28 October 2020

News Flash

Blog: उद्धवनीतीचा अखेरचा ‘ रामबाण ‘कधी …?

समाजमाध्यमावरुन शिवसैनिकांनी अवहेलना सहन केली. पण यामध्ये उद्धव ठाकरे अत्यंत संयमाने खेळी खेळत होते. फक्त ते अचूक परिस्थितीची वाट पहात होते.त्यां

संग्रहित छायाचित्र

मनोज वैद्य

महाराष्ट्रात शिवसेनेने सत्तेत राहूनच भाजपाला नामोहरम करण्याचे प्रयत्न केले असून उद्धव ठाकरे संयमाने योग्य वेळेची वाट पहात होते. पाच राज्याच्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता जितकी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना असेल किंबहुना त्यापेक्षा अधिक उद्धव ठाकरे यांना होती असे विधान केल्यास वावगे ठरणार नाही, तर त्या निकालाने काँग्रेसपेक्षा शिवसेना आपली भूमिका आणखीन किती कठोर करेल याची गणिते राज्यातील भाजपा नेते मांडत होते.

आणि भाजपाच्या दृष्टीने विपरीत घडले, तीन सामर्थ्यशाली राज्ये हातातून गमावली. ज्या राज्यांनी पडत्या काळात भाजपाला साथ दिली होती, त्यांनी ऐन उमेदीच्या भरात मान टाकली. संघाची अंतर्गत यंत्रणा, पन्नाप्रमुख योजना, अफाट साधन सामुग्री आणि शाहांच्या चाणक्यनीतीचा ओव्हरडोस आणि साथीला मोदी-योगींच्या धडाडणा-या तोफा , कशाचीच उणीव नाही. तरीसुध्दा पराभव हाती आल्याने महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांच्या मानसिकतेचे वर्णन महाकवी ‘ ग्रेस ‘ यांच्या कवितेच्या या ओळी अचूकपणे करतात..

गळ्यात शब्द गोठले
अशांतता दिसे घनी
दुःख बांधूनी असे
क्षितीज झाकीले कुणी ?

अनपेक्षितपणे झालेला हा बदल, पन्नास वर्षे कोण हरवेल आम्हांला ! काँग्रेसमुक्त भारत !! या अशा वल्गनांचा परिणाम मतदारांच्या मनावर तात्पुरता होता , परंतु भाजपा कार्यकर्त्यांना मात्र याची भूरळ चांगलीच पडली होती. विशेषतः इतर पक्षांतून आलेले ‘ बाटगे ‘ मूळच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांपेक्षा जास्तच मस्तीत होते.

हा एक भाजपामधील वर्ग होता, ज्याला पाच राज्यातील विजयानंतर भूजावरच्या बेडक्या राष्ट्रवादी किंवा काँग्रेस कार्यकर्त्यांना दाखवायच्या नव्हत्या. तर त्यांना शिवसेनेला आणखीनच नामोहरम करायचे होते.

सुमारे चार वर्षापासून सरकारमध्ये राहून देखील शिवसेना सतत संघर्षाच्या पावित्र्यात राहिली. त्यामुळे समाजमाध्यमावरुन शिवसैनिकांनी अवहेलना सहन केली. पण यामध्ये उद्धव ठाकरे अत्यंत संयमाने खेळी खेळत होते. फक्त ते अचूक परिस्थितीची वाट पहात होते.त्यांना बरेचसे हिशोब चुकते करायचे होते पण ते पूर्वीच्या शिवसेना स्टाईलने नव्हे तर नवीन उद्धवनीतीचा वापर करुन. याचा अंदाज भाजपाच्या धुरीणांना आला होता पण तोपर्यंत उद्धवनीतीचा फास व्यवस्थित आवळला गेला होता. महाराष्ट्रात एक नवीन म्हणीचा उगम झाला होता, सोडले तर पळते धरले तर चावते, याऐवजी सोडतही नाही नुसतेच चावते…!

एकूणच लोकसभा निवडणूकीच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रीपद देताना शिवसेनेची अवहेलना, नंतर विधानसभा जागावाटपात केलेली दडपशाही त्यातून ऐनवेळी मोडलेली युती, नंतर प्रचारात पूर्ण ताकदीने शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न, शिवसेनाचा पाठिंबा न घेता, राष्ट्रवादीच्या सहकार्याने सरकारची स्थापना.. भाजपाच्या महाराष्ट्र सरकारच्या शपथविधीला उद्धव ठाकरे यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक देण्यात आली. अशा प्रतिकूल परिस्थितीतही उद्धव ठाकरेंनी प्रगल्भतेची झलक दाखवली. शेजारी बसूनसुध्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंकडे दुर्लक्ष केले होते, हे विसरुन चालणार नाही.

