News Flash

BLOG : …म्हणून आल्फ्रेड नोबेल यांनाही म्हटलं गेलं होतं ‘मौत के सौदागर’

जाणून घ्या नोबेल पुरस्काराचा रंजक इतिहास

(संग्रहित छायाचित्र)

समीर जावळे

नोबेल पुरस्कार हा जगभरात अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. विज्ञान क्षेत्रात वैविध्यपूर्ण आणि अनोखे शोध लावणाऱ्या वैज्ञानिकांना, अर्थशास्त्रज्ञांना, शांतीदूत म्हणून काम करणाऱ्या उत्कृष्ट समाजसेवकांना आणि आदर्श साहित्य लिहिणाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित केलं जातं. नोबेल पुरस्कार ज्यांच्या नावे दिला जातो त्या आल्फ्रेड नोबेल यांची आज जयंती. त्यांना हा पुरस्कार सुरु करावासा वाटला त्याच्यामागे एक खास कारण होतं.. आणि हो कधी काळी स्वीडनच्या या रसायनशास्त्रज्ञानालाही ‘मौत के सौदागर’ असं म्हटलं गेलं होतं. जाणून घेऊया… हा रंजक इतिहास.

आल्फ्रेड नोबेल यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजेच २१ ऑक्टोबर १८३३ रोजी झाला होता. आल्फ्रेड नोबेल हे स्वीडनचे प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ होते आणि इंजिनिअरही होते. त्यांचा एका भावाचा आणि वडिलांचा मृत्यू एका कारखान्याच्या स्फोटात झाला. ज्यानंतर त्यांनी मनाशी ही खूणगाठ बांधली की असं तंत्र शोधायचं ज्यामुळे स्फोटकांचा सुरक्षितपणे स्फोट घडवता येईल. १८६५ मध्ये आल्फ्रेड नोबेल यांनी डिटोनेटरचा शोध लावला. स्फोटकांच्या विश्वात गनपावडरच्या शोधानंतर हा सर्वात मोठा शोध मानला जातो. त्यानंतर १८६७ मध्ये त्यांनी डायनामाइटचा शोध लावला. डायनामाइट या त्यांच्या शोधाचे त्यांनी १८६९ मध्ये पेटंट घेतले. खाणकाम, शस्त्रास्त्र उद्योग, लष्करी बांधकामं आणि सोबतच युद्धांतही डायनामाइटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. त्यातून नोबेल यांनी प्रचंड संपत्तीही कमावली.

ही संपत्ती कमवत असतानाच १३ एप्रिल १८८८ हा दिवस उजाडला. ज्यादिवशी आल्फ्रेड नोबेल यांनी स्वतःच्याच मृत्यूची बातमी वाचली. ‘मौत के सौदागर की मौत’ या आशयाचा मथळा आणि स्वतःच्या मृत्यूची बातमी वाचून ते चकीत झाले. प्रत्यक्षात त्यांचा भावाचा मृत्यू झाला होता. मात्र प्रसारमाध्यमांनी आल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू झाल्याची बातमी छापली. त्या बातमीमुळे नोबेल अस्वस्थ झाले. आपण जे डायनामाइट तयार केलं आहे आणि त्याचं पेटंट घेतलं आहे त्याद्वारे अनेक निरपराधांचेही बळी गेले आहेत कारण युद्धातही डायनामाइटचा वापर होऊ लागला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. तसंच यामुळेच आपली प्रतिमा इतकी मलीन झाली आहे की लोक आपल्या मृत्यूची वाट बघत आहेत हे शल्यही त्यांना सतावू लागलं.

आल्फ्रेड नोबेल यांना ही सल मनात खुपत होती त्यातूनच जन्म झाला तो नोबेल पुरस्काराचा. आल्फ्रेड नोबेल यांनी १८९५ मध्ये त्यांचं मृत्यूपत्र तयार केलं. ज्यामध्ये त्यांनी एक ट्रस्ट स्थापन केला जावा आणि जगातल्या उत्तम शास्त्रज्ञांना, साहित्यिकांना आणि शांतीदूतांना संपत्तीच्या व्याजातून पुरस्कार देऊन सन्मानित केलं जावं असं लिहून ठेवलं. १० डिसेंबर १८९६ ला आल्फ्रेड नोबेल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे त्यांची सगळी संपत्ती नोबेल फाऊंडेशनच्या नावे करण्यात आली. त्या संपत्तीच्या व्याजातून नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली.

आल्फ्रेड नोबेल यांनी कमावलेली संपत्ती इतकी प्रचंड आहे की आजही त्या संपत्तीच्या व्याजातून नोबेल पुरस्कार दिला जातो. प्रत्येक वर्षी नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या विजेत्याला साधारण साडेचार कोटी रुपये दिले जातात. तसंच २३ कॅरेट सोन्यापासून तयार झालेलं २०० ग्रॅम वजनाचं पदक आणि प्रमाणपत्रही दिलं जातं. या पदकाच्या एका बाजूला आल्फ्रेड नोबेल यांची छबी आणि जन्म आणि मृत्यूची तारीख लिहिलेली असते. तर दुसऱ्या बाजूला युनानी देवी आयसिसचं चित्र आहे.

साहित्य, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, मेडिसीन आणि शांतीदूत असं या पुरस्कारांचं वर्गीकरण आहे. या क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या जगातल्या उत्कृष्ट व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. १९०१ पासून या पुरस्कारांना सुरुवात झाली आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार हा १९६९ पासून दिला जाऊ लागला.

किती भारतीयांना आजवर मिळालाय नोबेल पुरस्कार?

१९१३ मध्ये रविंद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले पहिले भारतीय ठरले त्यांना त्यांच्या साहित्यकृतींसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

सी. वी. रमण अर्थात सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनाही नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. प्रकाश आणि उर्जा यांचा कसा संबंध आहे हे त्यांनी विशद करुन सांगितलं त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील कार्याबद्दल आणि या वेगळ्या शोधाबाबत त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं

हर गोबिंद खुराणा यांनाही नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.

मदर टेरेसा यांनाही शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं

सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी ताऱ्यांचा विकास आणि संरचना याबाबत महत्त्वाचं संशोधन केलं होतं. भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला

अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनाही त्यांच्या अर्थशास्त्रातल्या भरीव कार्याबाबत नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे

वेंकटरमण रामकृष्णन यांनाही रसायशास्त्रातील शोधाबाबत नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं

कैलाश सत्यार्थी यांनाही नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

तर अभिजित बॅनर्जी यांनाही नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.

तर नोबेल हा अत्यंत मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे. जगात या पुरस्काराची ख्याती आहे. मात्र हा पुरस्कार त्यामागचं कारण आणि इतिहास हादेखील तेवढाच रंजक आहे.

sameer.jawale@indianexpress.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2020 8:08 am

Web Title: special blog on alfred nobel birth anniversary and nobel prize history scj 81
Next Stories
1 BLOG : धोनीकडून पळवाट शोधण्याचा प्रयत्न??
2 ‘बिहार में का बा?’ आणि ‘बिहार में ई बा…’; गायिकांच्या रॅपने प्रचारात धमाल
3 BLOG: बडे बडे देशो में… गारुड कायम!
Just Now!
X