18 September 2020

News Flash

BLOG : सत्तेचा सोपान युती मार्गे…

सत्तेच्या जवळपास पोहोचण्यासाठी युती गरजेचीच होती

संग्रहित छायाचित्र - प्रशांत नाडकर

भाजप-शिवसेना यांची युती झाली म्हणून त्यांच्यावर टीका केली जात आहे. सकृत दर्शनी ते योग्य ही आहे. गेली पाच वर्षे एकमेकांना पाण्यात पाहणारे, एकमेकांची उणीदुणी काढणारे आता एकत्र आले म्हणून होणारी टीका योग्य आहे. पण केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेवरुन पायउतार झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही युती होणे/करणे दोघांसाठी गरजेचे होते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अनुक्रमे ०२ आणि ०४ अशा जागा मिळाल्या होत्या. भाजपसाठी आता २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही, मोदींची लोकप्रियता काही प्रमाणात नक्कीच कमी झाली आहे. तिकडे केंद्रात महागठबंधनचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ते किती यशस्वी होतील हा भाग वेगळा. केंद्रात मोदींना सक्षम पर्याय दिसत नसला तरीही युती न करता वेगवेगळे लढलो तर मतविभाजनाचा फटका निश्चितच बसू शकतो. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच विधानसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा परिणाम विधानसभा निवडणुकीवरही होणारच असल्याने प्रत्येक जागा युतीसाठी महत्वाची आहे. हा सर्व विचार करुनच ही युती झाली आहे.

ही युती होऊ नये म्हणून विरोधकांसह इतरही अनेक जण देव पाण्यात बुडवून बसले होते. त्या दोघांमध्ये इतके फाटले आहे की त्यामुळे निवडणूकपूर्व युती तरी होणार नाही असे वाटत होते. पण ही युती झालीच. साम, दाम, दंड, भेद याचा उपयोग करून ही युती करायला भाजपने शिवसेनेला भाग पाडले असे गृहित धरले तरीही सत्तेची गरज आणि पुन्हा सत्तेवर येण्यासाठी/सत्तेच्या जवळपास पोहोचण्यासाठी युती गरजेचीच होती. भाजप व शिवसेना दोघेही काही पावले पुढे/मागे झाले आणि इतरांच्या आधी एकत्र येऊन युतीवर शिक्कामोर्तबही केले. आता दोन्ही पक्षांच्या नेत्यापुढे ही युती पक्ष कार्यकर्त्यांच्या मनापर्यंत उतरविण्याचे मोठे आव्हान आहे. दोन्ही बाजूंनी दुभंगवेली मने जुळवायची आहेत. एक मात्र नक्की की दोन्ही काँग्रेसपेक्षा भाजप, शिवसेनेकडे निष्ठावंत कार्यकर्ता, सहानुभूतीदार, हितचिंतक यांचा पाया अनेक पटीने पक्का आहे. काही प्रमाणात नाराजी प्रकट होईल किंवा पडद्यामागे काम करेल पण त्याचा खूप विपरित परिणाम होईल असे वाटत नाही. उलट आत्ता ही युती झाली नसती तर शिवसेना फुटण्याची भिती अधिक होती. युती करुन उद्धव ठाकरे यांनी ती ही काळजी घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मोदी, शहा यांच्या गळी युती होणे कसे गरजेचे आहे ते पटवून दिले आणि इतके वेळा शिव्या खाऊन आणि टीका होऊनही शहा ‘मातोश्री’ वर आले. नाहीतरी प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सर्व काही क्षम्य असते असे म्हणतातच.

आजवर इतरांना धोबीपछाड देण्यात आणि कात्रजचा घाट दाखवण्यात प्रसिद्ध असलेल्यांनी असे काही केले की त्यांचे मुत्सद्देगिरी, चलाखी, बुद्धीकौशल्यगिरी म्हणून कौतुक केले जायचे. दिवस बदलले आहेत. अर्थात भविष्यात लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत युती यशस्वी झाली नाही किंवा काही जागा कमी पडत असल्या तर हे साहेब त्यांची ‘मती’ घेऊन मदतीलाही येतील, स्वतःच्या पदरात भरघोस काही पाडूनही घेतील. पण ती वेळ येऊच नये ही अपेक्षा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 8:10 am

Web Title: shivsena and bjp ties their alliance for upcoming loksabha and assembly election special blog by shekhar joshi
Next Stories
1 बेरोजगारीविरोधात मनसेचा ‘पुरंदर पॅटर्न’!
2 बाॅलिवूडमध्येही घसरतोय मराठीचा टक्का
3 BLOG: हार्दिक, तू खेळ पण थोडं खोटं बोलायलाही शिक!
Just Now!
X