समीर जावळे

‘मै अफसाना नहीं लिखता अफसाना मुझे लिखता है.. कभी कभी हैरत होती है की कौन है जो इतने अफसाने लिख रहा है! असं म्हणणाऱ्या मंटोची आज जयंती. हा माणूस आपल्यातून निघून गेलाय त्याला ६५ वर्षे झाली..पण त्याच्या कथा, त्याची नाटकं, त्याने निर्माण केलेलं साहित्य यातून तो भेटत राहतो. म्हणूनच त्याच्या जयंतीनिमित्त त्याला लिहिलेलं हे पत्र!

प्रिय मंटो,

तुझी आज जयंती.. तुझी आज खूप आठवण आली. लिखाणातला विद्रोह काय असतो, लेखणी तलवारीचं रुप कसं धारण करते हे सगळं तू तुझ्या आणि पुढच्या कैक पिढ्यांना न मागता देऊन गेला आहेस. तुला मी अहो-जाओ करत नाही. कारण तुझ्या पुस्तकांमधून, कथांमधून, साहित्यातून भेटत राहतोस तेव्हा तू मित्रासारखा वाटतोस. त्यामुळेच हक्काने तुला अरे जारे करतो आहे. तुझी लेखनशैली त्या काळातल्या लोकांना पटली नाही. कारण तू प्रवाहाच्या विरोधात लिहित गेलास. मनाला पटेल ते मांडत गेलास. पण आज पूर्णपणे पटते आहे. तुझे विचार, तुझी मनाली सल मांडण्याची धाटणी, समाजाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न खरा होता हे जाणवतं त्यामुळेच तू ६५ वर्षांनीही विस्मृतीत गेलेला नाहीस.

तुझा जन्म लुधियानातला, मृत्यू लाहोरमधला. फाळणीनंतर तुला मुंबई सोडावी लागली. लाहोर गाठावं लागलं. ज्या मुंबईवर तू अतोनात प्रेम केलंस ती तुला सोडावी लागली. मनात ही टोचणी घेऊनच तू लाहोरला गेलास. तिथे गेल्यावरही फाळणी आणि त्यानंतर झालेले परिणाम तुला अस्वस्थ करुन गेले. फाळणीच्या जखमा त्यावेळचं ते दुःख तू खूप जवळून पाहिलंस ‘एक आदमी का मरना मौत है और लाख आदमींयोका मरना तमाशा!’ हे वाक्य वाचलं की तुला ही सल किती आणि कशी सहन करावी लागली असेल याची कल्पना येते.

‘गुलाम थे तो आझादी का ख्वाब देखते थे, अब आझाद हैं तो कौनसा ख्वाब देखेंगे?’ यातून तुझ्या मनातली अस्वस्थताही जाणवते. अगदी अशीच समाजाला झुगारुन देण्याची जाणवते ती, ‘अगर मेरे अफसाने कोई बर्दाश्त नहीं कर सकता तो इसका मतलब है के जमानाही ना काबिले बर्दाश्त है’ या वाक्यातून. तू मनाला पटेल ते लिहित गेलास त्यावर हेदेखील सांगितलंस की मी समाजाला आरसा दाखवतो आता एखाद्या कुरुप माणसाने प्रतिबिंब पाहून आरशावर टीका केली तर त्यात माझा तो काय दोष?

‘मै इतना लिखूंगा की तुम भुखी नहीं मरोगी’ असं पत्नीला बेबाकीने सांगणारा तू! ‘हकिकतसे मूँह मोड लेना क्या हमें बेहतर इन्सान बना देता है? हरगीज नहीं!’ ‘नीम के पत्ते कडवे सही लेकिन खून तो साफ करते हैं!’ ‘मै आर्टिस्ट हूँ ओछे जख्म और भद्दे घाव मुझे पसंद नहीं’ ‘मैने तुम्हे अपना दोस्त बनाया है, अपनी जमीर की मस्जिद का इमाम नहीं’ ‘जरुरी है की जमाने की करवटके साथ अदब भी करवट बदले’ या सगळ्या वाक्यांतून तुझ्यातला सच्चेपणाच समोर आला आहे.

तू केलेल्या लिखाणासाठी तुला एकदा नाही सहावेळा तुरुंगवास भोगावा लागला. तुझ्यासारख्या संवेदनशील माणसाच्या आयुष्यातली ही एक यातनाच म्हणावी लागेल. तुझ्या कथांवरचा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. अशा सगळ्या परिस्थितीतही तू तुझी लेखणी थांबवली नाहीस. तू तुझा संघर्ष करत राहिलास कारण आपण सच्चे आहोत हा विश्वास तुझ्यात होता.

‘ठंडा गोश्त’ या तुझ्या कथेवरुन, त्यातल्या भाषेवरुन किती गहजब झाला होता. पण तू त्याही परिस्थितीत स्वतःला सावरलंस. तुझी ही कथा खरंतर कोणत्याही संवेदनशील माणसाला अंतर्बाह्य अस्वस्थ करणारी होती. पण ते त्या काळातल्या अनेकांना पटलं नाही. फाळणीचे तुझ्या मनावर पडलेले चरे तू कागदावर शब्दरुपाने उतरवत गेलास. एखाद्या जखमेतून रक्त निघावं तितकेच तुझे कागदावर उतरलेले शब्द धगधगत्या परिस्थितीचं चित्रण करणारे होते.

‘ठंडा गोश्त’, ‘बू’, ‘टोबा टेकसिंह’, ‘काली सलवार’, ‘शैतान’, ‘लाऊड स्पीकर’ ‘गंजे फरिश्ते’ ‘नमरुद की खुदाई’ या आणि अशा कथांमधून भेट राहिलास. तुझ्या आयुष्यात तू २२ लघुकथा संग्रह, एक कादंबरी आणि रेडिओ नाटकांचे पाच संग्रह लिहिले, दोन व्यक्तिचित्रणंही लिहिलीस. तुझं हे साहित्य कायम प्रेरणादायी ठरेल हे दोन वर्षांपूर्वी तुझ्यावर आलेला मंटो हा सिनेमाच सांगून गेला. आजच्या घडीला सिनेमा डिजिटल झाला आहे. तरीही नंदिता दाससारख्या संवेदनशील अभिनेत्रीला तुझ्यावर सिनेमा काढावासा वाटला. तिने हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. त्यात तुझी भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली आहे.

तू हे जग सोडून गेला आहेस त्याला ६५ वर्षे होऊन गेली. तरीही तुझ्या आठवणी मनात आहेत आणि तुझ्या पुस्तकांमधली वाक्यं कानात. कधी तू मित्र म्हणून भेटत राहतोस. कधी तू जळजळीत वास्तव दाखवणारा माणूस म्हणून भेटत राहतोस. तुझ्या इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेल्या कथाही अस्वस्थ करत राहतात. त्या कथा त्यावेळी घडलेल्या प्रसंगामधून तू कागदावर उतरवल्या आहेत. मात्र त्या कथांची नाळ आजच्या घटनांशीही आपण जोडू शकतो यातच तुझं यश सामावलं आहे. तू साहित्यिक म्हणून इतका मोठा आहेस की तुझ्या कथांचा नवनवीन अर्थ उमगत जातो. त्यामुळे तू पुढची अनेक वर्षे माझ्यासारख्या प्रत्येकालाच प्रेरणा देत राहशील.. तू होतास म्हणून भूतकाळ म्हणून संपणार नाहीस तू आहेस, तू राहशील तुझ्या साहित्यकृतींनी तुला अमर केलंय!

तुझाच
चाहता वाचक