हरीश अय्यर, सामाजिक कार्यकर्ता

भारत हे एक लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. देशातील विविधतेवर खरंच मला प्रचंड गर्व आहे, अभिमान आहे. मुळात ही विविधताच भारताला त्याचं वेगळेपण देऊन जाते. पण, आता काळानुरुप काही बदल झाले असून लैंगिक गोष्टींमध्ये असणारी विविधतासुद्धा आपण स्विकारण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. विविधतेत एकता असं म्हणत ज्या गोष्टींचा आपल्याला अभिमान वाटतो त्या गोष्टींच्या कक्षा आता रुंदावण्याची गरज आहे. नियम आणि काही अटींच्या रुपात येणारे आणि बेड्या होऊ पाहणारे नियम बेडरुमच्या बाहेरच ठेवून येण्याची गरज आहे. कारण, आम्हाला प्रेम करण्याचं स्वातंत्र्य हवं आहे, आमच्यावर प्रेम केलं जाण्याचं स्वातंत्र्य हवं आहे आणि ज्या व्यक्तीवर आम्ही प्रेम करतो त्याच्यावर स्वच्छंदपणे, सर्वांसमोर प्रेम करण्याचं स्वातंत्र्य हवं आहे.

कलम ३७७ हे कोणी आणलं, मुळात हे अपत्य कोणाचं, तर ते इंग्रजांचं. कारण भारतात प्रत्येकाला सन्मान हा दिला जातोच. अगदी मग ते एखाद्याच्या लैंगिकतेविषयी का असेना. आपल्याकडे जोगता, जोगतीण, तमाशाच्या फडावर नाचणारे पुरुष या संकल्पना फार आधीपासूनच अस्तित्वात होत्या आणि ज्यांचा समाजानेही स्विकार केला होता. पण, पाश्चिमात्य देशांच्या प्रभावामुळे म्हणा किंवा मग बदलत्या काळामुळे म्हणा काही विषयांना कलाटणी मिळाली आणि समाजात अशा घटकांविषयी वेगळ्या दृष्टीकोनाने चर्चा होण्यास सुरुवात झाली. नैसर्गिकरित्या मिळालेल्या शरीराऐवजी एका वेगळ्या शरीराची, व्यक्तिमत्वाची साथ देऊ इच्छिणाऱ्यांना या समाजाने अक्षरश: वाळीत टाकलं, त्यांना वेगळं असल्याची जाणीव करुन दिली. कलम ३७७ पूर्वी पुराणांमध्येही असे काही उल्लेख आहेत ज्यात पुरुषाने पुरुषाशी ठेवलेल्या नातेसंबंधाचं समर्थन करण्यात आलं होतं. त्याचंच एक उदाहरण म्हणजे विष्णूचं मोहिनी रुप. ज्यामध्ये खुद्द विष्णूने मोहिनीचं मोहक रुप घेऊन भस्मासुराला भुलवण्याचा प्रयत्न केला होता. ज्या वस्तूला हात लावशील त्याची राख होईल असं वरदान त्याला देण्यात आलं होतं. ज्या शंकराने त्याला हे वरदान दिलं होतं, त्याच्यावरच या वरदानाचं प्रात्यक्षिक करण्याचं भस्मासुराने ठरवलं. तेव्हा भस्मासूराने आपल्याला स्पर्श करुन आपलीच राख करावी या उद्देशाने विष्णूने मोहिनी रुप धारण केलं. अय्यप्पा स्वामी, हे शंकर आणि मोहिनी रुपातील विष्णूचंच अपत्य आहे. मुळात इथे लक्ष वेधण्याचा मुद्दा असा की, समलैंगिकता आणि लैंगिकतेविषयीच्या चौकटीबाहेरच्या संकल्पनांमध्ये देवाधिकांचा उल्लेख आल्यावर त्यांचा सहजपणे स्वीकार केला जातो किंबहुना त्याचा सर्रास स्वीकार करतो. पण, ब्रिटीशांनी भेदभाव करण्यास सुरुवात केली तेव्हापासून मात्र आपल्या समाजात ही संकल्पना अशी काही रुजली की ती दिवसागणीक आणखीनच बळावत गेली.

प्रेम आणि त्याच्याभोवती फिरणारी प्रत्येक संकल्पना ही इतकी व्यापक आणि प्रगल्भ आहे की त्याविषयी लिहिण्याबोलण्यासाठी शब्दही अपुरे आहेत. आपल्या देशात समलैंगिकता आणि त्याविषयीचे न्यूनगंड आहेत. पण, त्याची पाळंमुळंसुद्धा या देशात आहेत हे नाकारता येणार नाही. कामसूत्रांची मुळंसुद्धा याच देशात रुजली असून तेही प्रेमाचंच एक प्रतीक आहे. पण, आपल्या भूतकाळातील या गोष्टी आणि त्यांचं महत्त्वं सर्वकाही आपण मागेच सोडलं, मुळात आपण ते जाणीवपूर्वक विसरलो आणि पाश्चिमात्य विचारसरणीच्या मागे धावत राहिलो आणि कधी भेदभावाच्या विळख्यात अडकलो हे कळलंच नाही.

मी, हरीश अय्यर LGBTIQ विषयी हे लिहितोय, पण त्याशिवायही असे काही मुद्दे आहेत जे मी सर्वांनाच सांगू इच्छितो. प्रेम ही एक अतिशय सुरेख आणि स्वच्छंद भावना आहे. एखाद्या व्यक्तीच्या त्याच्या व्यक्तीमत्त्वासोबतच त्याच्या वेगळेपणासोबतच स्वीकारलं गेलं पाहिजे. यामध्ये जात, धर्म, पंथ हे अडथळे न आणलेलेच बरे. मग ते हदिया असो, खाप पंचायतीच्या निशाण्यावर असलेली प्रेमी युगुलं असो किंवा मग समलैंगिक जोडपी असो. प्रेमाच्या कोणत्याही रुपाला एका आरोप्याप्रमाणे वागणूक देणं आणि त्याच्या नावाखाली प्रगतीशील वाटचाल केल्याचं दाखवणं हेच मुळात चुकीचं आहे. त्यामुळे इतकंच सांगू इच्छितो की प्रेम करणाऱ्यांना कैद करण्यापेक्षा प्रेमाच्या भावनेला आपल्या हृदयात कैद करुया, एक प्रतिष्ठीत समाज निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करुया आणि त्यासाठी बेडरुममध्ये येण्यापूर्वी पादत्राणं आणि जाचक कायदे, नियम बाहेर सोडून येऊया…

-हरीश अय्यर, सामाजिक कार्यकर्ता

(कलम ३७७ च्या वैधतेबाबत सुप्रीम कोर्ट आज निर्णय देणार, त्या पार्श्वभूमीवर सदर ब्लॉग हा ‘लोकसत्ता. कॉम’ पुर्नप्रकाशित  करत आहे. काही महिन्यांपूर्वी LGBTIQ कार्यकर्ते हरिश अय्यर यांनी ‘लोकसत्ता’साठी हा लेख लिहिला होता. )