जय पाटील
‘घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे…’ भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकरांनी सोमवारी ट्विटरद्वारे पावसाला असा काव्यात्म निरोप दिला. २४ तासांत पाऊस परतीचा प्रवास सुरू करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या ट्विटनंतर प्रतिक्रिया आणि प्रशंसेचाही पाऊस सुरू झाला.

काही वर्षांपूर्वीपर्यंत गमतीने म्हटलं जायचं, ‘हवामान विभागाने म्हटलंय मुसळधार पाऊस पडणार, म्हणजे आज छत्री घेऊन जायची गरज नाही…’ हवामानाचे अंदाज चुकणं हे तेव्हा नित्याचंच होतं. यंदा मात्र हवामान विभागाने पूर्ण हंगामात अचूक अंदाज वर्तवले. निसर्ग चक्रीवादळापासून परतीच्या पावसापर्यंत बहुतेक सर्वच अंदाज अचूक वर्तवल्यामुळे विभागाच्या कामगिरीची प्रशंसाही झाली. पावसाळा म्हणजे या विभागासाठी सर्वाधिक गडबडीचा काळ. सर्वसामान्यांपासून पालिका, पोलीस, अग्निशमन दल, शेतकरी, मासेमार, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांर्यंत सर्वांचंच लक्ष त्यांच्या अंदाजांकडे लागलेलं असतं.

यंदा परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांचं अपरिमित नुकसान केलं. आता येत्या २४ तासांत राज्याच्या बहुतांश भागांतून पाऊस परत फिरणार असल्याचं होसाळीकर यांनी स्पष्ट केल्यानंतर कोणी त्यांच्या काव्यात्म निरोपाची प्रशंसा करणारी, तर कोणी हवामान विभागाच्या कामगिरीची दखल घेणारी ट्विट्स केली.

कोणी ‘देता का वचन मला तुम्ही, ठेवाल वसुंधरा अशीच हिरवीगार, लोभ ठेवून तुमच्यावर असाच, पुढल्या वर्षी मी पुन्हा येणार, मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन…’ अशा कवितेतून पर्यावरण रक्षणाचं आवाहन करतानाच फडणवीसांच्या शब्दांवरही कोटीही केली. कोणी ‘मगर ऐ बारिश, जबसे देखा मैने, तुझको मुझको शायरी आ गयी,’ असं म्हणत होसाळीकरांच्या कवितेला दाद दिली. कोण आपल्या परिसरात ढगाळ हवामान असल्याचं सांगितलं, तर कोणी वरुणराजाचे आभार मानत पुढच्या पावसाची प्रतीक्षा करू असं म्हटलं. पावसाशी अनेकांचं भावनिक नातं जुळलेलं असतं. होसाळीकरांच्या ट्विटवरील प्रतिक्रियेच्या निमित्ताने अनेकांनी हे नातं शब्दबद्ध केल्याचं दिसलं.