– श्रुति गणपत्ये 

काही वर्षांपूर्वी दाक्षिणात्य सिनेमांना बॉलिवूडच्या तुलनेत फारच नगण्य स्थान होतं. त्यामधली हिंसा, जाडे-पोट सुटलेले हिरो आणि तशाच जाड्या हिरोईन म्हणून त्या चित्रपटांची यथेच्छ खिल्ली उडवली जायची. पण इंटरनेटवर आणि ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांना उपलब्ध झाल्यापासून दाक्षिणात्य सिनेमांची लोकप्रियता एकदम तुफान वाढली आहे. आधी दाक्षिणात्य चित्रपटांचा हिंदी रिमेक केल्यावर तो इतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचा. आता मात्र सब-टायटल्स उपलब्ध झाल्याने लोक थेट त्या भाषेतला कोणताही चित्रपट बघू शकतात.

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

गेल्या दोन वर्षांमध्ये सर्वात जास्त चर्चिलेले दाक्षिणात्य चित्रपट म्हणजे ‘बाहुबली’, ‘केयर ऑफ कंचरापालेम’, ‘सुपर डिलक्स’, ‘कुंबगिनी नाइट्स’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘जर्सी’, ‘साइझ झिरो’, ‘जलीकट्टू’, ‘असूरन’, ‘करनन’, ‘महानटी’, ‘हेलन’, ‘सीआयए’, ‘दृष्यम-२’, ‘लुसिफर’, ‘कांप्पन’, ‘मास्टर’, ‘उप्पेना’, ‘केजीएफ’, ‘वर्ल्ड फेमस’, ‘डिअर कॉम्रेड’, ‘सुरारी पोट्रू, मंडेला’, ‘द ग्रेट इंडियन किचन’. दृष्यम-२चा रिमेक हिंदी आणि इतर भाषांमध्ये होऊ घातला आहे. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर बेतलेला, कंगना रानौतचा ‘थलैवा’ आणि बाहुबली फेम राजमौलीचा ‘आरआरआर’ हे दोन चित्रपट एकाच वेळी बहुभाषांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. त्यामानाने ओटीटीवर गाजलेल्या बॉलिवूडच्या चित्रपटांची चर्चा खूपच कमी होताना दिसते. ओटीटीवर प्रदर्शित होणारे बॉलिवूडचे चित्रपट हे तुलनेत लहान होते एखादा “शकुंतला”सारखा सोडला तर.

कोविड १९ मुळे तर सर्वच चित्रपटगृह बंद होती, चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये अनेक अडचणी होत्या. प्रवास अशक्य होता. अशावेळी अर्थातच घर बसल्या प्रेक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजन हवं होतं. त्यावेळी अनेकांना या दाक्षिणात्या चित्रपटांचा साक्षात्कार झाला आणि त्यांची लोकप्रियता वाढू लागली. त्या चित्रपटांबद्दल असलेल्या प्रतिमेतून बाहेर पडून खऱ्या अर्थाने लोकांमधले सर्वसामान्य विषय निवडून, अनेकदा फार मोठे स्टार न घेताही कथानक आणि दृष्यपरिणामांच्या आधारे हे दाक्षिणात्य चित्रपट सरस ठरले आहेत. बॉलिवूड मात्र आपल्याच प्रतिमेत अडकल्याने नवीन कथानक, वेगळे प्रयोग करणं हे अगदी अनुभव सिन्हासारखा एखादाच दिग्दर्शक करताना दिसतो.

