01 March 2021

News Flash

BLOG: …संघाचा ‘चंद्रगुप्त’ संधी शोधत आहे!

भाजपमध्ये येणाऱ्या काळांत हा सत्तासंघर्ष आणखी तीव्र झालेला दिसेल

नरेंद्र मोदी व अमित शहा (संग्रहित छायाचित्र)

– मनोज वैद्य

भारतीयांना इतिहासात शिकायला कमी, पण रमायला खुप आवडते. तसेच चाणक्य आणि चंद्रगुप्त या व्यक्तिमत्वाने भारतीयांच्या मनावर फारच मोहिनी घातली आहे.त्यातल्या त्यात चाणक्याने तर भारतीय राजकारणांत अढळ स्थान मिळविले आहे. त्यामुळे अगदी गल्लीच्या राजकारणात, जो दुस-याला पदावर बसवितो त्याला चाणक्य ही उपाधी दिली जाते, तर जो पदावर बसतो तो आपसूकच (by default चपखल शब्द) चंद्रगुप्त म्हणून गणला जातो.

तर असा हा चाणक्यांचा अवतार गल्ली ते दिल्लीत आढळतात. काही स्वंयघोषित असतात. तर काही इतरांकडून स्वतःला चाणक्य म्हणवून घेतात. पण लोकांनासुध्दा चाणक्य ही व्यक्तीरेखा नेहमीच संघटन व राजकारण या पातळीवर आकर्षित करत आली आहे. त्याची शेंडी न बांधण्याची प्रतिज्ञा आणि त्याची कूटनीती जिला ‘चाणक्यनीती’ म्हटले जाते त्यावर सुध्दा कार्यकर्त्यांचा फारच विश्वास आहे. याबाबतीत समर्थ रामदास स्वामी व छञपती शिवाजी महाराज यांच्या ते एकञ कधी होते या काळांसंदर्भात इतिहासकारांत मतभेद आहेत, तसेच मतभेद चाणक्य व चंद्रगुप्त यांच्या काळाविषयी आहेत हे ब-याच जणांना माहीत नाही.

सध्या तुम्ही वृत्तवाहिन्यांवर जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची मुलाखत पहाता तेव्हा त्यांच्या मागील भिंतीवर हेडगेवार -गोळवलकर यांच्या प्रतिमा नसतात तर चाणक्य आणि सावरकर यांच्या प्रतिमा असतात. आणि त्यांचे दर्शन शहा यांच्यासमवेत दर्शकांना व्हावे असे कॅमे-याचे कोनाचे नियोजन जाणीवपूर्वक केल्याचे लक्षांत येते.

एकूणच सध्याच्या काळांत भाजपचे चाणक्य कोण हे आपणांस लक्षांत आलेच असेल, अर्थातच अमित शहा! आता मघाशी ठरलेल्या सूत्रानुसार चंद्रगुप्तसुध्दा पाहिजेच, आता पदावर बसलेली व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी हे चंद्रगुप्त असा संदेश जनमानसांत स्पष्टपणे गेलाच पाहिजे.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ही तशी एकचालकानुवर्ती संघटना असली तरी, त्यांना केशरी ध्वज हा गुरुस्थानी असतो, त्याअर्थाने संपूर्ण संघ हाच चाणक्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आणि त्यामुळे जिथे संघ असतो तिथे चंद्रगुप्त असतोच. रास्वसं जरी हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारी सांस्कृतिक संघटना असली, त्यांनी कितीही म्हटले की आम्ही सेवाप्रकल्प चालवतो. पण सरतेशेवटी ते त्याचा वापर सत्ता मिळविण्यासाठी करतात हे सिध्द झाले आहे. सध्याचे रामजन्मभूमी आंदोलन संघपरीवाराकडून संचलित होत आहे, आणि त्याचा २०१९ च्या निवडणुकीत भाजपला फायदा व्हावा यासाठीच नियोजन केले जात आहे. यातून सामान्य जनतेला लक्षात येत आहे की, संघ हाच भाजपचा चाणक्य आहे.

मग सध्याचे नरेंद्र मोदी हे चंद्रगुप्त आहेत का? हा प्रश्न उपस्थित होतोच. तर याचे उत्तर स्पष्टपणे नाही असेच येईल. कारण मोदी-शहांच्या व्यूहरचनेला संघाची साथ होती. पण नियोजन संघाचे नव्हते. तर काही भांडवलदार व मीडिया यांच्या सहकार्याने, तसेच इतर पक्षांतील नेते आयात करुन, मोदी यांनी सत्ता हस्तगत केली होती. यापूर्वीही अटलजींचे सरकार आले होतेच. त्यामध्ये सुध्दा सरकारमध्ये सामील आघाडीतील इतर पक्षांमुळे संघाला त्यामध्ये रस नव्हता. कारण संघाचा अजेंडा पुढे नेण्याचे सामर्थ्य अटलजींच्या सरकारांत नव्हते.

