी यांचा अन्योन्य संबंध आहे, दोहोतून एक वगळले की दूसरे आपोआपच अंतर्धान पावते. देशभक्तांच्या अंतराला भिडणारे गुर्जी माहित नाहीत असा देशभक्त अलम दुनियेत कोणी नाही. गुर्जी नवनवे प्रयोग करुन देशातील तरुणांचे स्वत्व जागवित असतात. मागल्या मौसमातील त्यांचा ‘आंबे प्रयोग’ भलताच गाजला होता. त्यावरुनच स्फूर्ति घेत याखेपेला गुर्जीनी नवाच मंत्र दिला, ‘अयोध्येतील रामलल्लाला मिश्या हव्यातच !’

आमच्या उभ्या हयातीत कोणत्याही बालकाला जन्मतः मिश्या असलेल्या आम्ही पाहिल्या नाहीत. हा एकतर आमच्या आखूड मिशीचा दोष असावा किंवा जन्मतः न येता युवावस्थेत मिश्या फुटल्याचा दोष असावा. कदाचित असेही असू शकते की गुर्जी जन्मतःच मिशीवर ताव देत जन्मल्याने त्यांना रामलल्लाना मिशा असाव्यात असे वाटत असावे. मिशी विरहित रामात रामच राहणार नसेल तर भूमिपूजन तरी काय उपयोगाचे? या चिंतेने आम्ही त्रस्त झालो.

आता यातून सुटण्याचा मार्ग केवळ दोनच जण काढू शकत होते एक प्रत्यक्ष गुर्जी अन् दूसरे रामलल्ला!

गुर्जीना भेटणे महाकठीण त्यामानाने रामलल्लाला भेटणे सोपे. म्हणून मी ठरविले रामलल्लालाच भेटावे. सर्वांच्या अंतर्यामी वसणा-या रामाला स्मरताच ते तत्काळ प्रकटले. त्यांना प्रणिपात करत मी विचारले, “प्रभु अयोध्येतील आपल्या प्रतिमांना मिशा असाव्यात असे मला वाटते.”
त्यावर स्मित करीत श्रीराम उत्तरले, “बेटा, तुझे काहीतरी चूकतेय, मी मिश्या कधीच ठेवल्या नव्हत्या.”

“प्रभो ! असेकसे ? मिश्याविना पुरुष तरी असतो का ? आणि, आपण तर मर्यादा पुरुषोत्तम.” माझे बोलणे तोडत प्रभु उत्तरले, “काहीतरीच काय सांगतोस ? मला सांग आपल्या तांडवनृत्याने जगाचा संहार करणा-या पुरुषोत्तम शंकराला मिश्या दिसतात का? सर्व जगाचे परिपालन करणा-या भगवान विष्णुला तू कधी मिश्या पाहिल्यास का? माझे जाऊ दे, पण पूर्णपुरुष श्रीकृष्णाला, वीरातील वीर महावीराला, सा-या जगाला शांतीचा संदेश देणा-या बुद्धाला तरी मिश्या पाहिल्यास का?” मला प्रश्नांकित पाहून रामलल्ला पुढे म्हणाले, “अरे, मिश्यांवर पुरुषत्व ठरत नसते, ते बळावर ठरते. कोणाही निर्बलाचे बळ राम नसतात तर जो बलवान होतो तो स्वतःच राम होतो. तुझ्या त्या मराठी कविने म्हटले ते विसरलास का? ‘बहु मिशाभार वाढविला, म्हणून काय हो झाला पुरुष तो ?’ अन् अयोध्येतील माझी प्रतिमा तर बालपणीची. अगदी रांगत असतानाची. तेंव्हा उगाच काहीतरी खुळचट कल्पना करु नकोस.”

रामलल्लाचे बोलणे पटत असतानाही न राहवून मी त्याला म्हणालो, “पण प्रभु, मिशीवाले गुर्जी तर म्हणतात रामलल्लाच्या प्रतिमेला मिश्या असायलाच हव्यात.”

गुर्जीचे नांव ऐकताच रामलला एकदम थबकले अन् उत्तरले, “अरे, गुर्जी म्हणाले म्हणजे त्यात तथ्य असेलच. मला वाटते त्यांना परशुराम म्हणायचे असेल तू चुकून राम ऐकले असशील. एकदा गुर्जीनाच भेटून विचार.”

