तुझ्यावर अत्याचार होऊन आज बरोबर एक आठवडा झाला. तुझ्यावर झालेल्या बलात्कारची बातमी आली काळजात धस्स झालं..!! अंगावर काटा आला. मनात विचार आला पुन्हा एकदा? आणि मला भीती वाटली. आपल्या मुंबईत अशी घटना घडलेली एकून आपण ज्या शहरात राहतो ती खरंच ‘सेफ सिटी’ आहे का? असा प्रश्न राहून राहून डोक्यात घुमू लागला.

आम्ही मुंबईच्या मुली स्वतःला खूप स्ट्रांग समजतो. वेळ आलीच तर समोरच्याला दोन कानाखाली देतील या मुंबईच्या मुली अशी आमची ओळख झालेली आहे. पण हे सगळं बाजूला पडलय आता. उद्या माझ्यावर वेळ आली तर मी काय करेल असं वाटत मला. ज्या शहराची वर्णी अनेकदा ‘सेफ सिटी’ च्या यादीच अव्वल स्थानी लागली आहे ती आमची मुंबई खरंच सेफ आहे का?.. खरच सुरक्षित आहे का? असं वाटू लागलय मला. ज्या मुंबईच्या नाईट लाइफच कौतुक सर्वत्र आहे त्या मुंबईत मला आता दिवसा फिरायची सुद्धा भीती वाटू लागली आहे. तुझ्यावर ओढवलेल्या प्रसंगानंतर महाराष्ट्रातील अजून काही ठिकाणच्या बलात्कारच्या घटना पुढे आल्या. या वेळी तर डोकं सुन्न झालं माझं. मनात विचार आला आता काय होणार? तर तुला निर्भया असं नाव देऊन तुझासाठी मेणबत्त्या घेऊन लोक रस्त्यावर येणार, प्रत्येक राजकारणी तुझासाठी बोलणार, विरोधीपक्ष सरकारला धारेवर धरणार, सरकार आम्ही गुन्हेगाराला कडक शिक्षा देऊ असं म्हणणार, मीडिया जेवढ्या जमेल तेवढ्या बातम्या करणार आणि…. आणि सरतेशेवटी काही दिवसांनी हे सगळ थांबणार .. जोपर्यंत पुढची निर्भया तयार होत नाही तोपर्यंत.

तुला जरी सगळे निर्भया अर्थात ‘ज्या व्यक्तीला कशाची भीती नाही’ असा म्हणत असले तरी मला आता भीती वाटते. असं वाटत छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा. महाराजांच्या काळात होती तशी कडक शिक्षा गुन्हेगाराला होयला हवी. पण मला माहितेय असं काहीही होणार नाहीये. पुन्हा एकदा कोर्टात केस चालणार… सिनेमा स्टाइलने पुन्हा एकदा तारीख पे तारीख पडणार .. कधी पुरावे कमी पडतील तर आरोपी अल्पवयीन असेल.

आपल्यावर पण असा प्रसंग ओढवेल की काय याची भीती वाटतेय मला. या अशा विकृतीमुळे ना मला माझ्या आवडीचे कपडे घातला येत आहेत ना मला हव्या त्या वेळी घरा बाहेर पडता येतय. राहून राहून एकच प्रश्न डोक्यात येतो माझ्यावर अशी वेळ आली तर?.. आता खरच खूप भीती वाटायला लागली आहे. कधीतरी वाटत की करोनामुळे लागलेलं लॉकडाउन पुन्हा लागावा. पण पुन्हा डोक्यात येत की घरातच महिलांवर अत्याचार करणारे काय कमी आहेत का? ही विकृत लोक ६० वर्षाच्या आज्जी पासून अगदी काही महिन्याच्या बाळाला सुद्धा सोडत नाहीत.. म्हणून मला खूप भीती वाटतेय.

सरकार अशा गंभीर गुन्ह्यांसाठी कडक शिक्षा का करत नाही? एकदा.. एकदा तरी कडक शिक्षा द्या आणि अशी शिक्षा द्या की कधी कुणाची हिम्मत नाही होणार बाईकडे वाकडी नजर करून बघण्याची. शेवटी.. निर्भया तुला श्रद्धांजली.. जिथे कुठे अशील तिथे तरी तुला भीती वाटणार नाही हीच सदिच्छा..