एकूणच भाजपचे सरकार आले तरी पंतप्रधानपदावर संघाचा ऑरगॅनिक कनेक्ट असलेला स्वंयसेवक विराजमान होत नाही, तोपर्यंत चाणक्याचा खरा चंद्रगुप्त बसला असे मानले जाणार नाही. त्यामुळे सध्याचा खरा चाणक्य कोण आहे. याचा अर्थबोध होणारी काहिशी परिस्थिती देशाच्या व भाजपच्या राजकारणांत निर्माण झाली आहे. तीन राज्यांत पराभव होण्यापूर्वी सध्याचे राजकिय विश्लेषक बिहार विधानसभेत झालेला पराभव विसरले आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा विजयरथ तिथे थांबला होता. मोदी यांनी धूवाँधार सभा घेतल्या, शहा यांनी नियोजन केले. पण संघाच्या सरकार्यवाह मोहन भागवत यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात एकच आरक्षणविरोधी विधान केले. सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या राज्याचा निकाल त्यामुळे फिरल्याचे मानले जाते आणि संघाने दाखवून दिले आम्हीच ‘चाणक्य’ आहोत.

सध्याच्या तीन राज्यांच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर मोदी-शहा यांनी मौन पाळले आहे. परंतु असे म्हटले जाते की, मध्य प्रदेश व राजस्थानमधील पराभवास मोदीनॉमिक्सचे नोटबंदी व जीएसटी हे दोन निर्णय कारणीभूत आहेत. त्यामुळेच संघाची घट्ट वीण असलेली ही दोन राज्ये गमवावी लागली. संघाने यांवर भाष्य करण्याचे टाळले, परंतु अचानकपणे ठराविक अंतराने नितीन गडकरी यांनी मात्र या भाजपच्या अपयशावर तोफगोळे डागून, आपण नांवाप्रमाणे गडकरी आहोत, हे मोदी-शहा यांना जाणीव करुन दिली.

सर्वप्रथम त्यांनी अपयशाची जबाबदारी नेतृत्वाने घ्यायला हवी, असे विधान केले. त्यातून गडकरींच्या विधानाचा रोख कोणाच्या दिशेने आहे हे देशांतील सामान्य माणसालासुध्दा कळले. त्यामुळे मोदी-शहा यांच्या सरकार व पक्षावर असलेल्या दहशतयुक्त वर्चस्वाला धक्का बसला. गडकरी त्यांच्या बेधडक विधानांबद्दल सुप्रसिद्ध आहेत. त्यामुळे ते पहिले विधान गांभीर्याने घेतले गेले, परंतु बोलले असतील म्हणून सोडून देण्यात आले. परंतु त्यानंतर गडकरी यांनी गुप्तचर अधिका-यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना, एक नविन वादग्रस्त विधान केले, मला नेहरु यांची भाषणे वाचायला व ऐकायला आवडतात, असे सांगून त्यांनी नेहरु यांच्या भाषणांतील वाक्ये सांगितली, “देशासाठी आपण जाचक ठरणार नाही, असा विचार प्रत्येक देशवासीयाने केला पाहीजे.” असाच विचार मीसुध्दा करतो असे गडकरींनी स्पष्ट करुन नेहरुविचारांशी सहमती दर्शविली.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधी-नेहरु घराण्यावर प्रत्येक सरकारी व राजकीय कार्यक्रमांत टोकाची टिका करतात. त्यावर समाजमाध्यमावरुन बरेच विनोद आणि व्यंगचित्रे प्रसिध्द झाली. त्यांना लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे मोदींची नेहरु प्रकरणांत बरीच खिल्ली उडवली गेली. त्यातून गडकरींच्या नेहरु प्रेमाला माञ सहजपणे घेतले गेले नाही. काहीतरी घडतय-बिघडतय हे लोकांच्या लक्षात आले.

गडकरींच्या गडावरुन मोदींवर झालेले शाब्दिक हल्ले अत्यंत थेट होते. परंतु त्यानंतर गडकरींनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य केले. त्यांनी नविन विधान केले की, आपण जर पक्षाध्यक्ष असतो तर पक्षाचे खासदार-आमदारांची कामगिरी चांगली नसल्यास त्याची जबाबदारीही आपणच घेतली असती. यानिमित्ताने नितीन गडकरी हे भाजपचे २००९ साली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या काळांत त्यांनी जाणीवपूर्वक भाजपमध्ये प्रशिक्षण वर्ग आदीतून एक जबाबदार भाजप कार्यकर्ता घडविण्याचा प्रयत्न केला होता. भाजपमध्ये आज जसे संशयाचे बंदिस्त वातावरण आहे तसे नव्हते तर मोकळेपणा होता हे लक्षात घेतले पाहिजे.