सरतेशेवटी शिवसेनेची ‘ लाइफ लाईन ‘ असे जिला म्हटले जाते, त्या मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकावण्यासाठी शिवसेनेला वेळोवेळी काँग्रेसनेसुध्दा मदत केली. त्याच शिवसेनेला तिच्या अनेक वर्षांच्या नैसर्गिक (?) मित्रपक्षाने मुंबईच्या सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करुन शिवसेनेची आर्थिक नाडी कापून तडफडवून संपवण्याचा प्रयत्न केला. त्याकरिता साम-दाम- दंड भेदाचा वापर केला गेल्याची चर्चा आहे.

भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनप्रमुखांना हे आमच्यासाठी स्कायसाईज पोर्ट्रेट आहेत असे म्हटले होते. तर केंद्रात भाजपा तर राज्यात शिवसेना मोठा भाऊ असे युतीचे सूत्र होते. परंतु एका मोदीलाटेचा फायदा उठवून, भाजपाच्या धुरीणांनी शिवसेनेला आमचे मांडलिकत्व पत्करा नाहीतर तुम्हाला संपवून टाकू, त्याकरीता सरतेशेवटी शिवसेनेतसुद्धा फूट पाडण्याचे प्रयत्न केले. असे हे धोरण परदेशी ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने इथल्या संस्थानिकांसाठीसुध्दा इतक्या निर्दयीपणे नव्हते वापरले.

या अशा दगाबाजीच्या परिस्थितीत उध्दव ठाकरे यांनी अत्यंत मुत्सदीपणे सत्तेत सहभागी होत सत्तेत आमदारांना गुंतविले तर अपमानाने दुखावलेल्या शिवसैनिकांसाठी सत्तेत राहून सरकारच्या धोरणांना विरोध करुन शिवसैनिक रस्त्यावर आक्रमक राहील याची तजवीज केली. यामुळे आमदार व संघटना दोन्हीही अबाधित राहतील याची काळजी घेण्याचा प्रयोग या जगावेगळ्या उद्धवनीतीने केला आणि राजकियदृष्ट्या धाडसाचे होते हे मान्यच करावे लागेल.

परंतु आज देशांतील मोदीलाटेचा ओसरण्याचा आलेख लक्षात घेता, तसेच प्रत्येक पोटनिवडणूकीत त्यांच्या महत्वाच्या राज्यांत झालेला दारुण पराभव, तसेच गुजरात राज्यात काँग्रेसने दिलेली कडवी झुंज आणि हिंदी पट्यातील सत्तेत असलेला राज्यात भाजपाचा झालेला पराभवामुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.

त्यातच अयोध्या येथे जाऊन राममंदिर प्रश्नावर शिवसेनेने घेतलेली आक्रमक उघड भूमिका भाजपाची अडचण करणारी आहे. कारण भाजपाने आतापर्यंत राममंदिरप्रश्नी संघ व इतर सहयोगी विहिंप , साधू संघटन यांनाच पुढे केले होते. त्यामुळे शिवसेनेने पहिल्या फेरीतच भाजपच्या हातातील ‘ रामबाण ‘ हिसकाविण्याचा ब-यापैकी प्रयत्न केला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर आणि पर्यायाने शिवसेनेवर भाजपाने पाठीमागून केलेल्या आघाताची परतफेड करण्याची तयारी केल्याचे दिसते.  ही राजकियदृष्ट्या केलेली मांडणी यशस्वी झालेली दिसते आहे. या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे भाजपाच्या देशातील कमी झालेल्या ताकदीचा कसा फायदा उठवतात ते पहावे लागेल.

निवडणुकीच्या राजकारणात लोकांच्या धारणेला (public perception) फार महत्त्व असते. त्याकरीता आतल्या पातळीवर सुरु असलेल्या वाटाघाटी मनाप्रमाणे योग्य वेळेत व योग्य प्रमाणात न झाल्यास उद्धव ठाकरे शेवटचा ‘रामबाण’ सोडतील. जो राज्याच्या निवडणूकीत भाजपाला वर्मी लागू शकेल, फक्त आता याचा अचूकपणा उद्धव ठाकरे यांच्या कौशल्यांत आहे. त्यामुळे भविष्यातील राजकारणात उद्धव ठाकरेंच्या राजकारणाला वेगळी उंची लाभेल, त्याची नोंद राजकिय इतिहासात घेतली जाईल.

manojvvaidya@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2018 6:24 pm

Web Title: shiv sena party chief uddhav thackeray may hits back bjp before election manoj vaidya
Next Stories
1 BLOG : वाट पाहूनी जीव थकला !
2 BLOG : जेव्हा पर्थवर भारत ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखतो
3 BLOG : हा तर राहुल गांधींनी मोदींना दिलेला शॉक 
Just Now!
X