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये बोलबोला हा मल्ल्याळी चित्रपटांचा जास्त आहे. “कुंबगिनी नाइट्स”चं उदाहरण घ्या. आपसात न पटणाऱ्या चार भावांची ही गोष्ट. पण त्यामध्ये त्यांच्या गावातली संस्कृती, खाद्य पदार्थ, पारंपरिक व्यवसाय, जाती भेद असा सर्व मसाला दाखवल्याने ती कथा एकदम भावून जाते. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जात व्यवस्थेचं चित्रण हे खूप सखोल आणि वास्तववादी केलं आहे. धनुषसारखा मोठ्या अभिनेत्याचे “असूरन” आणि “करनन” हे दोन्ही चित्रपट जात व्यवस्थेवर आधारिक आहेत. असूरनमध्ये अल्पभूधारक शेतकरी विरुद्ध मोठा शेतकरी असा वाद आहे तर करननमध्ये दलितांना गावच्या बसस्टॉपवरून बस पकडण्यास बंदी घातल्याने पुढचं कथानक घडतं. पण केवळ जात व्यवस्थेवर न थांबता ग्रामीण भागाचं सुंदर चित्रिकरण या चित्रपटांमध्ये येतं. दाक्षिणात्य चित्रपटांमधली जात व्यवस्था आणि वास्तववादी चित्रिकरण याचं श्रेय हे स्वातंत्र्यपूर्व काळात दक्षिणेत सुरू झालेल्या वेगवेगळ्या चळवळींना जातं. पेरियार ई व्ही रामस्वामी यांनी सुरू केलेली ब्राह्मणवादाविरुद्धची बहुजनांची चळवळ तामिळ चित्रपटसृष्टीला करुणानिधी, एमजी रामचंद्रन, सीएन अन्नादुराई असे हुशार, धाडसी लेखक, अभिनेते देऊन गेली. हे तिघेही तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. चित्रपट आणि राजकारणातून त्यांनी आपली बहुजनवादी भूमिका बिनधास्त मांडली. हीच परंपरा आजच्या मल्ल्याळी, तामिळ, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांनी पुढे नेण्याचं काम केलं आहे. अर्थात सर्व चित्रपट काही वास्तववादी नाहीत. पण बॉलिवूडच्या तुलनेत मात्र ते खूपच पुढे आहेत, असं म्हणावं लागले. बॉलिवूडमध्येही एकेकाळी ही परंपरा होती. पण लोकप्रियतेच्या नावाखाली करण जोहरसारख्या दिग्दर्शकांनी फारच उथळ चित्रपट बनवायला सुरुवात करून संपूर्ण हिंदी चित्रपटांना एक वेगळंच वळण दिलं.

“सुदानी फ्रॉम नायजेरिया” हा आणखी एक धमाल चित्रपट आहे. केरळामध्ये फुटबॉलचे सामने खूप लोकप्रिय आहेत. ते खेळण्यासाठी नायजेरिया या गरीब देशातून एक खेळाडू येतो आणि जखमी होतो. मग संपूर्ण गाव त्याची काळजी कसं घेतं आणि त्यांच्याच एक मैत्रीचा, प्रेमाचा धागा कसा तयार होतो, अशी त्याची कथा गुंफली आहे. आता आपलं आयुष्य हे कोणत्याना कोणत्या स्क्रीनसमोर अधिक जातं. कधी मोबाईल, कधी संगणक कधी टीव्ही, किंडलसारखे बुक रिडर वगैरे. या आधुनिक स्क्रीनचा वापर करून “सी यू सून”ची कथा घडत जाते आणि चित्रपटातील बहुतांश भाग या विविध स्क्रीनवरच घडतो. “सीआयए”मध्ये एक सलमान दुलकर हा आपल्या प्रेयसीला भेटायला अमेरिकेमध्ये जातो. पण थेट जाणं शक्य नसल्याने तो दक्षिण अमेरिकेतून लपून-छपून अमेरिकेमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे केवळ लोकल न राहता ग्लोबल थीम घेऊन हे चित्रपट येत आहेत. जलीकट्टू ऑक्सरसाठी पाठवण्यात आला कारण त्याचं चित्रीकरण. कॅमेरा, लाईट आणि दृष्यांचा जो खेळ या चित्रपटामध्ये आहे तो अलीकडच्या कोणत्याच चित्रपटातून केलेला नाही. माणसांमधली हिंसा हा विषय चित्रपटाचा असला तरी त्याला ग्रामीण भागातली उप-कथानक जोडून चित्रपट रंगवला आहे.

त्याउलट बॉलिवूडमध्ये त्या ताकदीचे फारच थोडे चित्रपट प्रदर्शित झाले. “रामप्रसाद की तेरवी”, “थप्पड”, “पंगा”, “पगलियत” हे काही अपवाद म्हणावे लागतील की ज्यांनी वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला. खरंतर रिजनल सिनेमा म्हणून या बहुभाषांतील सिनेमांना हिंदीपुढे कमी लेखलं जायचं. कदाचित हिंदी चित्रपटांचं ते एक मार्केटिंग टेक्नीक असेल. पण ओटीटी प्लॅटफॉर्मनी भाषेची अडचण दूर करून दाक्षिणात्य सिनेमांना सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. त्यातील अनेक कथानकं ही ग्लोबल आहेत. त्यांच्यावर असलेला रिजनल हा शिक्का खरंतर पुसून टाकायला हवा.

shruti.sg@gmail.com