एकूणच नितीन गडकरी यांची तीनही विधाने योग्य दिशेने होती. त्यामध्ये नक्कीच अर्थ होता. सध्याच्या काळांत असे विधान करणे नक्कीच धाडसाचे होते. पण या धाडसासाठीचे बळ गडकरींना कुठून मिळाले यांसाठी तज्ज्ञांची गरज नक्कीच नाही. संघाच्या हेडक्वार्टर असलेल्या रेशीमबागेजवळच गडकरींचा वाडा आहे. हवेची झुळुक सुध्दा दोन्ही वास्तूंमध्ये एकच येत असेल इतकी जवळीक या दोन्हीही केंद्रामध्ये आहे. त्यामुळे गडकरींना योग्य निरोप मिळाल्याशिवाय अशा विधानांची मालिका सुरुच होऊ शकत नाही. यापूर्वी गडकरी यांनी एका करमणुकीच्या विनोदी कार्यक्रमांत असे विधान केले होते की, आम्हांला काही वाटले नव्हते सत्ता मिळेल, म्हणून आम्ही मनाला येतील अशी आश्वासने लोकांना दिली. परंतु आता आम्हांला लोकांना तोंड दाखविणे कठीण झाले आहे. तसेच आणखी एक विधान केले होते, नोकऱ्या आहेतच कुठे? त्यामुळे राखीव जागा देऊन काय उपयोग! पण ही दोन्हीही गडकरीछाप होती, त्यामागे संघ असेल हे कोणीच विचारले नाही हे लक्षात घेतले पाहिजे .

परंतु मोदी-शहा यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारी विधाने संघाच्या संमतीशिवाय शक्यच नाही. असे भाजपचा प्रत्येक जाणकारच नव्हे तर सामान्य कार्यकर्ता सुध्दा मान्य करतोय. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप २७२ चा आकडा गाठणे कठीण आहे, हे संघाच्या लक्षांत आले आहे. त्यांत सध्या भाजपचे अनेक नेते मोदी-शहा यांच्या दडपशाहीला कंटाळले आहेत. विशेषतः नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीमध्ये समोरच्या व्यक्तिला दोनच पर्याय असतात, एक तर गुलाम व्हावे लागते नाहीतर शत्रू म्हणून त्याला तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत बहुमत नसताना भाजपचे नेतेच मोदींना दाद देणार नाहीत तर इतर पक्षांच्या नेत्यांचा प्रश्नच येत नाही.

अशा परिस्थितीत चाणक्यरुपी संघाने आपल्या मनातील चंद्रगुप्तला इशारा केला नाहीतर नवलच होईल. सर्वसमावेशक ब्राह्मण चेहऱ्याच्या व्यक्तिला संधी मिळाली तर पंतप्रधान पदावर गडकरींना बसविण्यात संघाला आनंदच होईल. त्यामुळे सध्याच्या राजकीय वातावरणात नितीन गडकरींच्या विधानांना नक्कीच दूरगामी अर्थ आहे. भाजपमध्ये येणाऱ्या काळांत हा सत्तासंघर्ष आणखी तीव्र झालेला दिसेल. या संघर्षातूनच संघरुपी चाणक्याच्या मनातील खरा चंद्रगुप्त म्हणजेच नितीन गडकरी संधी निर्माण कधी होतेय याची वाट बघतोय. त्यासाठी गडकरींना याकरीता मोठा राजकीय धोका पत्करावा लागेल याची त्यांना जाणीव नसेल असे कसे म्हणता येईल. पण गडकरींच्या या निर्धारामागच्या मानसिकतेच वर्णन सुप्रसिद्ध कवि रॉय किणीकर यांच्या काही ओळी करतात..

सोडूनी वाट
तुडवित जावे काटे!
मोडूनी रांग ती..
पडावे बाहेर वाटे!!

येणाऱ्या निवडणुकीच्या आधीच्या शंभर दिवसांचा कालावधीत फारच डावपेच रंगतील, त्यामुळे कुणाचे काटे निघतील, कुणाला काटे टोचतील हे काळच सांगेल हे मात्र नक्की आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 1:20 pm

Web Title: rss chandragupt waiting to seize opportunity
Next Stories
1 BLOG : ७१ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात इतिहास घडावा…
2 Thackrey Movie: ‘आवाज कोणाचा?’ अरेरे… सचिन खेडेकरचा?
3 BLOG: शहरी माओवाद किंवा Urban Naxal हे जुनंच दुखणं!
Just Now!
X