अनिल माथुर (गोदरेज इंटिरिओ, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर)

अमन व रियाच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली. हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी ते शहरातील एका रेस्तराँमध्ये गेले. रेस्तराँमधील एका शांत ठिकाणी बसून संपूर्ण जगापासून स्वतःला दूर ठेवत केवळ एकमेकांच्या सोबतीत ती संध्याकाळ घालवताता. खरे तर असेच असले पाहिजे. परंतु, इतर दिवशी रिया इन्स्टाग्राम अपडेट करण्यात आणि अमन कामाचे ईमेल पाहण्यात गुंतलेला असतो. एकमेंकाच्या सोबतीचा आनंद घेण्याऐवजी ते आपापल्या स्मार्टफोनमध्ये गुंतलेले असतात.

हे एकमेव उदाहरण नाही. खाण्याच्या टेबलावर मोबाइल उजळलेले असतात. फोटो काढले जातात. सोशल मीडिया पोस्ट अपडेट केल्या जातात, मेसेज वाचले जातात, ईमेल पाहिले जातात. प्रत्यक्ष संवाद साधण्याऐवजी व्हर्च्युअल संवाद सुरू असतो. स्मार्टफोनमुळे अवघे विश्व टचस्क्रीनच्या एका स्वाइपइतक्या अंतरावर आले आहे. जगाच्या दोन कोपऱ्यात बसणाऱ्या व्यक्ती इतक्या जवळ कधीच आलेल्या नव्हत्या. पण त्याच वेळी, एकाच खोलीत असणाऱ्या दोन व्यक्ती इतक्या दूरही गेल्या नव्हत्या.

लोकं आपापल्या स्मार्टफोनमध्ये डोके खुपसून बसले आहेत, हे दृष्य लग्न समारंभ, कौटुंबीक भोजन, सामाजिक समारंभ किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक समारंभ यामध्ये सर्रास दिसून येते. लोकं एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असली तरी त्यांचे मन मात्र अन्यत्र कुठेतरी असते.

स्मार्टफोन व इंटरनेट यांनी आपल्या जीवनात परिवर्तन आणले आहे आणि जीवन समृद्ध केले आहे. पण नाण्याची दुसरी बाजू म्हणजे, त्यावरील अवंलबित्व कमालीचे वाढले असल्याने पती-पत्नी, जोडीदार, मित्रमंडळी व कुटुंबातील सदस्य यांच्यातील नातेसंबंधांवर दुष्परिणाम होऊ लागला आहे. गोदरेज इंटिरिओने नुकत्याच केलेल्या ‘मेक स्पेस फॉर लाइफ’ सर्वेक्षणानुसार, स्मार्टफोन व अन्य तंत्रज्ञानविषयक उपकरणांच्या अतिरिक्त वापरामुळे आपला जोडीदार आपल्याबरोबर कमी वेळ व्यतित करतो, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी ७५% लोकांनी सांगितले. स्मार्ट डिव्हाइसमध्ये गुंतून राहिल्याने त्यांच्या कौटुंबावर आणि नात्यांवर परिणाम होत असल्याचेही निदर्शनात आले.

५६.७% भारतीयांनी त्यांचे ‘वर्क-लाइफ’मधील संतुलन साधणे कठीण असल्याचे नमूद केले आहे. यामुळे ‘वर्क-लाइफ’मधील संतुलन असमाधानकारक असलेल्या देशांमध्ये भारतही असल्याचे यातून स्पष्ट होते. स्मार्टफोन व त्याच्यावर असलेले आपले अवलंबित्व यामुळे आपले काम पूर्वीपेक्षा अधिक सोयीस्कर झाले आहे. यामुळे तुम्ही ऑफिसपासून कधीही दूर जाऊ शकत नाही. स्मार्टफोन उपयुक्त ठरत असला तरी, स्मार्टफोनवरील अवलंबित्व हानीकारक ठरू लागले आहे. काम नसतानाच्या मोकळ्या वेळेतही युवक स्मार्टफोनला चिकटून असतात.

एक काळ असा होता जेव्हा रात्री एकत्र जेवताना दिवसभराबद्दल कौटुंबिक गप्पा व चर्चा व्हायच्या, कॉफी घेत असताना आणि लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर बसून बैठेखेळ खेळत असताना कुटुंबीयांमधले नाते अधिक घट्ट व्हायचे; परंतु आता एखादे जोडपे सोफ्यावर एकत्र बसते, परंतु ते आपापल्या स्मार्टफोन किंवा टॅब्लेटमध्ये मग्न असते. ते यूट्युबवर व्हीडिओ किंवा फूटबॉल सामने पाहत असतील किंवा त्यांचे आवडते शो पाहत असतील. ते कदाचित एकमेकाच्या बाजूला बसलेले असतील, परंतु त्यांचा संवाद एकमेकांशी नाही, तर स्क्रीनशी सुरू असतो.

स्पष्ट सांगायचे तर, तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्यावर सकारात्मक बदल केला असला तरी त्याची किंमतही मोजावी लागत आहे. शेवटी, प्रत्येकाने आपापला निर्णय घ्यायचा असतो. तंत्रज्ञानाला आपल्या आयुष्यात किती शिरकाव करू द्यायचा? तंत्रज्ञानापासून पूर्णतः दूर जाणे अशक्य आहे. आपण व्हर्च्युअल विश्वामध्ये इतके अडकलो आहोत की एकाएकी त्यातून बाहेर येणे शक्य नाही. कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार इत्यादींसोबत वेळ घालवताना फोन, टॅब्लेट, लॅपटॉप इत्यादीमध्ये गुंतून राहाणे कटाक्षाने टाळायला हवे.