गुर्जीना कसे भेटावे या चिंतनात माझा डोळा लागला. त्याबरोबर माझ्या स्वप्नात गुर्जी त्यांच्या भरदार अन् पीळदार मिश्यांसह प्रकटले व धारदार आवाजात मला पुसते झाले, “कसली शंका आहे तुझ्या शंकेखोर मनात?’’ मी साष्टांग दंडवत घालीत भीतभीत गुर्जीना विचारले, “गुर्जी मिश्या कोणाच्या प्रतिमेला हव्यात ? परशुरामाच्या की रामलल्लाच्या” । तसे उसळून गुर्जी म्हणाले, “अज्ञ बालका ! तशा तर तुला पण हव्यात. पण मी बोललो होतो, अयोध्येत प्रतिष्ठापना होणा-या रामलल्लासंबंधी.”

“पण गुर्जी, रामलल्ला तर मला म्हणाले केवळ तेच नाहीत तर भगवान शंकर, विष्णू, महावीर, बुद्ध, आदी शंकराचार्य, चाणक्य सारेच मिशा मूळासकट काढून वावरत होते. मग रामलल्लाला मिश्यांचा भार हवाच कशाला? आणि गुर्जी मला सांगा केवळ मिश्या असल्याने पुरुषत्व कसे काय सिद्ध होणार?” त्यावर ‘’तेवढ्याचसाठी तर हे लावले.” म्हणत गुर्जीनी आमराईकडे अंगुली निर्देश केला अन् दृढ विश्वासाने ते बोलले, “अरे ! मी अयोध्येला गेलो होतो ना तेंव्हा रामलल्लांना झुपकेदार मिश्यांतच पाहिले होते.” मला विस्मयचकीत झालेला पाहून ते प्रेमळ स्वरात पुढे म्हणाले, “बेटा, इतक्या लवकर कसे विसरलास तू? समर्थ जेव्हा पंढरीला गेले होते, तेव्हा पांडुरंगाने त्यांच्यासाठी कटीवरील हात काढून हातात धनुष्यबाण घेतले होते.”

“होय ! होय !!’’ हडबडून मी उत्तरलो

“अगदी तसेच माझ्यासोबत अयोध्येत घडले होते. मी रामलल्लाला म्हणालो, ‘झुपकेदार मिश्यात प्रकटशील तरच तुझे दर्शन घेईल.’ त्याबरोबर रामलल्ला भरदार नि पीळदार मिशा लेवून प्रकटले. ‘ज्याचा जैसा भाव त्याला तैसा अयोध्या राव !’ ” अन् आकाशाकडे पाहून ते गर्जले, “काय रे रामलल्ला ! हे सत्य आहे ना?” त्याबरोबर प्रत्यक्ष रामलल्ला, बाल श्रीराम झुपकेदार, भरदार अन् पीळदार मिशांसह प्रकटले. त्या मिशांमध्ये त्यांचा चेहरा हरवून गेल्याने ते हुबेहूब गुर्जीसारखेच दिसत होते. मिशावाल्या बालक रामाचे, रामलल्लाचे ते अनोखे रुप पाहून मी कृतकृत्य होऊन हात जोडून ओरडलो ‘जय गुर्जी! जय रामलल्ला!!’

(लेखक डॉ. नीरज देव मनोचिकित्सा तज्ज्ञ व दशग्रंथी सावरकरने सन्मानित आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 12:54 pm

Web Title: ram lalla mustache ayodhya ram mandir
टॅग : Ram Mandir,Ram Temple
Next Stories
1 BLOG : लोकमान्य टिळक पुण्यस्मरण-अवघाचि झाला देह ब्रह्म!
2 BLOG: श्रीरामजन्मभूमी पुनर्निर्माण-तब्बल ४९२ वर्षांच्या अस्मितेच्या लढाईची यशस्वी सांगता
3 BLOG : ‘स्व’-रूपवर्धिनीचे तपस्वी सेवाव्रती ज्ञानेश पुरंदरे
Just Now!
X